
चेन्नई : गेल्या काही दिवसांपूर्वी चित्रपटगृहात तीन चित्रपट प्रदर्शित झाले. विक्रम, सम्राट पृथ्वीराज आणि मेजर. सम्राट पृथ्वीराज आणि मेजर यांच्या तुलनेत कमल हसन यांच्या 'विक्रम' या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात जबरदस्त कमाई केली आहे. आज 'विक्रम'चा पल्ला २०० कोटींच्या घरात गेला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने ५८ कोटी रुपये कमावले होते.
चित्रपट समीक्षक रमेश बाला म्हणतात, “विक्रम चित्रपट २०२२ मधील ३ ते ४ दिवसांत सर्वाधिक कमाई करणारा तमिळ / कॉलीवुड चित्रपट आहे.” रमेश बाला यांच्या म्हणण्यानुसार , टॉप गन : मेवरिक (Top Gun: Maverick) आणि जुरासिक वर्ल्ड डोमिनियन (Jurassic World Dominion) यांच्या नंतर ' विक्रम' वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिस वर नंबर ३ वर आहे.
'विक्रम' चित्रपटाने सोमवारी अपेक्षेपेक्षा जास्त कमाई केली आहे. फक्त तामिळनाडूतच नाही तर बाहेर देखील ह्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मिळालेल्या अधिक सूत्राकडून असे समजते आहे की दाक्षिणात्य देशात ११ ते ११.२५ कोटी रुपये कमावले. तर पूर्ण भारतभरात १९ कोटींची कमाई झाली आहे. याशिवाय परदेशात देखील या चित्रपटाला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. जागतिक स्तरावर पाहायला गेले तर या विक्रम ने अवघ्या पाच दिवसात २०० कोटी कमावून 'विक्रम' केला आहे.
कमल हसन यांच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन लोकेश कनगराज यांनी केले आहे. कमल हसन याने एक रिटायर रॉ एजेंटचे पात्र साकारले आहे. कमल हसन सोबत ह्या चित्रपटात विजय सेतुपती आणि फहद फासिल देखील प्रमुख भूमिका साकारत आहेत.