
मुंबई : लवकरच 'झी मराठी' वाहिनीवर डान्स महाराष्ट्र डान्स लिटिल मास्टर्स हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमासाठी स्वतः चिंचि चेटकीण म्हणजेच अभिनेते वैभव मांगले महाराष्ट्रातून स्पर्धक शोधून आणत आहेत. पण आता या स्पर्धेचा परीक्षक कोण असणार हा प्रश्न सर्व प्रेक्षकांना पडला होता. अखेर या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले आहे. हरहुन्नरी अभिनेता, डान्सर आणि कोरिओग्राफर गश्मीर महाजनी आहे.
गश्मीर फक्त अभिनयातच नाही तर डान्समध्ये देखील कुशल आहे. एवढेच नाही तर तो एक उत्तम कोरिओग्राफर देखील आहे. या नव्या भूमिकेबद्दल बोलताना गश्मीर म्हणतोय, "हा माझा पहिलाच डान्स रिऍलिटी शो आहे ज्यात मी सहभागी होतोय आणि ते देखील परीक्षकाच्या भूमिकेत, याचा मला खूप आनंद आहे. हा कार्यक्रम स्वीकारण्यामागे महत्वाचं कारण म्हणजे लहान मुलांसोबत होणारं इंटरॅक्शन. माझं लहान मुलांसोबत कनेक्शन खूप छान जुळतं. त्याचसोबत या कार्यक्रमात मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर काम करताना दिसेन.'
पुढे तो म्हणाला, 'आतापर्यंत प्रेक्षकांनी मला विविध चित्रपटांत पाहिलं आहे. मी फक्त अभिनेताच नाही तर डान्सर आणि कोरिओग्राफरसुद्धा आहे. त्यामुळे अनेकदा मला विचारणा व्हायची की मी डान्सशी निगडित काही करणार आहे का? तर आता ती वेळ आली आहे. प्रेक्षकांची इच्छा होती मला डान्सशी निगडित काहीतरी करताना पाहायची ती आता पूर्ण होईल कारण प्रेक्षकांना या कार्यक्रमात मी परीक्षण करताना, कधीतरी थिरकताना आणि डान्सशी संबंधित बोलताना दिसेन. या कार्यक्रमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्याचं माझं ध्येय आहे, तर लवकरच भेटू डान्स महाराष्ट्र डान्समध्ये.' २७ जुलै पासून बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता झी मराठीवर हा कार्यक्रम प्रक्षेपित होणार आहे.