अनिल देशमुखांचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला!

    11-Jul-2022
Total Views |

anil deshmukh


मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांचा जामीन सीबीआय विशेष न्यायालयाने फेटाळला. त्यांच्याविरोधात कथितरित्या शंभर कोटींच्या वसुली प्रकरणी ठपका केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागातर्फे (सीबीआय) ठेवण्यात आला आहे. देशमुखांचे माजी सचिव संजीव पांडे आणि कुंदन शिंदे यांचाही जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एसएच गलवानी यांनी तिघांचेही जामीन अर्ज रद्द करत असल्याचे म्हटले आहे.
 
 
देशमुख, पांडे आणि शिंदे यांनी सीबीआयने ६० दिवसांच्या मुदतीत आरोपपत्र सादर केले नसून सादर केलेल्या आरोपपत्रातही त्रुटी आढळल्याचे नमूद केले. या याचिकेत सीबीआयने महत्वाची चार्जशीट दाखल करतेवेळी महत्वाची कागदपत्रे सादर केली नसल्याचेही देशमुख यांच्या वकीलांनी निदर्शनास आणून दिले. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७३ अंतर्गत, आरोपीच्या अटकेपासून साठ दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करणे आवश्यक असून तसे न झाल्यास आरोपीला जामीन मागण्याचा अधिकार आहे, असा दावा देशमुख यांच्या वतीने करण्यात आला.
 
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मार्च २०२१ रोजी केलेल्या आरोपात माजी गृहमंत्री देशमुख यांनी पोलीसांना मुंबईतील हॉटेल्स आणि बारमालकांमार्फत दरमहा शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. त्यानंतर उच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकेनुसार या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. या तपासात देशमुख आणि त्यांच्या साथीदारांनी सत्तेचा गैरफायदा घेतल्याचा ठपका ठेवत चार्जशीट दाखल केले होते. याच प्रकरणात देशमुखांविरोधात मनी लाँण्ड्रींगचा गुन्हाही दाखल करण्यात आला होता. नोव्हेंबर २०२१मध्ये ईडीने अटक केल्यानंतर देशमुख हे न्यायालयीन कोठडीत आहेत.