नवी दिल्ली: मोहम्मद पैगंबरांवरील कथित आक्षेपार्ह वक्तव्यासंदर्भातील ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशन’ (ओआयसी)च्या विधानाचा भारताने कठोर शब्दांत निषेध केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी या प्रकरणातील ‘ओआयसी’ सचिवालयाचे विधान विभाजनवादी असल्याचे ठणकावले आहे. या वादात कतर, कुवेत, इराणनंतर पाकिस्तान व सौदी अरेबियानेदेखील उडी मारली आहे. भारताने पाकिस्तानचे विधान हास्यास्पद असल्याचे सांगत स्वतःच्या घरातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवर लक्ष देण्याचा सल्ला दिला आहे.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबरावरील वक्तव्यानंतर खळबळ माजली आहे. आखातातील अनेक देशांनी या वक्तव्यावर आक्षेप घेतला व भारतीय राजदूतांना बोलावून नाराजी व्यक्त केली. तथापि, भाजपने सर्व धर्मांचा सन्मान करतो, असे सांगत नुपूर शर्मा यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे.
तत्पूर्वी ‘ओआयसी’ सचिवालयाने ट्विटरवर अनेक ट्विट करत नुपूर शर्मांच्या वक्तव्यावर कठोर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ओआयसी’ महासचिवांनी भारतातील सत्तधारी भाजपच्या एका सदस्याने केलेल्या वादग्रस्त विधानावर कठोर टीका केली आहे. भारतात मुस्लिमांविरोधातील हिंसाचारा वाढ झाली आहे, असे सांगतानाच शैक्षणिक संस्थांतील ‘हिजाब बंदी’ आणि मुस्लिमांच्या मालमत्तेला हानी पोहोचवली जात असल्याचे उल्लेख करत मुस्लिमांवर बंधने लादली जात असल्याचे म्हटले आहे.
‘ओआयसी’च्या विधानावर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, “आम्ही या संघटनेने भारताविषयी केलेली विधाने पाहिली आहेत. भारत सरकार ओआयसी सचिवालयाच्या चुकीच्या आणि संकुचित विधानांना फेटाळते. भारत सरकार सर्व धर्मांना सर्वोच्च सन्मान देते. काही लोकांनी एका धार्मिक व्यक्तिमत्त्वला अपमानित करत आक्षेपार्ह ट्विट व वक्तव्य केले होते. हे वादग्रस्त वक्तव्य भारत सरकारचे भूमिका नाही. आरोपींविरोधात संबंधित संघटनेने कठोर कारवाई केली आहे.”
बागची पुढे म्हणाले की, “ ‘ओआयसी’ सचिवालयाने पुन्हा एकदा विशिष्ट विचाराने प्रेरित, दिशाभूल करणारे आणि खोडसाळपणाचे आहे, हे दुर्दैवी आहे. हा केवळ स्वार्थासाठी चालवला जाणारा विभाजनवादी अजेंडा आहे. आम्ही ‘ओआयसी’ सचिवालयाला आपला जातीय दृष्टिकोन बदलण्याची आणि सर्व धर्मांचा सन्मान करण्याचे आवाहन करतो.”
दरम्यान, नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावरुन पाकिस्तानने सोमवारी इस्लामाबादेतील भारतीय दूतावासाच्या प्रभारींना नोटीस दिली. पाकिस्तान वादग्रस्त वक्तव्य सहन करणार नाही. तसेच आम्ही या वक्तव्याचा कठोर निषेध करतो. यामुळे फक्त पाकिस्तानच नव्हे, तर जगभरातील मुस्लिमांच्या भावनांना ठेच पोहोचली आहे, असे पाकिस्तानने यावेळी म्हटले. तत्पूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनीही रविवारी नुपूर शर्मांच्या वक्तव्याचा निषेध केला होता.
कतार, कुवेत व इराणने नुपूर शर्मांच्या वक्तव्यावर याआधीच अधिकृतरित्या आक्षेप घेतला होता, पण सोमवारी यात सौदी अरेबियाही सहभागी झाला. अधिकृत विधान जारी करत सौदी अरेबियाने आपला आक्षेप नोंदवला. तथापि, सौदी अरेबियाने नुपूर शर्मांविरोधातील कारवाईचे स्वागत केले आहे.
दरम्यान, पाकिस्तानच्या विधानावर तिखट शब्दांत प्रतिक्रिया देत भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, आम्ही पाकिस्तानचे म्हणणे पाहिले. अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे सातत्याने हनन करणार्यांच्या खोडसाळपणाचा कोणावरही काहीही परिणाम होत नाही. त्याला एखाद्या दुसर्या देशात अल्पसंख्याकांवर होणार्या व्यवहारावर मत मांडण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानमध्ये हिंदू, शीख, ख्रिस्ती आणि अहमदी व अन्य अल्पसंख्याकांचे पुरावे जगच देत आहे. भारत सरकार सर्व धर्मांचा सर्वोच्च सन्मान करते. याउलट पाकिस्तानमध्ये कट्टरपंथीयांची प्रशंसा करत त्यांचे स्मारक उभारले जाते. आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की, त्या देशाने धोकादायक प्रचार करणे आणि भारतात जातीय विद्वेष पैदा करण्याच्या प्रयत्नांऐवजी आपल्या देशातील अल्पसंख्याकांची सुरक्षा आणि कल्याणावर लक्ष केंद्रित करावे, असे भारताने म्हटले आहे.
नुपूर शर्मांना धमकी, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
दरम्यान, मोहम्मद पैगंबरावरील वक्तव्याने वाद पेटल्यानंतर धर्मांध मुस्लिमांकडून नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. नुपूर शर्मा यांनी तसा दावा केला असून दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने नुपूर शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी देणार्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केल आहे. भारतीय दंड संहितेअंतर्गत धमकी देणे, तसेच महिलेचा अवमान या आरोपांखाली हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नुपूर शर्मा यांच्या ध्वनिचित्रफितीवर अज्ञातांनी दिलेल्या प्रतिक्रिया तसेच ट्विट्सचा आम्ही शोध घेत आहोत. तसेच या प्रकरणी आम्ही तपास सुरु केला आहे, असे पोलीस अधिकार्यांनी सांगितले आहे. नुपूर शर्मा यांनी एक ट्विट केले होते. या ट्विटमध्ये “माझा परिवार तसेच मला जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे,” असा दावा नुपूर शर्मा यांनी केला होता.