‘आंतरराष्ट्रीय योग दिना’च्या निमित्ताने आपण योग प्रकारांची माहिती करुन घेत आहोत. मागील भागात ‘बहिरंग योग - यम’ म्हणजे नेमके काय, याविषयीची सविस्तर माहिती आपण करुन घेतली. आजच्या भागात ‘बहिरंग योग - नियम’ यासंबंधीच्या विविध पैलूंची सविस्तर माहिती करुन घेऊया.
यम ही त्रिकालबाधित आचारसंहिता आहे, तर नियम जीवन आदर्श बनविण्यासाठी व मनाला आदर्श विचारांची दिशा दाखविण्यासाठी आहे. यम-नियमांचे पालन हे मानवाचे नैतिक बळ वाढविण्यासाठी आहे. सर्वांनी याचे यथाशक्ती पालन केले, तरी त्यातून भविष्यात चारित्र्यवान राष्ट्र उभे राहील.
पाच नियम पुढीलप्रमाणे आहेत: शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वरप्रणिधान.
१. शौच- शौच म्हणजे स्वच्छता. ही स्वच्छता तीन प्रकारची आहे.
(अ) कायिक
(ब) वाचिक
(क) मानसिक
(अ) कायिक शौच : शरीराची बाह्य व आंतरिक स्वच्छता महत्त्वाची आहे. खासकरून शालेय विद्यार्थ्यांनी नियमित व व्यवस्थित अंघोळ करणे, केसांची निगा राखणे, दात स्वच्छ घासणे, जेवल्यानंतर व्यवस्थित चूळ भरणे, नखे नियमित कापणे, डोळ्यांची व्यवस्थित निगा राखणे, आठवड्यातून एकदा तेलाने मालिश करून अंघोळ करणे. जे प्रौढ नियमित योग करतात, त्यांनी कायिक शौचसाठी जलधोती, नेती, कपालभाती, बस्ती, त्राटक व नौली या षटकर्मांपैकी काही कर्मांचा अवलंब करावा.
(ब) वाचिक शौच : मितभाषी असावे. बैठकीत बोलताना अध्यक्षांची परवानगी घेऊनच मुद्देसूद व थोडक्यात बोलावे. व्यक्तिगत टीका सहसा टाळावी. आपण मुख्य वक्ते नसल्यास थोडक्यात आपले भाषण पुरे करा व मुख्य वक्त्यास पुरेसा वेळ ठेवा. आपले म्हणणे लोकांनी शांतपणे ऐकावे, असे आपल्याला नेहमीच वाटते. यासाठी आपणही इतरांचे भाषण शांतपणे ऐकावे. भाषण जसे तुम्हाला प्रगल्भ बनविते तसेच श्रवण तुम्हाला परिपक्व बनविते. दुसर्यांचे म्हणणे शांतपणे ऐकणे हीदेखील एक कला आहे. ही कला आत्मसात करा.
(क) मानसिक शौच : राग, द्वेष, काम, क्रोध, आळस व भीती या दुर्गुणांना प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवा. वाईट विचारांना शुद्ध विचारांनी घालवावे.
२. संतोष : ‘ठेविले अनंते, तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.’ असंतुष्ट मन एकाग्र होऊ शकत नाही. प्रत्येकाचे नशीब वेगळे आहे. प्रत्येकाच्या वाट्याला वेगळी सुखदु:खे येतात. त्यामुळे आपण आपल्या नशिबाची इतरांशी तुलना करू नये. आपल्या पदरात जे पडले, त्याचा सहर्ष स्वीकार करावा व समाधानी राहावे. दुसर्याच्या सुखाचा हेवा केला तर त्यातून केवळ दुःखच निर्माण होते. जीवनातील मूलभूत गरजा व विलासी जीवन यातला फरक समजून घ्यावा. समाधान हे पैशाने विकत घेता येत नाही. कोट्यधीशदेखील असमाधानी असू शकतो. दुसर्याचे ऐश्वर्य, यश बघून आनंद झाला पाहिजे. त्याचा हेवा केला तर त्यातून दु:खच निर्माण होते.
