डेडलाईन उलटली; ३ दिवसांत नालेसफाई करा; अन्यथा महापालिकेत कचरा टाकणार!

नाल्यात उतरून मनसेकडून महापालिकेची ‘पोलखोल’

    03-Jun-2022
Total Views |
 
nala
 
 
ठाणे: ठाणे शहरात नालेसफाईची कामे ८० ते ९० टक्के पूर्ण झाल्याचा दावा ठाणे मनपाचे आयुक्त विपीन शर्मा यांनी केल्यानंतरही शहरातील अनेक नाले अद्याप तुंबलेलेच असल्याचे समोर आले आहे. ठाणे मनपा क्षेत्रात नालेसफाईत हातसफाई सुरू असल्याने याविरोधात आता मनसे आक्रमक झाली आहे. गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी कापूरबावडी येथील नाल्यात उतरून आंदोलन छेडले. तसेच, दि. ३१ मेची डेडलाईन उलटून गेली असून, आता येत्या तीन दिवसांत नालेसफाई न झाल्यास कचरा मनपा मुख्यालयात आणून टाकणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे.
 
 
“ठाणे मनपाने प्रभाग समिती निहाय नालेसफाईचे काम हाती घेतले असून, प्रभाग समितीचे अधिकारी आणि मनपा आयुक्त नाल्यांची पाहणी करण्यासाठी दौर्‍यामागून दौरे करीत आहेत. मनपा आयुक्त विपीन शर्मा यांनी दि. ३१ मेपर्यंत ठाणे शहरातील संपूर्ण नालेसफाई पूर्ण होईल, असा दावा करीत असताना आता २ जून उलटला तरी नालेसफाई कागदावरच आहे. नालेसफाई व्यवस्थित न झाल्याने मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी महाराष्ट्र सैनिकांनी ठाण्यातील विविध नाल्यात उतरून ठाणे मनपाच्या विरोधात घोषणाबाजी केली. मनपाकडून केलेली सफाई ही फक्त अधिकार्‍यांना दिखाव्यापुरती असून ठेकेदाराने नालेसफाई पुन्हा करावी,” अशी मागणीही यावेळी पदाधिकार्‍यांनी केली.
 
 
“नाले व्यवस्थित साफ न झाल्याने दरवर्षी पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याची चिन्हे आहेत. मुसळधार पाऊस झाल्यास पावसाचे पाणी नाल्याच्या बाहेर येऊन येथील स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. शहरात अनेक ठिकाणी कचरादेेेेखील साचला आहे. तेव्हा, हा कचरा हटवून येत्या तीन दिवसांत नालेसफाई पूर्ण न केल्यास नाल्यातील गाळ व कचरा पालिका आयुक्तांच्या दालनासमोर आणि मनपा मुख्यालयासमोर टाकण्यात येईल,” असा इशाराही यावेळी मनसे पदाधिकार्‍यांकडून देण्यात आला आहे.