राष्ट्रभृत् यज्ञ, जयाहोम व अभ्यातनहोम

वैदिक विवाह (भाग-४)

    09-Jun-2022
Total Views |

vivaha
 
 
 
 
विवाह हा तर मानवी जीवनाचा महत्त्वाचा संस्कार. याच संस्काराच्या माध्यमातून वधू-वर आपल्या गृहस्थाश्रमाची सुरुवात करतात. मग अशावेळी अग्निहोत्र का नको? अग्नी म्हणजे प्रगतिशीलता. अग्नी म्हणजे उर्ध्वगमन. अग्नी म्हणजे प्रकाशाचे प्रतीक. म्हणूनच अग्निहोत्राविना हा मौलिक असा विवाह संस्कार कदापि पूर्ण होऊ शकत नाही.
 
 
 
वैदिक १६ संस्कार हे मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचे मानले जातात. अगदी गर्भाधान संस्कारापासून ते अंत्येष्टी संस्कारापर्यंतच्या सर्वच संस्कारांमध्ये यजमानांचे अतिशय जवळचे नाते कोणाशी असेल, तर ते म्हणजे अग्नीशी. कारण, अग्नीमध्ये दिल्या जाणार्‍या वैदिक मंत्रोच्चारणपूर्वक विभिन्न औषधी वनस्पतींच्या आहुतींमुळे वातावरण पवित्र, धार्मिक व मंगलमय बनते. त्याचबरोबर प्रदूषण दूर होऊन पर्यावरणाचे रक्षणदेखील होते. म्हणूनच प्राचीन ऋषिमुनींनी संस्कारांची परंपरा रुजवत असताना अग्निहोत्राला प्राधान्य दिले आहे. अग्निहोत्र नसेल तर संस्कारच नाही. कारण, यज्ञ किंवा अग्निहोत्र म्हणजे स्वर्गसुख देणारी अर्थातच विशेष सुखाच्या मार्गाने घेऊन जाणारी एक नौका आहे, असे शतपथ ब्राह्मण ग्रंथात म्हटले आहे.
 
 
 
नौर्ह वा जसा स्वर्ग्या,यदग्निहोत्रम् !
 
 
 
विवाह हा तर मानवी जीवनाचा महत्त्वाचा संस्कार. याच संस्काराच्या माध्यमातून वधू-वर आपल्या गृहस्थाश्रमाची सुरुवात करतात. मग अशावेळी अग्निहोत्र का नको? अग्नी म्हणजे प्रगतिशीलता. अग्नी म्हणजे उर्ध्वगमन. अग्नी म्हणजे प्रकाशाचे प्रतीक. म्हणूनच अग्निहोत्राविना हा मौलिक असा विवाह संस्कार कदापि पूर्ण होऊ शकत नाही. वधू-वरांचे विवाह मंडपात शुभागमन झाल्यानंतर पुरोहित संकल्पपाठ करवून बृहद्यज्ञाला प्रारंभ करतो. वधू-वरांचे मातापिता आपल्या कन्या व पुत्रांसमवेत बसून अगदी श्रद्धेने गाईचे तूप, समिधा व सामग्री यांच्या श्रद्धेने आहुती देतात. याच अग्निहोत्राच्या क्रमात तीन प्रकारचे विशेष यज्ञदेखील संपन्न केले जातात. याद्वारे नवदाम्पत्यावर एक मोठी जबाबदारी येऊन ठेपते. हे तीन अग्निहोत्र खालील प्रमाणे आहेत. १)राष्ट्रभृत् २) जयाहोम ३)अभ्यातनहोम विवाहाच्या विवेचनक्रमात या तीन यज्ञांचे स्वरूप व महत्त्व समजून घेणे गरजेचे ठरते. कारण, गृहस्थाश्रमी पती-पत्नींना आता केवळ स्वतःपुरता विचार करणे किंवा स्वार्थापोटी जगणे इष्ट ठरत नाही. ‘मी आणि माझे कुटुंब’ इथपर्यंतच आपल्या वैवाहिक जीवनाची लक्ष्मणरेषा ओढणे उचित नव्हे. आता यापुढे आपल्या ’स्व’चा विस्तार हवा. यासाठीच तर राष्ट्रभृत् यज्ञ. ‘राष्ट्रं बिभर्ति इति राष्ट्रभृत्।’ राष्ट्राचे भरणपोषण करण्याची जबाबदारी ही आम्हा नवदाम्पत्यावर आहे, हे अभिव्यक्त करणारा यज्ञ म्हणजेच राष्ट्रभृत् यज्ञ! केवळ भोगविलासात किंवा मौजमजा करण्यात वेळ घालवणे म्हणजे वैवाहिक जीवन नव्हे. आता आम्हाला देशाच्या सर्वांगीण प्रगतीचाही विचार करावयाचा आहे. या होमात जवळपास १२ मंत्र आले आहेत. यातील प्रत्येक मंत्रात ‘स न इदं ब्रह्म क्षत्रं पातु तस्मै स्वाहा।’ या मंत्रांशाची पुनरावृत्ती झाली आहे. म्हणजेच तो परमेश्वर, आम्हा सर्वांच्या ब्रह्म व क्षत्र या दोन शक्तींचे रक्षण करो. ब्रह्मशक्ती म्हणजेच समग्र देशाला संचालित करणारी ज्ञानशक्ती. राष्ट्र प्रगतिपथावर राहते, ते भौतिक, आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात मार्गदर्शन करणार्‍या ज्ञानवंत मंडळींमुळे! त्यांच्या दूरदृष्टीतून आणि व्यापक संकल्पनेतून देशाला नेहमी चांगले विचार व दिशा मिळत राहते. असे ब्रह्मतत्त्व जाणारे विद्वान, ब्राह्मण या देशात सतत वाढत राहोत.
 
 
 
अशा ज्ञानीजनांचे परमेश्वर रक्षण करो. केवळ आमच्या वैयक्तिक रक्षणाची काळजी वाहण्यात प्रयत्नशील राहणे म्हणजे स्वार्थ होय. म्हणूनच ब्रह्मशक्ती संरक्षिली जावी. त्याचबरोबर देशाच्या सीमारक्षणासाठी प्राणांची बाजी लावणारे शूर सैनिक व देश सांभाळणारे महान आदर्श नेते हे सर्व मोठ्या धाडसाने, त्यागाने व शौर्याने देशाच्या रक्षणासाठी पुढे सरसावतात. म्हणून अशा राष्ट्राला वाचविणार्‍या क्षत्रियांचेही रक्षण होणे गरजेचे आहे. राष्ट्रभृत् यज्ञाच्या निमित्ताने नवदाम्पत्याचे नाते राष्ट्राशी जोडण्याचा प्रयत्न होतो. आमच्यासाठी राष्ट्र हेच सर्वकाही आहे. देशात वावरणारे आम्ही नागरिक जर देशहिताचा विचार करीत नसू, तर मग आपला गृहस्थाश्रम काय कामाचा? नवदाम्पत्यास राष्ट्राचे भरण-पोषण करण्याकरिता संकल्पबद्ध होण्याकरिताच हा राष्ट्रभृत् यज्ञ! याच क्रमातील दुसरा यज्ञ म्हणजे जयाहोम! नवदाम्पत्याच्या जीवनी विजयाची भावना असावी. कितीही संकटे आली, दुःख व कष्टांचे पर्वत उभे राहिले किंवा नानाविध अडीअडचणी जरी निर्माण झाल्या, तरी आपले गृहस्थाश्रम सफल होण्यासाठी सदैव विजयाची भावना असावी. यात १३ मंत्रांच्या आहुत्या दिल्या जातात. आपले चित्त, मन, संकल्पशक्ती, ज्ञान, विज्ञान, मन तसेच वाणी हे सर्व विजयाच्या दिशेने मार्गक्रमण करीत राहोत.
 
 
 
हाच या मागचा उद्देश. आपल्या मनामध्ये विजयाचा भाव असेल, तर पराजय नेहमीच दुरापास्त होत राहील. म्हणूनच आत्मविश्वासाने विजयाचा संकल्प करावयास हवा. यामुळे आपले वैवाहिक जीवन यशस्वी ठरेल. तिसरा यज्ञ म्हणजे अभ्यातनहोम. अभ्यातन शब्दाचा अर्थ चौफेर प्रगती किंवा सर्वांगीण उन्नती असा होतो. गृहस्थाश्रमी दाम्पत्यांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक व आध्यात्मिक दृष्टीने विकसित व्हावयास हवे. जर आपला स्वतःचाच विकास नसेल, तर आपण राष्ट्राच्या विकासाबाबत कसे काय तत्पर राहणार? अभि + आ + तन म्हणजेच सर्वदृष्टीने समविकास! कोणत्याही क्षेत्रात आम्ही मागे राहणार नाही. अभ्यातन होमात १८ मंत्रांचा अंतर्भाव आहे. प्रत्येक मंत्रात ‘सा मा अवतु अस्मिन् ब्रह्मणि अस्मिन् क्षत्रे’ हा मंत्रांश समानतेने आला आहे. म्हणजेच तो महान परमेश्वर आमच्या ब्रह्मशक्तीला व क्षात्रशक्तीला सदैव सुरक्षित ठेवो. ज्ञान आणि शौर्य या दोन्ही गोष्टी माझ्यात विकसित होत राहोत. वरील तिन्ही यज्ञांमध्ये सुरुवातीला राष्ट्ररक्षण, विजयभावना व शेवटी वैयक्तिक सर्वांगीण विकास असा सुंदर क्रम आला आहे. एकीकडे राष्ट्रप्रेम तर एकीकडे व्यक्तिगत प्रगती आणि या दोन्हींच्या मध्यभागी विजयाची कामना. हा सुसंकल्प जर नवविवाहितांच्या अंत:करणात रुजला, तर निश्चितच त्यांचा गृहस्थाश्रम सर्वस्वी यशस्वी ठरलाच समजा. इतकी उदात्त संकल्पना केवळ वैदिक विवाह संस्कारातूनच झळकते.
 
 
 
-प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य