मुंबई : राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (दि. २४ जून) पुन्हा एकदा व्यक्त झाले. शिवसेना भवन येथे पक्षातील पदाधिकाऱ्यांशी ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते. यावेळी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेसुध्दा उपस्थित होते. “आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हिच गोष्ट उद्या आदित्यसोबतही घडणार नाही का?”, असे उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी; "किती खुबीने भावी शिवसेनाप्रमुख जाहीर करून टाकला!", असे ट्विट करत उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला.
बाळासाहेबांचा मुलगा म्हणून माझ्या मोहात अडकू नका
"मी कुठलेही भावनिक भाष्य करत नाही. मी केवळ बाळासाहेबांचा मुलगा आहे. म्हणून माझ्या मोहात अडकू नका. माझ्यापेक्षा शिवसेना हे बाळासाहेबांचं लाडकं अपत्य आहे. त्यामुळे मी व्यक्तीगतरित्या शिवसेना चालवायला नालायक आहे, असं वाटत असेल तर शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करा आणि योग्य निर्णय घ्या.", असे उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना संबोधताना म्हणाले.