डोंबिवली ‘एमआयडीसी’ परिसरात नालेसफाईचा केवळ दिखावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    06-Jun-2022   
Total Views |

nala
 
 
 
 
डोंबिवली : कल्याण-डोंबिवली मनपा हद्दीतील बहुतांशी नाल्यांच्या अपूर्ण नालेसफाईने नागरिक त्रस्त आहेत. अनेक ठिकाणी साफसफाई झाली असली, तरीही ती केवळ तात्पुरत्या स्वरूपात व दिखाव्यापुरती केल्याचे दिसून येत आहे. डोंबिवली ‘एमआयडीसी’ परिसरातील कावेरी चौकाच्या मागे ‘आरएस ३७’च्या जवळ असलेल्या नाल्याची सफाई झालेली नसून गाळ आणि कचराही ‘जैसे थे’ आहे. ‘ओंकार शाळे’कडे जाणार्‍या या नाल्याच्या सफाईबाबतही साशंकता असून पावसाळ्यात नाल्यातील पाणी रहिवाशांच्या घरांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
 
 
कावेरी चौकापासून पुढे तीन बिल्डिंगकडे जाणार्‍या या नाल्यातील सांडपाणी आजूबाजूच्या परिसरात पसरते. तसेच, दुकानांमध्येही पाणी भरते. मागील महिन्यात आयुक्तांनी १९ मे रोजी नालेसफाईची पाहणी केली असता त्यांनी केवळ ३० टक्के नालेसफाई झाल्याची कबुली दिली होती. तसेच, दि. ३१ मेपर्यंत संपूर्ण नालेसफाई पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप नालेसफाई अपूर्णच आहे. काही ठिकाणी नालेसफाई झाली असली तरीही ती दिखाव्यापुरती केल्याचे म्हटले जात आहे. नालेसफाईदरम्यान काढण्यात आलेला गाळ उचलला गेला नसून तो नाल्याच्या बाजूलाच ठेवल्याने दुर्गंधी येते. त्यामुळे नालेसफाईचे नेमके गौडबंगाल अद्याप पडद्याआडच आहे.
 
 
 
नालेसफाई दिखाव्यापुरती
 
कावेरी चौक येथील नाल्यात कचरा आणि गाळ अद्याप आहे. नाल्याची सफाई दिखाव्यापुरती होते. मागील वर्षी पावसाळ्यात नागरिकांसह दुकानदारांच्या दुकानात पाणी भरले होते. त्यामुळे घरी सामान नेणेही नागरिकांना मुश्कील झाले होते.
- आशिष सोलकर, स्थानिक रहिवासी
 
 
 
गटारांचे बांधकाम चुकीच्या पद्धतीने
 
‘एमआयडीसी’ परिसरातील गटारे चुकीच्या पद्धतीने बांधली गेली आहेत. पावसाळा जवळ आला असूनही गटारांची सफाई झालेली नाही. गटारे आणि नाल्यातून काढलेला गाळ नाल्याच्या वर ठेवला जातो. त्यामुळे, पावसाने तो पुन्हा नाल्यात जाण्याची शक्यता आहे. चेंबरचे पाणी गटारात जाऊन नंतर सोसायटीत जाते. गटार आणि नाल्याची योग्यपद्धतीने सफाई करण्याची गरज आहे.
- नंदू परब, अध्यक्ष, भाजप डोंबिवली ग्रामीण मंडल
 
 
 
 
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@