ठाणे : “मानधन, पेन्शन, मोबाईल व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्यावतीने येत्या २० जून ते २५ जूनपर्यंत यवतमाळ ते अमरावती असा १०० किलोमीटरचा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे. या लॉँग मार्चमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील हजारो अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार असून, हा लॉंग मार्च २५ तारखेला महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या अमरावती येथील कार्यालयावर धडकणार आहे,” अशी माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी मंगळवारी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी कर्मचारी आहेत. या कर्मचार्यांना शासकीय कर्मचार्यांचा दर्जा मिळावा, त्यांच्या मानधनात वाढ व्हावी, त्यांना पेन्शन योजना लागू करावी, अशा अनेक मागण्या अंगणवाडी कर्मचार्यांकडून होत आहेत, यासाठी अनेकदा आंदोलनेदेखील करण्यात आली, मोठमोठे मोर्चे काढण्यात आले. मात्र, राज्य सरकार अंगणवाडी कर्मचार्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास अपयशी ठरत असल्याने महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाने येत्या २० जून रोजी यवतमाळ ते अमरावती असा पायी लाँग मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. २० जूनला अमरावतीवरून या लॉंग मार्चची सुरुवात होणार असून १०० किलोमीटरचे अंतर पार करत २५ जूनला हा लाँग मार्च महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अमरावती येथील कार्यालयावर धडकणार आहे.
‘राज्य सरकारकडून फक्त आश्वासने दिली गेली’
“आमच्या मागण्यांसाठी आम्ही मुंबईत अनेकदा आंदोलन केले. मात्र, आमच्या मागण्या पूर्ण न करता राज्य सरकारकडून फक्त आश्वासने दिली गेली. त्यामुळे संबंधित खात्याच्या मंत्री यशोमती ठाकूर या अमरावतीत राहत असल्याने आम्ही त्यांच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाने तरी यशोमती ठाकूर आणि त्यांच्या सरकारचे लक्ष वेधले जाईल,” अशी अपेक्षा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम. ए. पाटील यांनी बोलून दाखवली.