नवी दिल्ली: राजस्थानच्या उदयपूरमधील कन्हैयालाल या शिवणकाम करणार्या हिंदूच्या शिरच्छेदाचे धागे आता इस्लामी कट्टरपंथी संघटना ‘एसडीपीआय’पर्यंत पोहोचले आहेत. ’एसडीपीआय’ अर्थात, ‘सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया’ एक राजकीय आघाडी असून ‘पीएफआय’ अर्थात ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या धर्मांध संघटनेला सुरक्षा देण्याचे तिचे काम आहे. उदयपूर प्रकरणातील सातवा आरोपी फरहाद मोहम्मद उर्फ बाबला याला अटक करण्यात आले आहे. ‘पीएफआय’ने नुपूर शर्मांविरोधात मोर्चादेखील काढला होता.
दि. २० जून रोजी नुपूर शर्मांविरोधात काढलेल्या ‘पीएफआय’च्या मोर्चादरम्यानच कन्हैयालाल तेली यांच्या हत्येची योजना तयार करण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे. उदयपूर हत्याकांडातील प्रमुख आरोपी रियाझ २०१९ साली ’एसडीपीआय’मध्ये सामील झाला होता. इतकेच नव्हे, तर तो ‘एसडीपीआय’चा सक्रिय सदस्यदेखील होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान बाबलाने आपण ’एसडीपीआय’ आणि ’पीएफआय’सारख्या संघटनांशी संबंधित असल्याचे कबूल केले आहे.
दरम्यान, उदयपूरबरोबर महाराष्ट्रातील अमरावतीमध्येदेखील कन्हैयालाल तेली यांच्या हत्येसारखीच हत्या झाली. इथे मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांना इस्लामी कट्टरपंथीयांनी नुपूर शर्मांचे समर्थन केल्याच्या आरोपावरुन गळा चिरुन मारुन टाकले. दोन्ही प्रकरणात आरोपींकडून जप्त केलेल्या ‘इलेक्ट्रॉनिक’ उपकरणांची तपासणी करुन परदेशातील संबंधांचीही चौकशी करण्यात येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार अमरावती घटनेचे धागेदोरेदेखील ‘एसडीपीआय’ आणि ‘पीएफआय’पर्यंत पोहोचत आहेत.
दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिमांनी उदयपूरसारख्या घटनांचा खुलेआम निषेध करावा. कारण, त्याविरोधात जनभावना संतप्त आहेत, असे आवाहन केले आहे. राजस्थान सरकारमधील मंत्री अशोक चांदना यांनी उदयपूर हत्याकांडाच्या आरोपींना फाशीची शिक्षाही कमी ठरेल, असे म्हटले आहे.
अनेक हिंसक घटनांत नाव
दरम्यान, ‘एसडीपीआय’ आणि ‘पीएफआय’ या संघटनांत बंदी घातलेल्या ‘सिमी’ संघटनेचे सदस्य, पाकिस्तानी दहशतवादी संघटना ’लष्कर-ए-तोयबा’कडून चालवल्या जाणार्या एहले-हदीत आणि सलाफी विचारधारेचे कट्टरपंथीय सदस्य आहेत. याआधी दिल्लीतील दंगलीपासून देशभरातील अनेक ठिकाणी हिंदूंवर केल्या गेलेल्या हल्ल्यांत ‘एसडीपीआय’-’पीएफआय’चे नाव समोर आलेले आहे. कानपूरमध्ये झालेल्या दंगलीतबी याच संघटनांचे नाव समोर आले होते.