मुंबई : नुपूर शर्मांचे समर्थन केल्याच्या आरोपावरून कट्टरपंथींनी उदयपूर घटनेपूर्वी महाराष्ट्रात अमरावतीमध्ये फार्मासिस्ट उमेश कोल्हेचीही हत्या केल्याचे उघड झाले आहे. "कुठलाही धर्मांच्या श्रद्धास्थानांबद्दल बोलणे चुकीचेच आहे पण महाराष्ट्रात हिंदूंना मारण्याची सूट मिळाली आहे का ?" असा घणाघाती सवाल भाजपचे आ. नितेश राणे यांनी मविआ सरकारला केला आहे. माविआ सरकराने हा विषय दाबून टाकला आहे असाही आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका विशिष्ट समाजाच्या श्रद्धास्थानांबद्दल काही वक्तव्ये केली होती, त्यामुळे त्यांना त्यांच्या पदावरून पायउतार व्हावे लागले होते. नुपूर शर्मा यांचे समाजमाध्यमांवर समर्थन केल्याचा आरोपावरून राजस्थानच्या उदयपूरमध्ये एका टेलरची मंगळवारी निर्घृण हत्या करण्यात आली होती. अगदी तशाच प्रकारची घटना अमरावतीत घडली, मृत उमेश कोल्हे हे अमरावतीत मेडिकल चालवत होते.
गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या सहा -सात जणांकडून उमेश यांची हत्या करण्यात आली, त्यांच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा तो हत्या करण्यासाठीच होता असे दिसून येत आहे, असे असतानाही स्थानिक पोलिसांकडून या प्रकारणाच्या चौकशीमध्ये चालढकल होताना दिसत आहे. पोलिसांनी कुठल्याही दबावाखाली न येता या प्रकरणाचा अत्यंत काटेकोरपणे तपास करावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश भाजपचे प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे.