मुंबई : रालोआ प्रणित राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार दौपदी मुर्मंना पाठींबा देण्याच्या निर्णयासाठी घेण्यात आल्याची माहिती खासदार गजानन किर्तीकर यांनी दिली. मूर्म यांना पाठींबा देण्याबद्दल उद्धव ठाकरे लवकरच याबद्दल अधिकृत भूमिका जाहीर करतील, असेही किर्तीकर म्हणाले. मातोश्रीवरील बैठकीत खासदारांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. बैठकीला नेमके किती खासदार उपस्थित होते याबद्दल किर्तीकर यांनी सुरुवातीला दोन जण अनुपस्थित तर नंतर चार खासदार उपस्थित नसल्याचे सांगितले होते.
मात्र, सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, तब्बल नऊ खासदारांनी या बैठकीला दांडी लावल्याची माहिती आहे. किर्तीकर म्हणाले, "श्रीकांत शिंदे आणि भावना गवळी हे दोन खासदार वगळता इतर सर्व खासदार उपस्थित होते. खासदार अनुपस्थित असल्याचे वृत्त साफ खोटे आहे. आम्ही सर्वजण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. आजच्या बैठकीत दौपदी मुर्मूंना पाठींबा देण्याबद्दल चर्चा झाली. मुर्मू एक वनवासी महिला आहेत, राष्ट्रपतीपदासाठी महिला उमेदवाराला पाठींबा द्यावा, अशी भूमिका शिवसेना घेईल.", असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या खासदारांचे मत हे दौपदी मूर्मूंना दिले जाईल, अशी भूमिका खासदारांनी घेतली आहे. याबद्दल अंतिम निर्णय उद्धव ठाकरेंनी घेणार असल्याचे सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचा विषय चर्चेसाठी नसल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेचे सर्व खासदार उद्धव ठाकरेंच्या पाठीशी आहेत. तसेच येणाऱ्या सत्राबद्दल आणि कामकाजाबद्दल बैठकीला चर्चा झाल्याचे म्हटले आहे.
किर्तीकर म्हणाले, "यापूर्वी युपीएच्या प्रतिभाताई पाटील तसेच प्रणव मुखर्जी यांनाही शिवसेनेतर्फे पाठींबा देण्यात आला होता. तशाच प्रकारे देशाच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.", असेही ते म्हणाले. शिवसेनेतून खासदार फुटीच्या वृत्तांचे त्यांनी खंडन केले. १२ खासदार शिवसेनेतून फुटणार नाहीत. सर्वच आमच्यासोबत आहेत. शिवाय भावना गवळींशीही संपर्क करण्याचा प्रयत्न आमच्याकडून झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
चार खासदार गैरजहर!
सुरुवातीला दोन खासदार गैरहजर आहेत, असे माध्यमांशी बोलताना किर्तीकर यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनतर त्यांनी चार खासदार गैरहजर असल्याचे सांगितले. त्यात भावना गवळी, श्रीकांत शिंदे यांच्यासह संजय जाधव प्रकृतीच्या कारणास्तव येऊ शकलेले नाहीत, असे ते म्हणाले.