बिहारमध्ये ‘करेक्ट’ कार्यक्रम...

    01-Jul-2022   
Total Views |

aimim
 
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचे रणकंदन सुरू असताना तिकडे बिहारमध्ये वेगळंच नाट्य पाहायला मिळालं. देशभरात हिंदूविरोधाची बीजे पेरत मुस्लीम मतासांठी आपल्या वाणीचा वापर करणार्‍या असदुद्दीन ओवेसी यांना जोरदार झटका मिळाला आहे. हा झटका दुसरा तिसरा कुणी नाही, तर त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी दिला आहे.
 
 
 
बिहारमधील ‘एआयएमआयएम’च्या पाच आमदारांपैकी तब्बल चार जणांनी लालूंच्या राष्ट्रीय जनता दलात प्रवेश केला आहे. बायसी, जोकिहाट, कोचाधामन, बहादुरगंज या विधानसभा मतदारसंघाच्या आमदारांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. २०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘एमआयएम’ने मुस्लीमबहुल सीमांचल भागात चांगले यश मिळवले. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात टीकेची संधी शोधणार्‍या ओवेसींना त्यांच्याच शिलेदारांनी दणका दिला. बिहारमध्ये पक्ष फुटला मात्र, देशभर आपणच मुस्लिमांचे तारणहार असल्याच्या आविर्भावात त्यांचा वावर आणि वक्तव्ये सुरू असतात. हे फुटलेले आमदार राष्ट्रीय जनता दलात गेल्याने नेहमीप्रमाणे भाजपवर आगपाखडही करता येणार नाही.
 
 
 
ओवेसींच्या भावाने महाराष्ट्रात येऊन औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहिली, राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला समर्थन दिले हे महाराष्ट्र विसरलेला नाही. एकूणच, हिंदूहिताच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करणार्‍या ओवेसींना फुटीर आमदारांनी आरसाच दाखवला. लालूंच्या पक्षाच्या कंदिलाच्या प्रकाशात हे फुटीर आमदार काय दिवे लावतील, हे सध्या अधांतरीच आहे. विशेष म्हणजे, हैदराबादनंतर बिहारमध्ये मिळवलेले यश हे मोठे होते. त्यानंतर त्यांनी पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेशकडेही मोर्चा वळवला. मात्र, तिथे डाळ शिजली नाही. उलटपक्षी १०० उमेदवार निवडणुकीत उतरवूनही ‘नोटा’पेक्षाही कमी मतं पदरात पडली आणि उरलीसुरली इज्जत धुळीस मिळाली. हैदराबादमध्ये दादागिरी चालते म्हणून देश काबिज करण्याचे दिवास्वप्न पाहणार्‍या ओवेसींना आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. पण, ते तसे करणार नाही. सोडून गेलेल्या त्या चार आमदारांना साधी पक्षनिष्ठा शिकवता येऊ नये, ही ओवेसींसाठी तरी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल. जहरी भाषणाने समाज उत्तेजित होतो, पण काही काळापुरता. त्याने मतपेटीतून यश पदरात पडत नाही.
 
राज यांना काय सांगायचंय?
 
 
 
महाराष्ट्रामध्ये राजकीय सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना या सगळ्यापासून राज ठाकरे काहीसे दूर होते. तब्येतीच्या कारणास्तव ते अनेक दिवसांपासून समोर आलेले नाही. मात्र, उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एक फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टमुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. “एखादा माणूस ज्या दिवशी आपल्या नशिबालाच स्वतःचं कर्तृत्व समजू लागतो, त्या दिवसापासून त्याचा र्‍हासाकडे प्रवास सुरू होतो,” असा आशय असलेली ही फेसबुक पोस्ट अनेक अर्थ सांगून जाते. केवळ या वाक्यातून राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाची भूमिका अगदी थोडक्यात स्पष्ट केली आहे. मात्र, प्रश्न हा आहे की, या पोस्टमधून राज ठाकरे यांना नेमकं काय सांगायचंय? आधी मशिदींवरील भोंगे आणि नंतर हनुमानचालीसापर्यंतची वाटचाल यामुळे मनसे आणि राज ठाकरे देशभरात चर्चेचा विषय ठरले.
 
 
 
मात्र, नंतर आजारपण,शस्त्रक्रिया यांमुळे पुन्हा हा विषय बाजूला पडला. त्यावेळी राज्याचे तत्कालीन पर्यावरणमंत्री तथा उद्धव ठाकरेंचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांनी मनसेला संपलेल्या पक्षाची उपमा दिली. त्यानंतर राष्ट्रवादीसह काँग्रेसनेही मनसेला लक्ष्य केले. मात्र, आता एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहे. नुसते मुख्यमंत्री नाही, तर संपूर्ण शिवसेना पक्षच ‘हायजॅक’ केला आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडल्याने व सेनेचा सच्चा शिवसैनिक एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्याने मनसेची ही फेसबुक पोस्ट खूप काही सांगून जाते. यामध्ये नशीब आणि कर्तृत्व या दोन गोष्टींवर भर देण्यात आला आहे. बाळासाहेबांचे खरे वारसदार म्हणून आजही राज ठाकरेंकडे पाहिले जाते. कारण भाषण, नेतृत्व, व्यंगचित्रांची आवड अशा अनेक गोष्टी बाळासाहेबांप्रमाणेच राज ठाकरेंकडे आहेत. परंतु, केवळ बाळासाहेबांचे पुत्र आहेत म्हणून सेनेची धुरा उद्धव यांच्याकडे आली. म्हणजेच, यामागे नशीब हा मोठा भाग होता. परंतु, राज ठाकरे यांनी डावलल्यानंतरही स्वतःचा पक्ष स्वतःच्या हिमतीवर उभा केला. आज काहीही म्हटलं तर राज्याच्या राजकारणात मनसेचीसुद्धा भूमिका डावलता येत नाही. एकूणच, नशिबाने पदरात पडलेल्या वारशालाच उद्धव स्वतःचे कर्तृत्व समजू लागले आणि र्‍हास सुरू झाला.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.