मुंबई - सध्या राज्यात राजकीय उलथापालथ सुरू असताना शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना आज ईडीचे समन्स देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडी चे समन्स पाठवण्यात आले आहे. या विषयी संजय राऊत याना उद्या २८ जून ला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. राज्यातील राजकीय गोंधळात शिवसेनेचे मत माध्यमांसमोर संजय राऊत मांडताना दिसत आहे. या आधी देखील शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांना ईडी चे समन्स पाठवण्यात आले होते.
पत्राचाळ प्रकरण नेमके आहे काय ?
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणांमध्ये मध्ये १,०३४ कोटीचा घोटाळा झाला, असल्याने ईडीचे ईडी चे समन्स आले आहे. मुंबईतल्या पत्राचाळ च्या पुर्नविकासित प्रकल्पामधील जागेचा भाग प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला विकसित करण्यासाठी देण्यात आली होती. यातील काहीभाग त्यांनी खासगी कामासाठी विकली असल्याने यामुळे तेथील स्थानिकांची फसवणूक झाल्या असल्याचे आरोप आहे. पत्राचाळचे ३ हजार फ्लॅटचे बांधकाम करायचं काम होणार होते, त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु, २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५ टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३ मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.
प्रवीण राऊतांना पाठवली होती नोटीस
पीएमसी बँक घोटाळाचा २०२० मध्ये तपास चालू असताना यामध्ये प्रवीण राऊत यांची चौकशी करण्यात आली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे व्यावसायिक भागीदार आहेत. पीएमसी बँक घोटाळा प्रकरणांमध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यातुन संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ५५ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले होते. यातून त्यांनी दादर येथे फ्लॅट खरेदी केल्या असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. ईडीनं जप्त केलेल्या मालमत्तेत प्रवीण राऊत यांचे अलिबागमध्ये आठ भूखंड आणि वर्षा राऊत यांचा फ्लॅटचा समावेश होता. याप्रकरणी प्रवीण राऊत यांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तसेच ईडीनं यापूर्वी प्रवीण राऊत यांच्यावर आरोपपत्र दाखल केलं होतं. प्रवीण राऊत, सारंग वाधवान यांच्या सोबत एचडीआयएलचे राकेश वाधवान, गुरु आशिष कन्स्ट्रक्शन यांची या आरोपपत्रात नावं आहेत.
माझी मान कापली तरी मी गुहावटीचा मार्ग स्विकारणार नाही : खा. संजय राऊत
"आपल्याला अजून ईडीकडून नोटीस मिळालेली नाही," अशी माहिती संजय राऊत यांनी माध्यमांना दिली. संजय राऊत यांचा उद्या पूर्वनियोजित कार्यक्रम आहे. त्यामुळे राऊत उद्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात जाण्याची शक्यता कमीच आहे. ईडीकडे चौकशीसाठी हजर राहण्यासाठी राऊत ईडीकडे मुदत मागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विषयावर राऊत यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग करत ट्विट केला. "हे मला आताचा समजले ईडी ने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत मला रोखण्यासाठी.. हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुहावटीचा मार्ग स्विकारणार नाही. या..मला अटक करा! जय महाराष्ट्र!" असे या ट्विट मध्ये लिहले आहे.