मुंबई: या पुढे राज्यभरात ६ जून हा दिवस 'शिवस्वराज्य दिवस' म्हणून साजरा करण्यात असल्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. भगव्या ध्वजासह शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारुन त्यास अभिवादन करून राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताचे गायन करून हा दिवस साजरा होणार. राज्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषद कार्यालयांमध्ये सकाळी सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत राहून हा कार्यक्रम साजरा करावा असे आवाहन राज्यसरकारने केले आहे.
६ जून १६७४ या दिवशी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे पवित्र क्षेत्र काशी येथील विद्वान ब्राह्मण गागा भट्ट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा राज्याभिषेक केला आणि खऱ्या अर्थाने हिंदवी स्वराज्याची भगवी पताका मानाने फडकू लागली. या सोहळ्यासाठी ३२ मण सोन्याचे सिंहासन बनवले गेले होते. देशाच्या काना कोपऱ्यातून ब्राह्मण,विद्वान,श्रीमंत गणमान्य व्यक्ति, विदेशी व्यापारी, दुसऱ्या देशाचे प्रतिनिधि असे लाखभर लोक रायगडावर जमले होते. या दिवसाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी यापुढे राज्यभर हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्यात येईल.