कोल्हापूर : एकनाथ शिंदेंच्या राजकीय बंडाने शिवसेनेसह महारष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. पूर्वी शिवसेनेत बंडखोरी करणाऱ्या व्यक्तीला त्याच्या कृत्याची जबर किंमत मोजावी लागत असे. शिंदेनी मोठ्याप्रमाणावर बंड करून देखील काही अपवाद वगळल्यास शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे दिसले नाही. परंतु राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर गुवाहाटीमध्ये दाखल होताच, क्षीरसागर यांचा निषेध नोंदवत कल्हापूरचे शिवसैनिक रस्त्यवर उतरले.
त्यावेळी संतप्त शिवसैनिकांनी फुटलेल्या आमदारांची घरं फुटतील, असा इशारा देत, "एव्हडे शिवसैनिक कशाला गद्दारांना गाडायला", "पक्षप्रमुखांचा आदेश, पुन्हा नाही राजेश" अशी घोषणाबाजी केली. "जे गेले ते कावळे, उरले ते मावळे", "मासा लागला गळाला, एकनाथ शिंदे पळाला" अशा घोषणा देत, दुपारी १२ वाजता शिवसैनिकांनी दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात केली. दरम्यान, २३ जून २०२२ रोजी दिवसभर गायब असलेले राजेश क्षीरसागर, शिंदे गटाला जाऊन मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती आणि झालेही तसेच. २४ जून २०२२ रोजी क्षीरसागर गुवाहाटी येथे गेल्याचे समोर आले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक एकवटले होते. यावेळी शिवसेना खासदार संजय मंडलिक, तिन्ही शिवसेना जिल्हाप्रमुख, तसेच माजी आमदार उपस्थित होते. तसेच मोर्चाला महिलांचीही संख्या लक्षणीय होती. दरम्यान चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.