उद्धवजी, ‘कोरोना’ला विसरलात?

    24-Jun-2022   
Total Views |

uddhav

महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या बंडखोर एकनाथ शिंदेंनी भूकंप घडवून आणला असून, महाविकास आघाडीला एकामागून एक हादरे बसत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पळता भुई थोडी झाली असताना बुधवारी सकाळीच त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात आलं. त्यांची ‘अ‍ॅन्टिजेन’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आली खरी, मात्र राज्यात एवढी उलथापालथ होत असतानाही त्यांनी ऑनलाईन पद्धतीने मंत्रिमंडळाची बैठक घेतली. त्यात 2021 पर्यंतचे सर्व राजकीय गुन्हे मागे घेण्याची घोषणा केली. यानंतर सायंकाळी नेहमीप्रमाणेच मुख्यमंत्र्यांनी फेसबुक लाईव्ह करून महाराष्ट्राच्या जनतेला आपले अमूल्य मार्गदर्शन केले. त्यात ‘लाकूडतोड्याची गोष्ट’ आणि ‘रडकुंडीचा घाट’ वगैरे वगैरे यांची नव्याने ओळख महाराष्ट्राला झाली. मग भावनिक आवाहन, ‘वर्षा’ बंगला सोडण्याची चाल आणि पुढे ‘वर्षा ते मातोश्री’पर्यंत केलेले शक्तिप्रदर्शन यामुळे संबंध महाराष्ट्र जणू भावनिक झाल्याची वातावरण निर्मिती करण्यात आली. मात्र, हे सगळे करताना उद्धव ठाकरेंना आपल्याला कोरोनाची लागण झाली आहे, याचा जणू विसर पडला होता. कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून मुख्यमंत्री जनतेला फेसबुक लाईव्हद्वारे काळजी घेण्याचे आणि उपदेशाचे डोस पाजत होते. कोमट पाणी प्या, मास्क लावा, ‘माझे कुटुंब माझे जबाबदारी’ असे काय काय सल्ले दिले गेले. एवढंच काय, तर महाराष्ट्रातील मंदिरे कित्येक महिने कोरोनाच्या नावाखाली बंद ठेवली गेली. सततचं फेसबुक लाईव्ह आणि त्यावरून सततच्या सल्ल्यांना कंटाळलेल्या जनतेला अक्षरशः वीट आला होता. अडीच वर्षांत बोटावर मोजता येईल, इतक्या वेळेस मुख्यमंत्री मंत्रालयात गेले. कोरोना काळात केलेल्या कामासाठी उद्धव यांच्या कौतुकाचे नगारे वाजवण्यात आले. मात्र, जेव्हा या सल्ल्यांची आणि नियमांचे पालन करण्याची वेळ स्वतवर आली तेव्हा उद्धव यांनी त्याला केराची टोपली दाखवली. स्वतःचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याने ‘इमोशनल कार्ड’ खेळण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांना वाटली आणि या गडबडीत स्वतःला कोरोना झालाय, याचाही विसर त्यांना पडला. ठाकरेंच्या रोड शोमध्ये हजारो शिवसैनिक सहभागी झाले. पण, स्वतःला कोरोना होऊनही उद्धव ठाकरेंनी रोड शोत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. मग हा हा सामान्य शिवसैनिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न म्हटले, तर वावगे ठरणार नाही.



लोका सांगे ब्रह्मज्ञान अन् ...



देशाने कोरोनाचा अतिशय अवघड काळ पाहिला. सर्वाधिक मृत्यूंची संख्याही महाराष्ट्रात नोंदवली गेली. त्यामुळे प्रत्यक्ष पुढाकार घेऊन उपाययोजना करण्याची गरज असताना सगळं काही घरात बसून सुरू झालं. त्यावेळेची गरज असली तरीही शरद पवारांसह देवेंद्र फडणवीस ‘कोविड सेंटर’ला भेटी देऊन आढावा घेत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी केवळ फेसबुक लाईव्हवर येऊन शिवभोजन थाळीचे गोडवे आणि कोमट पाणी पिण्याचे सल्ले देण्याशिवाय दुसरे ठोस काही केले नाही. त्यात डॉक्टर, कंपाऊंडरचा खेळही रंगला. देशातील सर्वोत्तम पाच मुख्यमंत्र्यांच्या सर्वेक्षणात मुख्यमंत्र्यांचे नाव आले, तर अजूनपर्यंत त्याची उदाहरणे देत मुख्यमंत्री कसे चांगले आहेत, याचे स्पष्टीकरण दिले जाते. कोरोनामध्ये महाराष्ट्र होरपळत असताना ठाकरे सरकारने मंदिरांमधील देवांनाही ‘वेटिंग’वर ठेवले. मुंबईसोबत राज्यातील अनेक ‘कोविड सेंटर’मध्ये कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचे आरोप झाले. हे सगळे सुरू असताना रोज सकाळी संजय राऊत नावाच्या विश्वप्रवक्त्यांचे मोलाचे उपदेश नाईलाजास्तव जनतेच्या कानी पडत होते. कुठलाही प्रशासकीय अनुभव नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्रावर थोपवल्याने देशात कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आयती सत्ता हातात मिळाल्याने महाराष्ट्राची यथेच्छ लूट सुरू होती. कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मास्क काही हटवला नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असतानाही महाराष्ट्राला मास्कमुक्त केले नाही. उलटपक्षी एखादा चुकून मास्क घालायचे विसरला, तर त्याला 200 रुपयांची दंडाची पावती फाडायला लागत होती. मग तो गरीब असो वा श्रीमंत. पोलिसांनीही लाठ्याकाठ्यांनी नियम मोडणार्‍या जनतेला बडवलं. मात्र, खुद्द मुख्यमंत्र्यांना कोरोना होऊनही त्यांनी सर्रास रोड शो काढला आणि कार्यकर्त्यांच्या रडारडीत कोरोना नियमांना पार चिरडून टाकलं. सध्या मुंबईत दररोज सरासरी दीड ते दोन हजारांवर ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण सापडत असताना मुख्यमंत्र्यांनी असे वर्तन करणे, म्हणजे लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण असेच म्हणावे लागेल. यावेळी महाराष्ट्राचे तत्पर पोलीस आणि आरोग्यमंत्री काय करत होते? कोरोनाग्रस्त मुख्यमंत्र्यांसोबत इतकी लोकं असताना त्यांना का रोखले नाही? कोरोना नियमांचा भंग केला म्हणून आरोग्यमंत्री यावर काही कारवाई करतील का, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.



आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील 9 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.