मुंबई: भारतीय महिला क्रिकेट संघातील आक्रमक फलंदाज आणि माजी कर्णधार मिताली राजनं क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मिताली राज हिने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. ८ जून रोजी दुपारी निवृत्तीची घोषणा केली. २३ वर्षाच्या क्रिकेट विश्वातील कारकिर्दीला आता ब्रेक लागणार आहे.
"निळ्या रंगाची जर्सी घालून मी माझ्या देशाचे प्रतिनिधीत्व केले तेव्हा मी खुप लहान होते. प्रत्येक क्षण मला काहीतरी शिकवत गेला. गेली २३ वर्षे माझ्या आयुष्यातील आव्हानात्मक आणि आनंददायी क्षणांपैकी एक आहेत. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे. आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे." असे मिताली हिने आपल्या पोस्टद्वारे म्हटले आहे.
मिताली राजचे प्रमुख रेकॉर्ड्स
मितालीला लेडी तेंडुलकर म्हटलं जातं, कारण भारतासाठी वनडे आणि टी२० क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा तिनेच केल्या आहेत.
२०१७ महिला क्रिकेट विश्व चषकादरम्यान मितालीने सलग सात अर्धशतक लगावली असून अशी कामगिरी करणारी ती पहिलीच महिला क्रिकेटर आहे.
मितालीने एकाच संघासाठी सर्वाधीक वनडे सामने खेळले असून या सामन्यांची संख्या १०९ आहे.
मिताली विश्वचषक स्पर्धेत १,००० हून अधिक धावा करणारी पहिली भारतीय आणि पाचवी महिला क्रिकेटर आहे.
मितालीने वनडे सामन्यात सर्वाधिक रन केले असून २३२ सामन्यात तिने ७ हजार ८०५ रन केले आहेत.
मिताली आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात दोन हजार धावा करणारी पहिली महिला भारतीय क्रिकेटर आहे.
मिताली २० वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली महिला क्रिकेटर आहे.
२०० वनडे सामने खेळणारी एकमेव महिला क्रिकेट मितालीच आहे.
सहा एकदिवसीय वर्ल्ड कप खेळणारी मिताली एकमेव महिला क्रिकेटर आहे.
टेस्ट सामन्यात दुहेरी शतक ठोकणारी मिताली एकमेव भारतीय महिला क्रिकेटर असून २००२ साली तिने इंग्लंड विरुद्ध २१४ धावांची खेळी केली होती.