काश्मिरात १५ दहशतवाद्यांना अटक

पाकी कमांडर्सच्या होते संपर्कात

    08-Jun-2022
Total Views |

teroorist
 
 
 
 
 
श्रीनगर : दहशतवादी कारवाया घडविण्यासाठी पाकिस्तानी कमांडर्सच्या संपर्कात असलेल्या सुमारे १५ दहशतवाद्यांना जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. अलीकडील काळात काश्मिरात ज्या ‘टार्गेट किलिंग’च्या घटना घडल्या, त्या सर्व याच पाकी कमांडर्सच्या इशार्‍यावर झाल्याची माहिती पोलीस अधिकार्‍यांनी दिली. पाकिस्तानात बसलेले हे दहशतवादी कमांडर्स काश्मीर खोर्‍यातील आपल्या ‘स्लिपर सेल’च्या माध्यमातून दहशतवादी कारवाया करीत असून, अलीकडील काळात त्यांनी काही तरुणांना या ‘स्लिपर सेल’मध्ये भरती केले होते.
 
 
 
हे सर्वच तरुण विविध माध्यमांतून या कमांडर्सच्या संपर्कात असायचे आणि त्यांच्याकडून पुढील कारवायांसाठी आदेश प्राप्त करायचे. या कमांडर्समध्ये सजाद गुल, आशिक नेंगरू, अर्जुमंद गुलजारचा प्रामुख्याने समावेश असून, हे तिघेही अनेकदा काश्मिरात येऊन गेल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. या तिघांनाही केंद्रीय गृहमंत्रालयाने दहशतवादी म्हणून आधीच घोषित केले आहे. काश्मिरातील ‘स्लिपर सेल’ची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या विविध पथकांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली आणि सुमारे १५ दहशतवाद्यांना अटक केली, असे अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या आठवड्यात झालेल्या ‘आयईडी’ स्फोट प्रकरणात सहभागी असलेल्या चार दहशतवाद्यांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या स्फोटात लष्कराच्या एका जवानाला वीरमरण आले होते.