पुणे : "गुवाहाटी येथे गेलेले शिवसेनेचे नेते व कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही", असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील शुक्रवारी (दि. २४ जून) म्हणाले. शिवसेनेच्या दोनतृतियांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजप असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. त्यासंदर्भात कोल्हापूर दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत दादांनी स्पष्टोक्ती दिली.
"सत्ता स्थापनेसाठी भाजपकडे कोणाकडूनही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. भाजपच्या निर्णयप्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्याची कोअर कमिटी विचारविनिमय करून भूमिका निश्चित करते व केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करते. त्यानंतर पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेते. देशामध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच ते शरद पवार यांनाही आहे. त्यानुसार ते मत व्यक्त करत असतात. महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्न करणार नाही. परंतु अंतर्गत कलहामुळे हे सरकार नक्कीच कोसळेल.", असे चंद्रकांतदादा पाटील यांचे म्हणणे आहे.