मानसिक कल्याणाची परिभाषा

    28-Jun-2022
Total Views |
 Mental
 
 
 
 
जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या म्हणजे संपूर्णपणे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची स्थिती आहे. केवळ रोग नसणे म्हणजे आरोग्य आहे, असे म्हणता येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चिंता वा नैराश्याची लक्षणे असलेल्या मानसिक त्रासाच्या अनुपरिस्थितीपेक्षा मानसिक कल्याणाची मर्यादा खूप मोठी आहे. व्यक्तीला कल्याणाची अनुभूती हा मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे.
 
 
आपण आपल्या कल्याणाची भाषा विशेषत: मानसिक कल्याणाची भाषा करत असतो. पण, मुळात ‘मानसिक कल्याण’ ही एक किचकट आणि बहुगुणित संकल्पना आहे, कल्याणाचे परिमापन अनेक वेळा वस्तुनिष्ठ उपायांमध्ये विभागले जाते, ज्याच्याशी आपल्या राहणीमानाचा दर्जा आणि व्यक्तिनिष्ठ उपायांमध्ये मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक पैलू यांचा समावेश असतो. शिवाय एखादी व्यक्ती आपल्या जीवनाबद्दल भावनिक आणि वैचारिक निर्णय कसे घेते, याचा विचारही महत्त्वाचा ठरतो. गेल्या दशकभर मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या वर्धनासंबंधात मानसशास्त्रीय कल्याणाची संकल्पना किती महत्त्वाची आहे, याची प्रसिद्धी झालेली आहे. मानसशास्त्रीय कल्याण हे केवळ शारीरिक आरोग्यावर होणार्‍या संभाव्य परिणामांमुळेच नाही, तर स्वतंत्रपणेसुद्धा व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक संकल्पना आहे. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची व्याख्या म्हणजे संपूर्णपणे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणाची स्थिती आहे.
 
 
 
केवळ रोग नसणे म्हणजे आरोग्य आहे, असे म्हणता येत नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चिंता वा नैराश्याची लक्षणे असलेल्या मानसिक त्रासाच्या अनुपरिस्थितीपेक्षा मानसिक कल्याणाची मर्यादा खूप मोठी आहे. व्यक्तीला कल्याणाची अनुभूती हा मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा भाग आहे, पण स्वतंत्रपणे निर्णयात्मक नाही. तुम्ही कल्पना करा की, एक संथ नदीत तुम्ही आपल्या आवडत्या मित्रमंडळी समवेत, खाण्यापिण्याची रेलचेल ठेवून छान आनंद अनुभवत आहात. कदाचित एकटे असताना तुम्हाला हा प्रसन्न अनुभव मिळेल. पण, हा प्रसन्न अनुभव किती दिवस टिकेल? केवळ एक-दोन आठवड्यांसाठी तुम्हाला मज्जा घेता येईल. परंतु, समजा, हा असा बोटीत असलेला आनंद तुम्हाला आयुष्यभर घ्यावयास जमेल का? खूप कमी लोकांना ही कल्पना कदाचित आनंददायी वाटेल. पण, बहुतेक लोक पूर्णपणे कंटाळतील. कारण, या अनुभवात आपला उद्देश काय आहे, यामागचा अर्थ काय आहे, हे खूप महत्त्वाचे ठरते. म्हणजे कुठलीही गोष्ट व प्रसंगात आपली सकारात्मक भावना महत्त्वाची असेल. पण, त्याहीपेक्षा महत्त्व आहे, त्या प्रसंगांमागची अर्थपूर्णता. म्हणजेच मानसिक आरोग्यामध्ये दोन महत्त्वाचे घटक आहेत. आपण ज्या गोष्टींचा आनंद घेत आहोत, त्यासंबंधीची व्यक्तिनिष्ठ आनंदी भावना; याबरोबर आपण जे काही करत आहोत, त्यामागची अर्थपूर्णता आणि उद्देश. एखादी व्यक्ती आनंदाने आयुष्य जगत असते, तेव्हा एक भावनिक घटक तर असतोच, पण त्याचबरोबर जीवनावरील समाधानही महत्त्वाचे आहे.
 
आनंददायी वैयक्तिक अनुभूती घेताना खालील काही घटक महत्त्वाचे ठरतात.
 
1) स्व-स्वीकृती : मला स्वत:ला स्वत:बद्दलची अनेक गुण आणि वैशिष्ट्ये भावतात.
 
2) पर्यावरणातली प्रभुत्व: मी माझ्या आयुष्यातील पर्यावरणीय घटक व क्रियाकल्प व्यवस्थित वापरत जातो, माझ्या परिस्थितीचा मी प्रभारी आहे.
 
3) इतरांशी सकारात्मक संबंध : मी इतरांबरोबर आत्मीयतेने आणि आपुलकीने वागत असतो.
 
4) वैयक्तिक विकास: मी नवीन अनुभवांचे स्वागत करीत आहे. सतत विकसित होत आहे.
 
5) आयुष्यातील उद्देश : माझ्या आयुष्यात अर्थपूर्ण ध्येय आहे आणि माझ्या जीवनाला उद्देश आहे.
 
6) स्वायत्तता : मी माझे निर्णय घेण्यास स्वतंत्र आहे. माझ्यावर कुठलाही सामाजिक दबाव नाही.
 
मानसिक कल्याणाची भाषा काही प्रमाणात स्थिर असते. पण, आपल्या आयुष्यातील पूर्वीचे काही अनुभव आणि आपले मूलभूत व्यक्तिमत्त्व याचा प्रभाव त्यावर पडू शकतो. काही व्यक्ती भावूक असतात, काही हेलावणार्‍या असतात. काही मनाने कणखर असतात. त्यावर त्याचे मानसिक समाधानाचे प्रमाण अवलंबून असते. आयुष्यात येणार्‍या तणावपूर्ण प्रसंगामुळे लोकांना नैराश्य व चिंतेचे विकार होण्याची शक्यता असते. दुसर्‍या बाजूने अशा कठीण व क्लिष्ट प्रसंगांचा सामना करत करत एखाद्याला लवचिकता निर्माण करता येते. त्यामुळे त्याचे रक्षण होऊ शकते. लहानपणापासून आयुष्यातील तणावाची घटना सहन करत जाणारी काही मुले पुढे जाऊन तणावाचा सामना करण्यास सक्षम होतात. आयुष्याचे अनुभव गतिशील असतात. सर्वात लवचिक व्यक्तीदेखील आयुष्यात दबावाखाली येऊ शकते, उदासीन होऊ शकते. दीर्घकाळापर्यंत कामाशी संबंधित ताणतणावात राहिल्याने लोकांच्या मानसिक कल्याणावर नकारात्मक परिणाम पडू शकतो, हे दाखवणारे शास्त्रीय पुरावे आहेत. याचा परिणाम लोकांना जीवनशैलीशी निगडित असे विविध आणि जटील आजार होऊ शकतात.