ठाणे: ठाण्यात पावसाचा ऊन-पावसाचा खेळ सुरू असून विश्रांती घेत घेत कोसळणार्या मुसळधार पावसाने ठाणेकरांची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली. रविवारी ३५ मिमी, तर सोमवारी संध्याकाळपर्यंत जेमतेम 30 मिमी पावसाची नोंद ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे झालेली आहे. मात्र, पडझडीच्या घटना अद्याप सुरूच आहेत. ठाणे महापालिकेच्या कोपरी प्रभाग समितीच्या जीर्ण इमारतीचा काही भाग कोसळला, तसेच ‘राबोडी ट्राफीक ऑफिस’वर आणि शासकीय वरिष्ठ अधिकार्यांच्या बारा बंगल्यात वृक्ष कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या पडझडीत कुणीही जखमी झाले नाहीत.
ठाण्यात हवामान विभागाने दि. ८ जुलैला ‘रेड अलर्ट’, तर त्यानंतर ‘ऑरेंज अलर्ट’ घोषित केला असतानाही पावसाने म्हणावा, तितका जोर धरला नव्हता. सोमवारीही सायंकाळनंतर धुवाँधार बरसणार्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. तरीही दिवसभरात शहरात पडझडीच्या घटना सुरूच होत्या. यापूर्वी शनिवारी ठाण्यात मजल-दरमजल करीत पडणार्या पावसाची नोंद ३५.०१ मिमी झाली असून, नऊ झाडे आणि नऊ झाडाच्या फांद्या पडण्याच्या घटना घडल्या. रविवारी ३५ मिमी पाऊस पडला असून सात झाडे पडली. आणि ११ ठिकाणी फांद्या तुटून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी ठाण्यात दिवसभर पावसाचा जोर कमी होता. परंतु, सायंकाळनंतर जोरदार वर्षाव झाला. यात सात झाडे आणि पाच ठिकाणी फांद्या पडल्याच्या घटना घडल्याची नोंद ठाणे मनपा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केल्या आहेत.
कोपरी प्रभाग समिती इमारतीची पडझड
ठाणे महापालिकेच्या पूर्व भागातील कोपरी प्रभाग समितीची तीन मजली इमारत ३५ वर्षे जुनी असून धोकादायक अवस्थेत आहे. २०१८मध्येही या इमारतीच्या जिन्याचा काही भाग कोसळला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास इमारतीच्या बाहेरील सज्जा जवळील मोठा भाग अचानक कोसळल्याने हाहाकार उडाला. प्रभाग समितीच्या प्रवेशद्वारानजीक पावसासाठी उभारण्यात आलेल्या शेडवर हा इमारतीचा सज्जा कोसळला. यात सुदैवाने कुणी जखमी झाले नसले, तरी शेडखाली ‘पार्क’ केलेल्या एका चारचाकीचे आणि दुचाकीचे नुकसान झाले. दरम्यान, या दुर्घटनेची पाहणी आयुक्त डॉ. विपीन शर्मा व अन्य अधिकार्यांनी करून तत्काळ कार्यवाहीचे निर्देश दिले.
शासकीय विश्रामगृहाच्या आवारातील झाडे धोक्याच्या छायेत
ठाणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या एकमेव शासकीय विश्रामगृहाच्या आवारात असलेले सात ते आठ वृक्ष धोक्याच्या छायेत आहेत. येथील वृक्षांची छाटणीच झाली नसल्याची तक्रार आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे करण्यात आली आहे. त्यामुळे ठाणेकरांवर धोक्याची टांगती तलवार आहे.