कल्याण-डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

कल्याणमध्ये इमारत कोसळून एकाचा मृत्यू

    30-Jun-2022
Total Views |

building 
 
 
कल्याण : कल्याण पश्चिमेतील रामबाग लेन क्र.1 मध्ये बुधवारी इमारत कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही दोन मजली इमारत कोसळल्यानेे परिसरात खळबळ उडाली. या दुर्घटनेत एका व्यक्तीच्या मृत्यूसह एक जण जखमी झाला आहे. या धोकादायक इमारतीत सूर्यभान व उषा काकड हे दाम्पत्य झोपेत असतानाच हा प्रकार घडल्याने दोघेही ढिगार्‍याखाली अडकले. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. दोन इमारतींचा सामायिक जिना असल्याने मुख्य अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी व जवानांनी काकड दाम्पत्यासह लगतच्या इमारतीतील चार रहिवाशांना सुखरुप बाहेर काढले. परंतु, 52 वर्षीय सूर्यभान काकड यांचा जीव वाचू शकला नाही.
 
 
 
 
मात्र, उषा काकड यांना पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असून, सद्यःस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. ही इमारत तळ अधिक दोन मजल्याची असून, 1984 साली बांधण्यात आली होती. तळमजला रिकामा होता आणि दुसर्‍या मजल्यावर सूर्यभान काकड व उषा काकड हे दाम्पत्य भाड्याने राहात होते. सदर इमारत लोडबेअरिंग असून ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केलेली नव्हती. इमारत कोसळल्याचे वृत्त कळताच ‘ब’प्रभागाचे विभागीय उपायुक्त अतुल पाटील, साहाय्यक आयुक्त किशोर ठाकूर, सुधीर मोकल, प्रमोद पाटील, राजेश सावंत यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची समक्ष पाहणी केली.
 
 
 
 
दरम्यान, मनपा क्षेत्रातील 30 वर्षांहून जुन्या, धोकादायक, अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणार्‍या नागरिकांनी महापालिकेच्या नोंदणीकृत ‘स्ट्रक्चरल ऑडिटर’कडून आपल्या इमारतीचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करून घ्यावे. आवश्यकता भासल्यास याकामी स्थानिक प्रभागाच्या साहा. आयुक्तांशी संपर्क साधण्याचे आवाहन मनपामार्फत करण्यात आले आहे.