प्रा. विश्वनाथ साबळे : राज्याचे १९वे कलासंचालक (आव्हाने आणि आवाहने)

    04-Jun-2022
Total Views |

Page-8


आता प्रा. साबळे यांच्याकडे राज्याच्या कलासंचालकपदाचा अतिरिक्त कारभार सोपविला आहे. त्यांना आता विश्वविख्यात ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या अधिष्ठाता पदाच्या मूळ जबाबदारीबरोबरच कलाविश्वाचे स्वतंत्र व्यासपीठ असणार्‍या कलासंचालनालयाची जबाबदारी आली आहे. तसे त्यांच्या नावातच ‘विश्व’ असल्यामुळे आणि ‘नाथ’ तर ते आहेतच. ते हा कलासंचालक पदाचा कारभार जबाबदारीने सांभाळतील, अशी आशा करायला हरकत नाही.
 
 
दि. १ जून हा दिवस महाराष्ट्राच्या कला इतिहासात नोंदला जाईल, असाच ठरला. २०१५ पासून दि. ३१ मेपर्यंतच्या प्रदीर्घ काळासाठी कला संचालनालयाला, कलाक्षेत्रातील अभ्यासक वा पदवीधर व्यक्ती कलासंचालक म्हणून देण्यात आली नव्हती. त्यामुळे कलाक्षेत्रातील अनेक प्रश्न प्रलंबित राहिलेले होते. १९६५ पासून अगदी ३१ मेपर्यंत एकंदर १८ कलासंचालक महाराष्ट्राला लाभले. त्यापैकी प्रा. वि. ना. आडारकर, प्रा. प्र. अ. धोंड, प्रा. माधव सातवळेकर, प्रा. हरिभाव हणमंते, प्रा. बाबुराव सडवेलकर, प्रा. शांतिनाथ आरवडे, प्रा. मुु. ना. नांगरे, प्रा. म. भा. इंगळेे, प्रा. हेमंत नागदिवे आणि प्रा. गो. गो. वाघमारे हे दहा कलाक्षेत्रातील कलासंचालक वगळले, तर तब्बल आठ वेळा कलाबाह्य व्यक्तींना कलासंचालकपदी नेमण्यात आलेले होते. १९६५ ते २०२२ या ७७ वर्षांच्या काळात जवळपास २१-२२ वर्षे हे कलाबाह्य व्यक्तीला नेमणूक देऊन कलासंचालनालयाचा कारभार पाहिला गेला. गणित विषय शिकविण्यासाठी भाषा शिक्षकाची नेमणूक करावी, तसा हा भाग होता. असो. त्यावर आपल्याला फारसं बोलता येणार नाही. बोलू पण नाही शहाण्या माणसाने. पण, आजचा विषयच असा आहे की, ज्यांना किमान चार ते पाच वेळा कलासंचालक पदाने हुलकावणी दिली होती, त्या प्रा. विश्वनाथ साबळे यांच्याकडे दि. १ जूनला कलासंचालकपदाचा एक वर्षासाठी किंवा पुढील अधिकृत नियुक्ती होत नाही, तोपर्यंत अतिरिक्त अधिभार सोपविण्यात आला आणि महाराष्ट्राच्या कलाजगताने सुटकेचा नि:श्वास सोडला. अमुक एकाला चांगलंं म्हणण्यासाठी, तमुक एकाला वाईट म्हणणं, ही झाली फारच बाळबोध बाब. आपल्या लेखात आपण या बाबींवर आपल्या लेखणीची शाई वाया जाऊ देणारच नाही. जी अनेक वर्षांपासून विशेषतः २०१५ पासून प्रलंबित राहिलेले महाराष्ट्रातील कलाक्षेत्रातील प्रश्न सोडवण्याचे भगीरथ प्रयत्न नवनिर्वाचित प्रभारी कलासंचालक प्रा. विश्वनाथ साबळे यांना करावे लागणार आहेत. तशा त्यांच्याकडून समस्त कलामहाविद्यालयांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. याचे कारण या लेखातून आपण साबळे यांच्याबद्दलची माहिती अवलोकिली की, ध्यानात येण्यास मदत होईल.
 
