रोगाचे मूळ निदान करायचे झाल्यास, रोग हा माणसाच्या मूळ चैतन्यशक्तीमध्ये होणारा बिघाड असतो, जो सर्वप्रथम माणसाच्या संवेदनांमधून व नंतर अवयवांच्या कार्यामधून शरीरावर दिसू लागतो, ज्यालाच आपण चिन्हे व लक्षणे असे म्हणतो. या विविध लक्षणे व चिन्हे यांनी मिळूनच हा रोग बनलेला असतो. यावरुन हेच सिद्ध होते की, रोग हा कुठल्याही प्रकारचा स्थानिक व पेशीनिहाय बिघाड नाही, तर मूळ चैतन्यशक्तीमध्ये झालेला असमतोल असतो. पेशींमध्ये दिसणारे बदल हे या मूळ चैतन्यशक्तीच्या बिघाडाचा निकाल स्वरुप असतात.
आता आपण निरोगी माणूस व रोग याबद्दल पुरेशी माहिती घेतली आहे, तर आता आपल्याला शरीर व मनाच्या स्थितीचा अभ्यास करायचा आहे, जो आजारी माणसाच्या रोगाचे मूळ कारण शोधायला महत्त्वाचा आहे. रोगाच्या मूळ कारणाचे हे गुपित प्रथम हिपोक्रेटिसला उमगले व त्यानंतर डॉ. हॅनेमान यांनी त्याचा अभ्यास करून ते सोप्या भाषेत व सविस्तरपणे जगाच्या समोर आणले. डॉ. हॅनेमान यांनी माणसाच्या शरीरप्रकृतीचा, शरीर रचनेचा व रोगप्रवण स्थितीचा अतिशय बारकाईने अभ्यास केला व त्याच्यामुळेच त्यांना ‘स्टेट ऑफ डिस्पोझिशन’चा अभ्यास करता आला.
डॉ. हॅनेमान यांनी त्यांच्या लिखाणातून शरीरप्रकृती, मनुष्यस्वभाव, अनुवांशिकता, शरीराचा कल व रोगप्रवणस्थिती याचा खोलवर जाऊन अभ्यास केला आहे व तो जगासमोर त्यांच्या ग्रंथसंपदेतून मांडला आहे.
त्यांनी ‘ऑरगेनॉन’ या ग्रंथात 31व्या परिच्छेदात याचा उल्लेख केला आहे. त्याचा अर्थ असा "The partly physical and partly physical-inimical potencies in life on earth.'' (which we called of disease malignity) do not possess an absolute power to morbidly mistune the human condition.We become diseased by them when our organism is just fastly and efficiently disposed and laid open to be assigned by the cause of disease that is present and to be altered in its condition mistuned and displaced into abnormal feelings and functions hence these inimical potencies do not make everyone sick everytime.''
म्हणजेच काय तर, निसर्गामध्ये असणार्या ज्या आजाराला पोषक अशा गोष्टी आहेत, ज्यात जीवाणू-विषाणूही आले, त्यांच्यामध्ये माणसाला आजारी करण्याची पूर्ण क्षमता नसते. त्यांचा शरीरावर व मनावर तेव्हाच परिणाम होतो, जेव्हा आपल्या शरीर व मनाची ठेवण व एखाद्या गोष्टीबद्दलचा शरीराचा कल हा त्याबद्दल प्रतिक्रिया देतो. म्हणजेच शरीराची प्रकृती व मनाची ठेवण हीच मुख्यत्वे जपायची असते व ती नीट असेल, तर हे बाहेरील जंतू शरीरात प्रवेश करूच शकत नाहीत व केलाच तरी शरीराची प्रतिकारशक्ती त्याला परतावून लावते म्हणून हे रोग उत्पन्न करणारे घटक प्रत्येक वेळी माणसाला आजारी पाडू शकतातच असे नाही. यासाठी आपण आता रोगप्रवणशक्तीचा अभ्यास करणार आहोत.
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)