साहित्य‘वंदना’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-Jun-2022   
Total Views |
 
 
 
 
vanadana birvatkar mansa
 
 
 
 
 
ज्ञानदानासोबतच आपल्या व्यासंगी लेखनाने साहित्य क्षेत्रात झेंडा रोवलेल्या शिक्षिका वंदना बिरवटकर यांच्यविषयी...
 
 
भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी समर्पण वृत्तीने आणि सर्जनशीलपणे शैक्षणिक क्षेत्रात ज्ञानदानाचा वसा घेऊन शिक्षक काम करीत असतात. किंबहुना, राष्ट्रनिर्माणात शिक्षकांची भूमिका मोलाचीच असते. विद्यादानाचे कर्तव्य पार पाडण्याबरोबरच साहित्य क्षेत्रातही विहार करणार्‍या वंदना एकनाथ बिरवटकर यांच्या ‘काव्यवंदना’ आणि ‘हदन’ या दोन कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते नुकतेच मुंबईत झाले. कोरोना काळातील असह्य ‘लॉकडाऊन’ त्यांनी कविता रचून सुसह्य केला. घरबसल्या मनातील घालमेल, अस्वस्थता त्यांनी काव्यातून मांडली.
 
 
कोरोना काळात प्राणवायूसाठी सुरू असलेली घालमेल पाहून त्यांनी प्राणवायूविना ‘वसुंधरा गुदमरत आहे,’ असे समर्पक भाष्य एका कवितेतून मांडले आहे. अशा या हरहुन्नरी साहित्य ’वंदनेची’ दखल घेणे क्रमप्राप्त ठरते! रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील धामणी गावच्या वंदनाताई यांचा जन्म १९६५ साली मुंबईत झाला. विशेष कोडकौतुक झाले नसले तरी, त्यांचे बालपण मध्यम स्थितीत गेले. मुंबईतील परळ येथील शिरोडकर शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण, तर माध्यमिक आणि उच्चशिक्षणाचे धडेही मुंबईतच गिरवले. लहानपणी आई त्यांना नेहमी म्हणत असे, ‘मरावे परी किर्ती रूपे उरावे.’
 
 
या उक्तीचा प्रभाव वंदनाताई यांच्यावर पडला. आईचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून समाजात आपली किर्ती व्हावी, यासाठी काहीतरी करावे. या हेतूने त्यांनी लेखणीलाच आपले शस्त्र बनवून विविध दैनिके, साप्ताहिके तसेच दिवाळी अंकातून लेखन केले. याशिवाय विविध साहित्य समूहातून सातत्यपूर्ण लेखन केल्याचे त्या सांगतात. लहानपणापासूनच त्यांचे शिक्षिका होण्याचे स्वप्न होते. शिक्षण क्षेत्रात करिअर करणं हाच एक ध्यास त्यांना लागला होता. शिक्षक म्हणून मिळणारा नावलौकिक, मानसन्मान आणि विद्यार्जन व विद्यादान करणे ही त्यांची आवड बनली.
 
 
त्यामुळेच पदवीनंतर त्यांनी ‘एम.ए’, ‘बी.एड’ पूर्ण करून शिक्षकी पेशाला त्यांनी स्वत: वाहून घेतले. त्याकाळी आग्रीपाडा येथील ‘बीआयटी’ चाळीत अभ्यास करण्याकरिता देखील जागा नव्हती, तरी त्या छोट्याशा जागेत दिव्याच्या उजेडात अभ्यास करीत त्यांनी ‘बी.एड’ पूर्ण केले. लग्नानंतर पदरी दोन अपत्ये असतानाही त्यांनी शिक्षणक्षेत्राची कास मात्र सोडली नाही. २००३ साली बिरवटकर कुटुंब मुंबई सोडून ठाण्याचे रहिवाशी बनले. आजही कुटुंब सांभाळून घरातील सर्व कामे उरकून त्या शाळेतील नोकरी इमानेएतबारे करीत आहेत. पती एकनाथराव यांच्या विविध संघटनात्मक कामातही त्या हिरिरीने सहभाग घेतात. यशवंराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून योगाभ्यासाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नृत्य व नाटक बसविण्यात रसपूर्ण, उत्स्फूर्तपणे सहभाग त्या घेतात.
 
लेखनाबरोबर वाचन, संगीत, गायन आणि कबड्डी खेळ हे छंद त्यांना होतेच. पण, लेखनाचे बाळकडू घरातच मिळाल्याने घरबसल्या फावल्या वेळात काव्यरचना करणे, विविध मुद्द्यांवर लेख लिहिणे, हा जणू त्यांचा शिरस्ताच बनला. इथूनच त्यांची वाटचाल साहित्य पंढरीकडे सुरू झाली आहे. काव्यरचना क्षेत्रात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व साहित्यिक डॉ. लक्ष्मण शिवणेकर यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे तसेच तेच आपले काव्यगुरू असल्याचे वंदनाताई आवर्जून नमूद करतात. त्यांच्या कवितांमध्ये सकारात्मकता आहे. आपले अनुभव, सामाजिक जाणिवा यांच्यासह निसर्ग आणि ऋतूसोहळे त्यांच्या काव्यातून उमटतात. कवितेच्या प्रांतातील गझल, हायकू, अभंगवृत्त आदीसारखे सर्व प्रकार हातळणार्‍या त्यांच्या कविता संस्कारक्षम आणि उपदेशात्मक आहेत.
एक हाडाचा शिक्षक अथवा शिक्षणप्रेमी माणूस मरेपर्यंत शिकू शकतो, असे मानणार्‍या वंदनाताईंना ‘पीएच.डी’ करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा आहे. एक चांगली कवयित्री, साहित्यिक होण्याचाही मानस त्या व्यक्त करतात. नवीन पिढीला संदेश देताना त्या सांगतात, “एक जागृत व चांगले भारतीय नागरिक होऊन सतत सर्जनशील राहण्याचा उपदेश करतात. माणूस जन्माला येतो.” पण, माणुसकी निर्माण करावी लागते, असे मानणार्‍या वंदनाताई, विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता जागृत ठेवून नीतिमूल्यांची जोपासना करणारे आचारविचार अवलंबणारी सुसंस्कृत पिढी आपल्या हातून निर्माण होत असेल, तर तीच खरी समाजसेवा ठरेल. असे मानतात.
सतत नाविन्याचा ध्यास, क्रियाशीलता, वेळेचे महत्त्व, प्रामाणिक प्रयत्न आणि कष्ट हे त्यांच्या यशस्वितेचे मूलमंत्र असून या मूलमंत्रांमुळेच आजपर्यंत त्यांना कधीच अपयश आले नाही, परिस्थितीनुरूप अडचणी आल्या. परंतु, जिद्दीने त्यांचा सामना करून यश मिळविल्याचे त्या सांगतात. सध्या त्या मुंबईतील ग्रँट रोडच्या जे. डी. भरडा हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या आगामी साहित्यिक प्रवासाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@