 
 
प्रा. विश्वनाथ साबळे हे ९०च्या दशकात ओतूर, जि. पुणे येथील संस्थापक असलेल्या विकास तांबे यांच्या कला महाविद्यालयात अध्यापक आणि प्राचार्य म्हणून अनुभव घेतलेले निसर्गचित्रकार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये स्वतःबद्दलची विशिष्ट प्रतिमा निर्माण होईल, असं त्यांचं कलाविद्यार्थ्यांबरोबरचं नातं असतं. तेथून ते पुण्याच्या ‘अभिनव कला महाविद्यालया’त कलाध्यापक म्हणून रूजू झाले. २००१ साली ते ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’मार्फत ‘अधिव्याख्याता’ म्हणून रूजू झाले आणि २००५ ला त्यांच्या प्रवर्गाच्या प्रोफेसरच्या जागेसाठी ते एकमेव अनुभवी मिळाल्यामुळे त्यांना ‘जे. जे. स्कूल’च्या प्राध्यापकपदाची प्रतिष्ठेची जागा मिळाली. शांत, कुणाच्या अध्यातमध्यात न जाता आपले काम आणि आपण, अशा स्वभावाचे साबळे यांच्याकडे एकदा ‘सर जे. जे. स्कूल’चा प्रभारी ‘चार्ज’देखील मिळाला. परंतु, पद-सत्ता अशा सत्तेच्या राजकारणात त्यांचा ‘चार्ज’ दुसर्‍या ज्येष्ठ प्राध्यापिकेस देण्यात आला. पुढे २०११ साली प्रा. विश्वनाथ साबळे हे अधिकृतपणे ‘सर जे. जे. स्कूल’चे अधिष्ठाता झाले. त्यानंतर त्यांनी ‘हा कंत्राटी, तो हंगामी’ असा भेदभाव कलाध्यापकांमध्ये न करता, सर्व कलाध्यापक हे समान आहेत, या न्यायाने ते सर्वांना वागणूक देत राहिले. विरोधालाही सामान्यपणे मानले, तर तो मावळतो. प्रा. साबळेंच्या विरोधातील छुपा वर्ग हळूहळू शांत झाला. दुष्टाला दातृत्वाने जिंकावे, या युक्तीचा त्यांनी फारच काळजीपूर्वक अवलंब केला असावा. कारण, एखादं फुटकळ उदाहरण वगळलं, तर त्यांनी त्यांच्या सहाध्यायींमध्ये आणि बर्‍याच कलाविद्यार्थ्यांमध्ये विश्वासाचे वातावरण तयार केले. मग बाहेरची कामे ‘जेजे’च्या बॅनरखाली घेऊन गरजवंत विद्यार्थ्यांना आणि इच्छुक कलाध्यापकांना देऊन त्यांनी जणू काही ‘कमवा आणि शिका’ योजनेप्रमाणे कामाच्या बदल्यात मोबदला मिळविण्याचे नवीन अंग तयार केले. त्या उपक्रमात नाराजांनी तक्रारीही केल्या. परंतु, प्रा. साबळेंनी ती प्रकरणं व्यवस्थित हाताळली. त्यांचा अधिष्ठाता पदाचा कार्यकाळ हा विविध कलाविषयक उपक्रमांनी सजलेला आहे. ‘वॉल पेंटिंग’पासून ‘म्युरल’पर्यंत आणि ‘फायबर मॉडेल्स’ पासून मूर्तिकामांपर्यंत विविध कामांमध्ये स्वतः आणि कलाध्यापकांसह निवडक कलाविद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन कलाकामे केलेली आहेत.
 
 
 
Painting
 
 
 
शैक्षणिक आस्थापना आणि प्रशासन कामात व्यस्त असतानाही त्यांनी स्वतःची कलासाधना अंतर न पडू देता सुरू ठेवली, त्यातूनच मुंबईत १९९९ साली ‘आर्ट प्लाझा गॅलरी’त पहिले एकल प्रदर्शन भरविले. पुढे ‘बजाज आर्ट गॅलरी’त २००० मध्ये, ‘आर्ट वॉक ओबेरॉय’ येथेही २००० मध्ये, पुण्याच्या ‘स्टुडिओ एस.आर्ट गॅलरी’त २००१ मध्ये आणि २०१० तसेच २०१७ मध्ये मुंबईच्या ‘जहांगिर आर्ट गॅलरी’त त्यांची एकल प्रदर्शन झालेली आहेत. सुमारे दहा समूह प्रदर्शनांमध्ये सहभाग घेतलेल्या प्रा. विश्वनाथ साबळे यांची कलाक्षेत्रातील कामगिरीदेखील कौतुकाचीच आहे. त्यांची अलीकडची कामे ही अमूर्त शैली प्रकारातील असून विशुद्ध रंगांचा उपयोग करीत ’होरायझन’ व्यापण्याची अद्भुत किमया त्यांनी साधलेली आहे. अ‍ॅक्रॅलिक रंगांच्या आकर्षक मिश्रणांच्या लेपनांवर लिसिडऑईल, टर्पेंटाईन, एन. सी. थीनर यांच्या उपयोगातून पोत निर्माण करण्याची त्यांची हातोटी, त्यांच्या प्रशासनातील कौशल्याप्रमाणेच सुप्त आणि थक्क करणारी आहे. त्यांच्या काही कलाकृती या जलरंगातील असून जलरंगाचे ‘फ्लो’, ‘पॅच’ आणि स्वयंभूपणे निर्माण होणारे आकार हे स्मृतिप्रवण असतात. त्यामुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता प्रा. साबळे यांच्याकडे राज्याच्या कलासंचालकपदाचा अतिरिक्त कारभार सोपविला आहे. त्यांना आता विश्वविख्यात ‘सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’च्या अधिष्ठाता पदाच्या मूळ जबाबदारीबरोबरच कलाविश्वाचे स्वतंत्र व्यासपीठ असणार्‍या कलासंचालनालयाची जबाबदारी आली आहे. तसे त्यांच्या नावातच ‘विश्व’ असल्यामुळे आणि ‘नाथ’ तर ते आहेतच. ते हा कलासंचालक पदाचा कारभार जबाबदारीने सांभाळतील, अशी आशा करायला हरकत नाही.
 
