नवी दिल्ली : ‘अल्ट न्यूज’चा सह-संस्थापक आणि कथित ‘फॅक्ट चेकर’ मोहम्मद झुबेर यास हिंदूंच्या भावना दुखावणारे ट्विट केल्याप्रकरणी चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिल्ली पोलिसांनी मोहम्मद झुबेर यास सोमवारी रात्री अटक केली होती. त्याच्यावर २०१८ साली हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे ट्विट केल्याचा आणि समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. अटक केल्यानंतर त्यास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यास मंगळवारी दिल्लीतील जिल्हा न्यायदंडाधिकारी स्निग्धा सरवारिया यांच्यासमोर हजर करण्यात आले. यावेळी दिल्ली पोलिसांनी झुबेर यास पाच दिवसांची कोठडी देण्याची विनंती केली होती. पोलीस चौकशीमध्ये झुबेर सहकार्य करीत नसून भावना दुखावणारे ट्विट करण्यासाठी वापरलेले ‘डिव्हाईस’ पोलिसांना देत नसल्याचे नमूद केले. याची न्यायालयाने गंभीर दखल घेऊन झुबेर याची रवानगी चार दिवसांसाठी पोलीस कोठडीमध्ये केली आहे.
झुबेरला भादंवि ‘कलम १५३’ (दंगल घडवण्यासाठी चिथावणी देणे) आणि ‘२९५’ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धेचा अपमान करून धार्मिक भावना दुखावण्याच्या हेतूने जाणूनबुजून आणि अंतर्गत अटक करण्यात आली आहे. या वर्षी जूनमध्ये एका ट्विटर हॅण्डलवरून तक्रार मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी झुबेरविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. जुबेरने जाणूनबुजून धार्मिक भावनांचा अपमान करण्याच्या उद्देशाने संशयास्पद फोटो ट्विट केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे, असे ट्विट वेळोवेळी रिट्विट केले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. जाणूनबुजून होत असलेल्या अपमानाच्या प्रचारात सोशल मीडिया वापरकर्त्यांची ब्रिगेड गुंतल्याचे आणि त्यामुळे जातीय सलोख्यावर परिणाम होऊन शांतता धोक्यात आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.