मुंबई : "अडीच वर्षांत जे जमले नाही ते आता करणार अशी आश्वासनाची गाजरे दाखवून मतदारांना भुलवून त्यांच्या खऱ्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करायचे हा पोरखेळ थांबवा आणि जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष द्या" असा घणाघात भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे गुरुवार दि . ८ जून रोजी सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणार असे औरंगाबादचे शिवसेना कार्यकर्ते सांगत फिरत आहेत. पण गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री असूनही उद्धव ठाकरेंना जे जमले नाही ते आता जमणार का ? असा सवाल केशव उपाध्ये यांनी केला आहे.
नामांतराच्या मुद्द्यावरून जनतेला भुलवत ठेवण्यापेक्षा औरंगाबाद शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे तो सोडवण्याकडे लक्ष द्यावे असा सल्ला उपाध्ये यांनी दिला आहे. औरंगाबाद शहरातील उद्योगधंदे हे तेथील स्थानिक गुंडांच्या खंडणीखोरीला, भ्रष्टाचाराला कंटाळली आहे, त्या गावगुंडांनी लवकरात लवकर वेसण घाला, सभेत हात फैलावून नुसतीच आश्वासनांची घोषणाबाजी करण्यापेक्षा खरोखरच कृती करण्याकडे लक्ष द्या असा खोचक सल्लाही केशव उपाध्ये यांनी दिला आहे. औरंगाबाद शहराच्या याच सर्व समस्यांवरून भाजपने विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले होते. आता तरी हे प्रश्न मार्गी लागावेत आणि प्रश्नांच्या जाचातून सुटका व्हावी अशी सामान्य नागरिकांची भावना आहे.