बासर एक दत्तधाम

    08-Jun-2022
Total Views |

dattadham 2
 
  
 
 
बासर येथे नुकताच श्रीदत्तमंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. दाक्षिणात्य धाटणीचे हे मंदिर म्हणजे एक पावन तीर्थस्थानच. त्याविषयी काही...
 
 
 
आपली भारतभूमी ही देवभूमी आहे. या भूमीवर अनेक संत-महंत, भगवंत यांनी वास्तव्य केले. भगवान श्रीदत्तात्रेय यांनी लोकोद्धारासाठी अनेक अवतार घेतले. दत्तावताराचे वैशिष्ट्य म्हणजे -
 
 
 
अवतार उदंड होती ।
सवेंची मागुती विलया जाती।
तैशी नव्हे श्रीदत्तात्रेय मूर्ति ।
नाश कल्पान्ती असेना॥
 
 
 
अशा अविनाशी श्रीदत्तात्रेयांचे अवतार असलेले श्रीनृसिंह सरस्वती स्वामी! ६०० वर्षांपूर्वी गोदावरी तटाक यात्रा करताना परमपवित्र अशा श्रीक्षेत्र बासर येथे आले. स्वामींनी बासर येथील प्राचीन, स्वयंभू दत्त मंदिरात अनुष्ठान केलं, श्रीगुरुचरित्र या मंत्रग्रंथातील १३ व १४व्या अध्यायातील कथा याच स्थानी घडलेल्या आहेत. ‘गंगातीरी वसे बासर’ असा उल्लेख श्रीगुरुचरित्रातील मेरुमणी असलेल्या १४व्या अध्यायात आहे. श्रीनृसिंह सरस्वती स्वामींचे परमशिष्य असणार्‍या श्री सायंदेवाची पहिली भेट येथेच झाली, असे हे परमपवित्र दत्तधाम शेकडो वर्षे दुर्लक्षित होते. श्रीगुरुमंदिर नागपूरचे प. पू. सद्गुरुदास महाराज यांना २०१२ साली दत्तजयंतीच्या पावनपर्वावर श्री नृसिंह सरस्वती स्वामी व श्री सायंदेव यांचा स्वप्नदृष्टांत झाला. त्या दृष्टांत आदेशाप्रमाणे हे स्थान उजेडात आणण्याचं मौलिक कार्य प. पू. सद्गुरुदास महाराजांनी केले, शिवाय बासर येथील श्रीदत्त मंदिराच्या जीर्णोद्धार केला. प. पू. सद्गुरुदास महाराजांचे सद्गुरु प. पू. विष्णुदास महाराजांच्या असीम कृपेने पूर्ण झाले. भव्य, अष्टकोनी, दाक्षिणात्य धाटणीचे मंदिर उभारण्यात आले. दत्तभक्तांच्या अनुष्ठानासाठी एक भव्य पारायण कक्ष, त्याचप्रमाणे भक्तनिवास, अन्नपूर्णाभवन उभारण्यात आले आहे.
 
 
 
ज्येष्ठ शु. षष्ठी, सप्तमी, अष्टमी म्हणजे ५ ते ८ जून या काळात श्री दत्तधाम पारायण कक्षाचे वास्तुपूजन, मूर्तिप्राणप्रतिष्ठापना सोहळा व साक्षात् श्रीनृसिंह सरस्वती स्वामींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या श्रीदत्त मंदिराचा भक्तर्पण सोहळा संपन्न होत आहे, या सोहळ्यास हंपीपीठ कर्नाटक येथील जगद्गुरु शंकराचार्य श्री विद्यारण्य भारती स्वामी, नारायण भारतीपीठ कंपाली येथील जगद्गुरु शंकराचार्य श्री नारायणविद्या भारती स्वामी त्याचप्रमाणे संकेश्वर करवीर पीठाचे मठाधिपती जगदगुरु शंकराचार्य श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती स्वामी या त्रैमूर्तींच्या दर्शनाचा लाभ भक्तांना एक आनंद पर्वणी आहे, श्रीक्षेत्र बासर हे महत्त्वपूर्ण दत्तधाम आहे, या स्थानी संपन्न होणार्‍या सोहळ्यास जे हजर राहतील, ते भाग्यवंत. श्रीगुरुचरित्रातील १४व्या अध्यायाचे स्थान ज्यांनी उजेडात आणून त्याचा जीर्णोद्धार करण्याचे मौलिक कार्य केले. त्या श्रीगुरुमंदिर नागपूरच्या प. पू. सद्गुरुदास महाराजांच्या सहस्रचंद्रर्शन आनंद सोहळासुद्धा या काळात दत्तभक्तांना अनुभवता येणार आहे, ज्यांनी देशविदेशात सुमारे ४०० केंद्रांच्या माध्यमातून दत्तभक्ती समाजमनात रुजवली. हजारो लोकांना शुद्ध उपासनेच्या मार्गावर घेऊन गेले अलैकिक गुणांनी अलंकृत असलेल्या प.पू.सद्गुरुदास महाराजांच्या दर्शनाचा लाभ दत्तभक्तांना होणार आहे. श्रीगुरुचरित्र ग्रंथाचा मेरुमणी १४व्या अध्यायाचं स्थानमहात्म्य दत्तभक्त जाणतात, त्याचा जीर्णोद्धार व लोकार्पण भव्य सोहळ्यास अनेक संत, सतपुरुष येणार, त्यांच्या उपस्थितीत दिव्य भावपूर्ण सोहळा अनुभवत संतपूजन, आशीर्वचन, धर्मकार्य करणार्‍यांचा सत्कार सोहळा असा दुर्मीळ योग जुळून आलेला आहे, या सोहळ्यास श्रीक्षेत्र बासर यास्थानी येणं, यासारखा निखळ आनंद नाही, या आगळ्या सोहळ्यात सहभागी व्हायला समस्त दत्तभक्तांना नक्कीच आवडेल, यात शंका नाही.
 
 
- कौमुदी गोडबोले