 
 
खरं म्हणजे अगोदरचे प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा यांनाच खरं श्रेय जातं, प्रा. विश्वनाथ साबळे यांच्याकडे कला संचालकपदाचा अतिरिक्त ‘चार्ज’ देण्याबाबतचं... आपल्या लेखात त्या मुद्द्यावर आपण प्रकाश टाकणार नाही. परंतु, सध्या सुरू असलेल्या ‘डिनोव्हा युनिव्हर्सिटी’ आणि राज्यस्तरीय जे. जे. स्वतंत्र्य युनिव्हर्सिटी अशा वादाच्या चर्चेत अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे यांची भूमिका ही राज्यातील कला महाविद्यालयांना आणि राज्यातील कला विद्यार्थ्यांना समाविष्ट करणारी ठरल्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच कला महाविद्यालयांनी त्यांच्या शासकीय ज्येष्ठतेच्या निकषांवर त्यांना कला संचालकपदी बसवावे, ही भूमिका पूर्वीच घेतलेली होती. त्यावरही साधकबाधक विचार होऊन प्रा. विश्वनाथ साबळे यांच्या गळ्यात कलासंचालक पदाची माळ पडली. आता त्यांना शालेय आणि महाविद्यालयीन कला शिक्षणाच्या बाबतीत कलासंचालनालयाची स्पष्ट भूमिका मांडून कलेचे उदात्तीकरण करावे लागणार आहे. ‘ड्राँईंग ग्रेड’ परीक्षा, उच्च कला परीक्षा, त्यांची नियमानुसार प्रमाणपत्रे याबाबतचे महत्त्व पुनर्स्थापित करावे लागणार आहे. पदविका अभ्यासक्रमांची झालेली चेष्टा संपविण्याचे काम करून पदविका अभ्यासक्रमांना विद्यापीठीय साच्यात बसवावे लागणार आहे. अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न जसे कालबद्ध पदोन्नती, सेवाज्येष्ठतेच्या नियुक्त्या, नामनिर्देशनानेनियुक्त्या, अध्यापकेतर कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या यासह सुधारित कला शिक्षणाचे अभ्यासक्रम, आधुनिक तंत्रज्ञानाबरोबर सांगड घालणारे तसेच ‘डिजिटलायझेशन’चे तंत्र, दृश्य कला प्रकारांमध्ये आणून कला विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणारे अभ्यासक्रम राबविणे, राज्याच्या कला आणि सांस्कृतिकतेच्या विविध उपक्रमांमध्ये कला संचालनालयाची उंची गाठण्यास भरीव मदत करणे, या व अशा अनेक कलाविषयक उपक्रमांना मूर्त व प्रभावी स्वरूपात ते आणू शकतात. कारण, ते सर्वांना मैत्रीपूर्ण वागवतात. सर्वांना विश्वासात घेतात, अशी त्यांची ओळख आहे.म्हणून त्यांना मिळालेल्या या संधीचे ते राज्यातील कला महाविद्यालयांसाठी सुवर्णाप्रमाणे अमूल्य योगदान देतील, अशी आशा करूया. त्यांच्या कुंचल्याप्रमाणेच त्यांचे प्रशासनातील कार्यातही सफाई व्हावी, त्यांच्या जलतरंगातील पारदर्शक रंगलेपनातील हुकमत त्यांच्या प्रशासकीय आणि आस्थापनेतील कार्यातही पारदर्शकता दाखविण्यात त्यांना यश मिळो आणि समस्त कला महाविद्यालयांचे अनेक वर्षांचे प्रलंबित प्रश्न हे मिटविता येऊन त्यांच्या अमूर्त पेंटिंगमधील विशुद्ध रंगांप्रमाणेच सर्व कला महाविद्यालयांना ऊर्जितावस्था लाभो, यासाठी त्यांना शुभेच्छा...!
 
 
 
- प्रा. डॉ. गजानन शेपाळ