घराबाहेर पडताना देश हाच धर्म : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे संभाजीनगरमधून संबोधन भाषणातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर उधळली स्तुतिसुमने

    09-Jun-2022
Total Views |


UT 3
 
 
 
  
 
संभाजीनगर : “बाळासाहेबांनी मुस्लिमांचा द्वेष कधी केला नाही. दुसर्‍या धर्मांचा आदर करणे, ही आम्हाला महाराजांनी दिलेली शिकवण आहे. प्रत्येकाने आपला धर्म हा घरात ठेवावा. घराबाहेर पडताना देश हाच आपल्या प्रत्येकाचा धर्म आहे,” असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर येथील सभेत केले.
 
 
 
‘पुन्हा एक टोमणे सभा’
 
उद्धव ठाकरेंच्या भाषणावर विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “बांधावरची मदत ज्यांना स्मरत नाही, पेट्रोल-डिझेलचे दर जे स्वत: कमी करीत नाही, त्यांनी दुसर्‍यांना ‘अच्छे दिन’ सांगावे, म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि...! माझे पुन्हा सवाल आहेत, शेतकर्‍यांना मदत केव्हा करणार? पेट्रोल-डिझेलचे दर केव्हा कमी करणार? असो, संभाजीनगरचे नामकरण, पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचे प्रश्न, विकासाची एखादी नवीन योजना... काही तरी ठोस मिळेल, अशी उगाच त्यांची अपेक्षा होती. पण, संभाजीनगरवासियांना मिळाले काय तर पुन्हा एकदा टोमणे आणि फक्त टोमणे!”
 
 
 
औरंगजेब नावाच्या जवानाने देशासाठी बलिदान दिले
 
“जो देशासाठी मरायला तयार असतो, तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचे हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करण्यास शिकवले नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाचे संरक्षण करता औरंगजेब नावाच्या जवानाने बलिदान दिले. त्याला आम्ही परके म्हणत नाही. तो आमचा आहे,” असेही विधान उद्धव ठाकरे यांनी केले. “सहा महिन्यांनी आपण मुंबईबाहेर आहोत,” असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले की, “शस्त्रक्रियेनंतर सहा महिन्यांनी मुंबईबाहेर आलो आहे. सर्वात अगोदर बाळासाहेबांचे प्रिय शहर म्हणून संभाजीनगरामध्ये आलो आहे.” पुढे ते म्हणाले की, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेले वचन मी कधीही विसरणार नाही. ते वचन पूर्ण केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. या शहराचे नामांतर करेल, पण संभाजी महाराजांनीदेखील आदर्श वाटेल असेल नगर मी करणार आहे.”
 
 
 
संभाजीनगरला पाणी देण्याचे प्रशासनाला आदेश
 
“गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजीनगरचा पाणीप्रश्न बिकट होता. संभाजीनगरमध्ये १९७२ मधील पाण्याची जुनी योजना सुरू करणार आहे. पाणी योजनेसाठी निधी पुरवणार आहे. कंत्राटदाराने हयगय केली, तर दया, माया दाखवणार नाही. एकही रूपया कमी पडू देणार आहे,” असेही ते म्हणाले.
 
 
 
२५ वर्षे जे वैरी होते, त्यांनी आम्हाला मानसन्मान दिला
“२५ वर्षे मांडीवर होते, ते आता उरावर बसले आहे. जे मित्र होते ते आता हाडवैरी झाले आणि वैरी होते ते मित्र झाले. २५ वर्षे जे वैरी होते त्यांनी आम्हाला मानसन्मान दिला,” असे म्हणत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर स्तुतिसुमने उधळली. तसेच भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, “एक जमाना होता की देशाच्या कानाकोपर्‍यात शिवसेना-भाजप राजकारणात अस्पृश्य होतो. कारण, हिंदुत्ववादी. २५-३० वर्षे तुम्ही आमचा उपयोग करुन घेतला आणि सत्ता आल्यावर शिवसेना खुपायला लागली,” असा सवालही त्यांनी यावेळी केला.