मुंबई : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओच्या अध्यक्षपदावरून मुकेश अंबानी पायउतार झाले आहेत. २७ जून रोजी झालेल्या जिओच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुकेश अंबानींचे जेष्ठ पुत्र आकाश हे जिओचे पुढचे अध्यक्ष असतील असे या बैठकीत जाहीर करण्यात आले आहे. याच बैठकीत पंकज मोहन पवार यांची पुढील पाच वर्षांसाठी व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
जिओच्या डिजिटल सेवांची मालकी असलेल्या जिओ प्लॅटफॉर्म्सच्या अध्यक्षपदी मुकेश हेच असणार आहेत. अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून अर्थशात्राचे पदवीधर असणारे आकाश कंपनीला अजून मोठ्या उंचीवर घेऊन जातील असा विश्वास आहे असे कंपनीने आपल्या पत्रकात म्हटले आहे. भारतातील टेलिकॉम क्षेत्रातील सर्वात मोठा ब्रँड म्हणून जिओ ओळखला जातो. भारतीय टेलिकॉम क्षेत्रातील अनेक ग्राहकाभिमुख बदल घडवून आणण्यात जिओचा सिंहाचा वाटा आहे.