मुंबई : महाराष्ट्राचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत उद्घाटन झालेल्या बोरिवली येथील उड्डाणपुलाची पहिल्या पावसातच दैना झाली आहे. मुंबईत अजून पावसाने जोर धरलेला नसतानाच जेमतेम पावसातच उड्डाणपुलावरील रस्त्याचे डांबर निघून खडी बाहेर येण्यास सुरुवात झाली आहे. बोरिवली पश्चिम येथील आर. एम. भट्टड मार्गावर बांधण्यात आलेल्या या उड्डाणपुलाचे १८ जून रोजीच आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले होते.
अत्याधुनिक अँटी स्किड सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरून या पुलाची उभारणी करण्यात आली आहे, या पुलावर पावसाळ्यात वाहने घसरणार नाहीत यासाठी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. पण पहिल्याच पावसात या पुलाची दैना होऊन त्यावरील डांबर उखडले जाऊन आतील खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या झालेल्या अवस्थेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची भावना आहे. " मुंबई महापालिकेने कितीही दावे केले तरीही मुंबई असा एकही पूल किंवा रस्ता नाही की ज्यावर पावसाळ्यात खड्डे पडत नाहीत, आता तर नव्याने बांधलेल्या पुलाची अशी अवस्था झाली आहे त्यामुळे महापालिकेच्या कामाचा नेमका दर्जा काय? हाच प्रश्न आम्हाला पडतोय" अशी संतप्त प्रतिक्रिया फाईट फॉर राईट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी दिली आहे.