ठाण्यात विहिरींच्या पुनरुज्जीवनाला प्रारंभ

१०० हून अधिक जुन्या विहिरींच्या पुनरूज्जीवनासाठी राज्य सरकारकडून ५० कोटींचा निधी पहिल्या टप्प्यात ५ कोटींचा निधी ठाणे महापालिकेकडे वर्ग

    13-Jul-2022
Total Views |

thane
 
 
ठाणे: ठाणे शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. महापालिकेकडून होणारा पाणीपुरवठा अपुरा असून अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे पाणी बंद राहते किंवा एप्रिल-मे महिन्यात पाणी कपातीला तोंड द्यावे लागते, अशा वेळी टँकरचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुनरूज्जीवित कराव्यात, या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्रोत जपले जावेत, भविष्याच्या दृष्टीने हे पाणी उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफसफाई करून नैसर्गिक व पिण्यायोग्य पाणी निर्माण करण्यासाठी तसेच विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्रोत जीवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला असून त्यापैकी पाच कोटी ठाणे महापालिकेकडे वर्ग केले आहेत. दरम्यान, दै. ‘मुंबई तरुण भारत’ने ठाण्यातील विहिरींच्या पुनरुज्जीवनाचा प्रश्न लावून धरला होता.
 
  
वाढत्या नागरीकरणात शुद्ध पाणी ही काळाची गरज आहे. शहरात अनेक ठिकाणी पूर्वीच्या विहिरी बुजवल्या गेल्या आहेत. काही विहिरी १०० वर्षं जुन्या आहेत. काही ठिकाणी विकासकांनी विहिरी आपल्या कामासाठी बुजवल्या आहेत. काही ठिकाणी कचराकुंडी म्हणून विहिरीचा वापर होतोय. काही भागात मूर्ती विसर्जनासाठी विहिरींचा वापर केला जातो, तर काही विहिरींमध्ये चक्क सांडपाणी सोडून विहिरी प्रदूषित केल्या गेल्या आहेत, अशा बहुतांश सगळ्या विहिरी घाण झाल्या असून, पाण्याला दुर्गंधी येते. हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद होत चालले आहेत. पाण्याचे महत्त्व ओळखून नैसर्गिक स्रोत टिकवून ठेवणे आणि विविध संवर्धन प्रकल्प हाती घेणे आवश्यक असून त्यामुळे आता सर्व विहिरींचे पाण्याचे नैसर्गिक स्रोत जीवंत केले जातील व या पाण्याचा उपयोग नागरिकांना दैनंदिन जीवनात व्हावा. यासाठी आमदार प्रताप सरनाईक यांनीही सरकार दरबारी पाठपुरावा केला होता. त्यांच्या या मागणीला यश आले असून, राज्य सरकारने या कामास निधीसह मंजुरी दिली आहे.
 
 
त्यानुसार, ठाणे शहरातील जवळपास १०० हून अधिक विहिरींची टप्प्याटप्प्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जीवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. त्यापैकी चालू आर्थिक वर्षामध्ये पहिल्या टप्प्यात पाच कोटी रुपये इतका निधी महापालिकेकडे वर्ग झाला असून हे काम लवकरच सुरू होईल, असे आ. सरनाईक यांनी सांगितले. दरम्यान, राज्य सरकारकडून याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध झाला असून आ. सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले.
 
 
नळ योजनेआधी विहिरीचेच पाणी
२००९ मध्ये महापालिकेने केलेल्या सर्वेक्षण अहवालानुसार,नौपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत १५० विहिरी आणि १६ कूपनलिका आहेत. संपूर्ण महापालिका क्षेत्रात ५५५ विहिरी आहेत. पूर्वी ठाणे महापालिका हद्दीतील जुन्या वस्त्या, गावठाणे, आदिवासी पाडे आणि कोळीवाड्यांची तहान भागवण्याचे काम विहिरी करीत होत्या. लोकमान्यनगर, उपवन, येऊर, माजिवडा, कासारवडवली, मोघरपाडा, घोडबंदर रोड येथील काही पट्टा हा आदिवासी भाग असून येथे अनेक वर्षांपूर्वी महापालिकेची पाणी योजना नव्हती. तेव्हा लोक पिण्यासाठी विहिरींचे पाणीच वापरायचे.
 
 
विहिरींच्या संवर्धन प्रकल्पात नेमके काय?
विहिरींच्या संवर्धन प्रकल्पात सर्व विहिरींची खोदाई करून साफसफाई केली जाईल. विहिरी या पाण्याच्या स्थानिक नैसर्गिक स्रोत असल्याने त्यातील पाण्याचे भूमिगत जलस्रोत (झरे) जीवंत केले जातील. विहिरीत सांडपाणी सोडले जात असेल, तर ते बंद केले जाईल. विहिरींमधील जलप्रदूषण पूर्णपणे थांबवून तेथे विहिरीचे कठडे नव्याने बांधणे तसेच आतून प्लास्टरिंग करणे, आदी कामे या संवर्धन प्रकल्पात केली जातील.