राजकीय भूकंप : मुंबईत 'या' दिवसापर्यंत कलम १४४ लागू
25-Jun-2022
Total Views |
मुंबई : शिवसेना नेते आणि राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदेंनी पुकारलेल्या बंडामुळे राज्यात तणावात्मक परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईत १० जुलैपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मुंबई पोलीस आयुक्तांसह सह पोलीस आयुक्तांची बैठक घेण्यात आली त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याच्या राजकीय परीस्थितीबाबत मुंबई पोलीसांनी परिपत्रक जाहीर करत याबद्दल निर्णय दिला आहे.
मुंबईतील सर्व राजकीय पक्षांचे कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार व महत्वाचे नगरसेवक यांचे कार्यालय, निवासस्थान शाखा या ठिकाणी बंदोबस्त लावण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक राजकीय व्यक्तींसोबत समन्वय ठेवून माहीती घेण्याच्याही सूचना पोलीसांना देण्यात आल्या आहेत.
तसेच राजकीय कार्यक्रम, बैठका याठिकाणी योग्य बंदोबस्त ठेवण्याबाबत सांगण्यात आले. विशेष शाखेने सोशल मिडीयावर लक्ष ठेवून संबधितांना आवश्यक माहिती त्वरीत देण्यास सांगितले. स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालीबाबत माहिती घेऊन योग्य कारवाई करण्यास सांगितले आहे.
कोणताही राजकीय पक्ष कायदा हातात घेणार नाही, हिंसा करणार नाही आणि तोडफोड करणार नाही याबाबत आवश्यक सुचना दिल्या. कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह पोस्टर, बॅनर लागणार नाही याची दक्षता घेण्यास सांगितले. आवश्यक प्रतिबंधक कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टीने सर्वांनी सजग राहुन कर्तव्य करणे अपेक्षित आहे, असे निर्देशही पोलीसांना देण्यात आले आहेत. अधिकारी व अंमलदारांना देण्याबाबत सांगण्यात आले. मुंबई शहरात कलम १४४ सीआरपीसी हे प्रतिबंधात्मक आदेश पाळले जातील याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत.