मुंबई : आपल्यासोबत ५० आमदारांचे पाठबळ असण्याचा दावा करणारे शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात ठाण्यानंतर आता मुंबईमध्येही बॅनर लावण्यात आले आहेत. समर्थकांनी बॅनर लावून शिंदेंच्या बंडखोरीला समर्थन दिले आहे. पालघर, ठाणे, डोंबिवली नंतर आता मुंबईमध्येही शिंदेंच्या समर्थनार्थ बॅनरबाजी दिसून येत आहे. 'जिथे धर्म तिथे विजय निश्चित!' असा मजकूर लिहण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्यासह केवळ एकनाथ शिंदे यांचा फोटो बॅनरवर आहे.
एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात बॅनरबाजी नंतर राज्यात शिवसैनिक संतप्त झाले असून ठिकठिकाणी आंदोलन आणि सेना आमदारांचे कार्यालय फोडण्यात येत आहेत. त्यामुळे राज्याच्या गृह खात्याने सर्व जिल्ह्यांतील पोलिस ठाण्यांना हाय अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसैनिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून गोंधळ घालू शकतात, असा अलर्ट पोलिसांना मिळाला आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये आणि शांतता राखावी यासाठी जमावबंदी करण्यात आली आहे.