३. तप किंवा परिश्रम : कुठल्याही ध्येयप्राप्तीसाठी परिश्रमाची आवश्यकता असते. हे परिश्रम मनापासून केले जावे. शालेय विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी झटून व मनापासून अभ्यास केला पाहिजे. आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी प्रबळ इच्छाशक्तीने सतत प्रयत्न करणे यास ‘तप’ म्हणतात. हे तप करत असताना शिस्तीचे पालन, तन-मनाची शांती, योग्य आहार, योग्य विहार, संयम आणि सातत्य यांचा समावेश असला पाहिजे. विश्वामित्र मुनींच्या तपोभंगास विचलित चित्त कारण ठरले. विद्यार्थीदशेत ध्येयपूर्ती साधत असताना चित्त विचलित करणारे अनेक प्रसंग येतील. परंतु, त्या सर्वांवर आपल्या अभ्यासू वृत्तीने मात करण्याची आवश्यकता आहे. व्यसन, जुगार, इंटरनेटचा गैरवापर, कुसंगती यापासून विद्यार्थ्यांनी स्वत:ला प्रयत्नपूर्वक बाजूला ठेवले पाहिजे.
४. स्वाध्याय : आपल्याला जे शिकवले आहे ते पुन्हा पुन्हा करणे, यास ‘स्वाध्याय’ म्हणतात. वर्गात शिकवलेला धडा घरी आल्यावर पुन्हा वाचणे, पाठांतर करणे, त्यावरील प्रश्न सोडविणे, यास ‘स्वाध्याय’ म्हणतात. एकच गोष्ट पुन्हा केल्यास ती व्यवस्थित लक्षात राहते व त्यातील कौशल्य आपोआप प्राप्त होते. सचिन तेंडुलकरचे या बाबतीत उदाहरण देता येईल. वयाच्या बाराव्या वर्षांपासून ते ४२व्या वर्षांपर्यंत सचिनने रोज सकाळी ६ वाजता उठून क्रिकेटचा सराव केला. त्यात क्वचितच खंड पडला असेल. क्रिकेटलाच त्याने आपले ध्येय, आपले विश्व, आपला आनंद व आपला विरंगुळा मानले. स्वाध्यायामुळे सचिन यशाचे अत्युच्च शिखर गाठू शकला. एकलव्य केवळ निरीक्षणशक्ती, गुरुभक्ती व स्वाध्याय यांच्या जोरावर श्रेष्ठ धनुर्धारी ठरला. आजचे शाळा-महाविद्यालयामधील विद्यार्थी शाळा महाविद्यालयामध्ये जातात, क्लासमध्ये जातात. मात्र, स्वत: होऊन अभ्यास (स्वाध्याय) अगदी अल्पसा करतात व तुटपुंजे यश पदरात पाडून घेतात. विद्यार्थीदशेत नियमित अभ्यासास दुसरा पर्याय नाही. याचबरोबर वेळ मिळाल्यास थोडा वेळ धार्मिक ग्रंथाचे वाचन विद्यार्थ्यांची आध्यात्मिक बैठक पक्की करते व त्यांचे वाममार्गापासून संरक्षण करते. ओंकार, गायत्री मंत्राचा जप करणेदेखील स्वाध्याय ठरू शकते.
५. ईश्वरप्रणिधान : जगात एक अशी अद्भुत शक्ती आहे की, जिच्यामुळे येथील लक्षावधी प्राणिमात्रांचे व्यवहार निर्विघ्न चालू राहतात. त्या शक्तीस काहीही नाव देऊन त्या शक्तीपुढे नतमस्तक होणे, त्या शक्तीचा आदर करणे म्हणजे ईश्वरप्रणिधान. या अद्भुत शक्तीवर आपली असलेली श्रद्धा, भक्ती आपल्याला सर्व संकटातून बाहेर काढत असते.
यम-नियमांचे चिंतन : मनन करा व ते पाळण्यास यशाशक्ती सुरुवात करा, आपले जीवन असे घडवा की, ते जगासाठी आदर्श जीवन ठरावे. कोण यम-नियम पाळतो की नाही, यावर पहारा ठेवून आयुष्य फुकट घालविण्यापेक्षा यम-नियम पाळून येणार्या पिढीसाठी दीपस्तंभ होणे आपल्यासाठी, समाजासाठी व राष्ट्रासाठी जरुरीचे आहे. अत्त दीपो भव:।