निष्ठा यात्रा

    11-Jul-2022
Total Views |

thakre
 
निष्ठा यात्रेनिमित्त ‘छोटे साहेब’ अर्थात आदित्य ठाकरे शिवसेनेच्या २३६ शाखांमध्ये जाणार आहेत. यावर लोकांच्या विविध प्रतिक्रिया आहेत. ’अब पछताये होत क्या? जब चिडीया जुग गई खेत’, असे लोक म्हणत आहेत. काही लोक म्हणत आहेत, ‘बुंद से गई वो हौदसे नहीं आती।’ अर्थात लोकांचे काय, काहीही म्हणतात. पण खरेच निष्ठा यात्रेचे प्रयोजन काय असावे? काही का असेना? या निमित्ताने छोट्या साहेबांना आणि त्यांच्या सोबत असणार्‍या मोठ्या अनुभवी कार्यकर्त्यांना वस्तीपातळीवरचे खरे स्वरूप समजेल. जग खूप मोठे आहे आणि इथे प्रश्नच प्रश्न होते आणि आहेत. अडीच वर्षाच्या सत्ताकाळात आपण या प्रश्नांना न्याय देऊ शकत होतो किंवा कार्यकर्त्यांसाठी आपण काय करू शकलो असतो आणि काय केले, याबद्दल बराच सत्य अहवाल छोट्या साहेबांना मिळू शकतो.
 
कोरोना काळात घरचे सदस्य गमावलेल्या कुटुंबाचे काय मत आहे, छोट्या साहेबांना कळावे. अर्थात, ही अपेक्षा जास्तच होईल.
आता साहेब येणार म्हणजे कार्यकर्ते काय करणार? सर्वसामान्य व्यक्तीच्या नजरेतून पाहिले, तर जाणवेल की आदित्य ठाकरेंची यात्रा काय किंवा कोणत्याही राजकीय पक्षाची यात्रा असताना त्या-त्या पक्षाचे नेते कोणत्याही वस्तीत गेले तर काय होते? तर त्या पक्षाचे संबंधित स्थानिक कार्यकर्ते नेत्यासमोर पक्षाची प्रतिमा ‘ऑल इज वेल’ अशीच रंगवतात. पक्षाने, नेत्याने लोकांना स्वर्गच मिळवून दिला, असे खात्रीने सांगतात. त्या दौर्‍यात तिकीट किंवा छोटेसे पद मिळण्यासाठीही कार्यकर्ते आपण किती निष्ठावान आहोत, हे दाखवण्याची स्पर्धा करतात. नेत्यावर, त्या पक्षावर आपण खूप खूश आहोत, असे सांगणारे लोकही तिथे आणले जातात. यात एखादी महिला, एखादा वृद्ध आणि मुस्लीम व्यक्ती असतेच असते. नव्हे पक्षाबद्दल चांगले वातावरण आहे, असे सांगण्यासाठी या तीन वर्गवारीमध्ये लोकांना, त्या नेत्यासमोर उभे केले जाते. हे सत्य आहे. आता आदित्य ठाकरे यांच्या निष्ठा यात्रेेत यापेक्षा काही वेगळे होणार का? जाऊ दे आपल्याला काय म्हणा? पण यानिमित्ताने आदित्य ठाकरे यांना मुंबईतील वस्तीपातळीवरील रस्ते, नाले, स्वच्छता या गोष्टीची, मुंबई महानगरपालिकेच्या कार्याची माहिती कळेल. त्यातून त्यांना आमची लाडकी मुंबई कशी जगते हे कळले, तरी खूप आहे.
 
दिल्ली दूर है...
सध्या देशात आणि जगातही खूप काही घडत आहे. मात्र, याबाबत गांधी परिवाराचे एकही उद्गार ऐकायला मिळाले नाहीत. सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाराष्ट्रात कशीबशी सत्ता मिळवली. मणिकांचन सत्तेचा योग आला. पण अशीही कशीबशी मिळवलेली सत्ताही गेली. त्या सत्तेबद्दलही गांधी कुटुंबीयांचे ‘ब्र’ वाक्य नाही. उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सहकारी आपल्याला दिल्लीचे समर्थन आहे, असे मानत होते. संजय राऊतांनी, तर अख्ख्या महाराष्ट्राचे शिव्याशाप खाऊनही दिल्लीच्या गांधी आणि महाराष्ट्राच्या पवार कुटुंबीयांची स्तुती करणे सोडले नाही. सत्ता गेली तरीसुद्धा... मात्र, नेहमीच या न त्या कारणाने आपले बाळबोध मत व्यक्त करून त्या आड अतिशय बेरकी चाल खेळणारे राहुल गांधींनी याबाबत मूग गिळले.
 
महाराष्ट्रातली सत्ता गेल्यावर काँग्रेस पक्षाने इतकी भयाण शांतता का पाळावी? काहींचे म्हणणे त्यांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ सुरू आहे. काही म्हणतात, ‘हेरॉल्ड’ प्रकरणामुळे ते व्यस्त आहेत. सेनेतल्या ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंना ‘जय महाराष्ट्र’ केला. महाराष्ट्रात सत्तांतर घडून आपल्या हातचे एक राज्य गेले, याबद्दल राहुल गांधी यांनी मौन बाळगले. ते फक्त महागाई आणि ‘अग्निपथ’ मुद्द्यावरच बोलतात. सहयोगी शिवसेना पक्षाबद्दल काहीच बोलत नाही. का? यावर काही अभ्यासकांचे म्हणणे आहे की, मुस्लीम समाज हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारवर्ग. मात्र, अडीच वर्षांच्या सत्ताकाळात शिवसेनेमध्ये अनेक लोक असे तयार झाले की, ते काँग्रेसलाही लाजवेल असे मुस्लीम तुष्टीकरण करू लागले. आपला हक्काचा मतदार शिवसेनेकडे वळला, याबद्दल काँग्रेसमध्ये कमालीची चिंता होती. मात्र, आमदार फुटताच शिवसेना नेतृत्वाने औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर केले. त्याबरोबर सेनेकडे वळलेल्या मुस्लीम मतदारातील मोठा वर्ग पुन्हा काँग्रेसकडे वळला. अशा प्रकारे काँग्रेसचा सुंठी वाचून खोकला गेला. त्यामुळे ‘रात गई बात गई’ या न्यायाने काँग्रेस पुन्हा नवा डाव खेळण्याच्या विचारात असेल. अर्थात, तोही रडीचाच असेल हे नक्की. असो. या सगळ्या घटनाक्रमात एक मात्र नक्की वाटते की, कुठच्या तरी सर्वेक्षणात पहिल्या पाचात ‘बेस्ट’ ठरणे आणि आपल्याच लोकांमध्ये ‘बेस्ट’ असणे, यामध्ये खूप अंतर आहे. हे अंतर मोदींनी पार केले आहे. बाकी इतरांसाठी दिल्ली दूर हैं...
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.