‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’मधून, विकास अभ्यास (Development Studies) या विषयावर उच्च शिक्षण घेतलेल्या विद्यार्थिनी पल्लवी रामाणे हिला ईशान्य भारतात जायचं होते. त्यामुळे ईशान्य भारतातील समविचारी मित्रांशी बोलून पल्लवी यांच्या राहण्याच्या आणि काही उपक्रम दाखविण्याच्या व्यवस्थेची तयारी सुरू केली. आसाममधले मित्र जुगांतर दास यांनी घरगुती पर्यटन राहण्याचा व्यवस्थेतून निवासाची सोय केली. त्यांनी काही स्थानिक कार्यकर्त्यांशी परिचय करून उपक्रमदेखील दाखवले. त्या निमित्ताने ईशान्य भारताचा स्नेहबंध मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
गुवाहाटीतील एक हक्काचं घर झरनादीदीचं! साधारण २५ वर्षांपासून प्रत्येक रक्षाबंधनाला न चुकता आसाममधून येणारी राखी आणि शुभेच्छापत्र मन भारावून टाकतं. कोणीही मुंबईहून आपल्या संपर्कातून गुवाहाटीला जाणार असेल तर हक्काने दीदीला सहकार्यासाठी हाक दिली आणि तिने कधी नाही म्हटलं, असं आजवर झालेलं नाही. दीदीला आधीच सांगितलं होतं की, “पल्लवी येणार आहे. एकटी तरुण मुलगी येतेय, तर जरा विशेष संपर्कात राहा.” दीदीने पल्लवीला घरचा पाहुणचार देऊन, ‘भारत सेवाश्रम’चे सेवाकार्य दाखवून, नंतर मुगा पात रेशमाच्या माहेरघरी म्हणजे स्वालकुशीला नेऊन तेथील हातमागावर विणल्या जाणार्या उद्योगाची इत्थंभूत माहिती देईपर्यंत स्वतः जातीने सोबत होती. त्याचसोबत पारंपरिक घरच्या जेवणाच्या चवीचा आस्वाद दिल्याशिवाय दीदी तर शांतच बसत नाही.
त्यानंतर मेघालय खासी पहाडातील महाराष्ट्रातून शिक्षण घेऊन गेलेल्या शैलेंद्र लासो यांचा संपर्क क्रमांक दिला होता. पल्लवीला आधीच सांगितलं होतं की, रविवारी शक्यतो शिलाँगला जाण्याचे टाळावे. कारण, सार्वजनिक वाहतूक तुरळक असते. परंतु, काहीतरी संपर्काच्या अभावामुळे ती नेमकी रविवारीच शिलाँगला पोहोचली. लासो पेर्नुस्ला गावात तिला भेटणार होता. शिलाँगहून शेअर टॅक्सीने तेथवर पोहोचण्याचे मार्गदर्शन आम्ही दोघांनीही केले होते. पण पल्लवी सकाळीच सकाळी शिलाँगला पोहोचल्यावर तेथील सर्व सामसूम रस्ते पाहून आणि रस्त्यावर झिंगलेले काही तरुण सिगारेट फुकत तिच्याजवळ येऊन, “कहा जायगा? टॅक्सी होगा?” असं विचारू लागले. सर्व प्रकार पाहून तिच्या मनात धडकीच भरली. त्यातून व्यवस्थित भाषा न समजण्याच्या अभावामुळे नेमकं तिला ज्या गावी जायचं होत, तेथे जाणारं वाहन नाही, हे ऐकून ती जास्तच धास्तावली. कशीबशी एका टॅक्सीत ती बसली, पण बराच वेळ टॅक्सी जागेवरच उभी. कारण, जोवर टॅक्सीत प्रवासी पूर्ण होत नाही तोवर पुढे जात नाही. अक्षरशः हुंदकत मला तिचा फोन आला. “सर, येथे कोणीच नाही. टॅक्सीवाला अजूनही टॅक्सी सुरू करत नाहीये. मी काय करू?” लागलीच मी शिलाँगच्या माझ्या मित्राला राजन दासला फोन करून सांगितले. “तू जेथे असशील तेथून हातातील सर्व कामं सोडून, अंजली पेट्रोल पंप येथे जाऊन पल्लवीला भेट आणि समस्येचं निराकरण कर.” राजन लागलीच तिला जाऊन भेटला आणि टॅक्सीवाल्याशी व्यवस्थित बोलणं करून तिला रवाना केलं.
शैलेंद्र लासो पेर्नुस्लात तिची वाट पाहत होतेच. दोघांची भेट झाल्यावर पल्लवीचा आणि त्या टॅक्सीवाल्याचा पण जीव भांड्यात पडला. कारण, जरी पल्लवीला टॅक्सीवाल्याची भाषा समजत नसली, तरी तिच्या घाबरून जाण्याने टॅक्सीवालासुद्धा चिंतेत पडला होता. त्याला पल्लवीला सुखरूप योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याच्या जबाबदारीचे भान होते. पेर्नुस्लातच त्या दिवशी एका घरगुती पर्यटन निवास व्यवस्थेत तिची राहण्याची व्यवस्था केली होती. पल्लवीला तेथील एक शाळा दाखविण्यास घेऊन गेले. पुण्यात शिक्षण पूर्ण करून, वर्तमानात नाबार्डमध्ये उच्चपदावर कार्यरत मद्रास डखार यांनी स्वतःच्या पगारातून त्या शाळेच्या व्यवस्थापनाच्या खर्चाचा भार पेलला आहे. गणित विषयात ‘डॉक्टरेट’ केलेले तरुण, डॉ. सशानकुटलांग खोंगथोरेम ‘असोर्फी उच्च माध्यमिक विद्यालया’चे मुख्याध्यापकांच्या जबाबदारीतून कामकाज पाहतात.ग्रामीण भागातील शालेय व्यवस्था हा एक चिंतनाचा विषय आहे. मद्रास, सुशान, शैलेंद्र इत्यादी तरुण आपापल्या परीने तसेच काही संस्था या विषयात कार्यरत आहेत. त्याला अजून आर्थिक पाठबळ मिळण्याची गरज आहे. ‘छएथरूी भारत फेडरेशन’च्या माध्यमातून ‘लॉकडाऊन’च्या काळात ‘असोर्फी’ या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी एका छोट्याशा आभासी संमेलनाचे आयोजन केले होते, त्यावेळी उपासना रॉय आणि राज मेनन यांनी प्रमुख मार्गदर्शकाची भूमिका बजावली होती.
ती शाळा दाखविल्यानंतर लासो पल्लवीला बांगलादेश सीमा दाखविण्यासाठी घेऊन गेला. परत येताना त्यांनी नोंगजिरी या शैलेंद्रच्या गावच्या शाळेलादेखील भेट दिली. चार खोल्यासदृश्य शाळेत, सेंग खासी संघटनेच्या गावच्या व्यवस्थेअंतर्गत चालवीत असलेली नोंगजीरी खासी माध्यमिक विद्यालय पाहून पल्लवी भारावून गेली. नंतर आशिया खंडातील ’स्वच्छ गाव’ अशी ओळख असलेल्या मावलाँग गाव पाहून ती गुवाहाटीला पोहोचली आणि मुंबईत आसाम आणि मेघालयातील अनुभवांचं गाठोडं घेऊन परतली.मुंबईला परतल्यावर पल्लवीने सारखं विचारायला सुरुवात केली की, “तुम्ही सांगितल्यावर ती माणसं माझ्यासारख्या अनोळख्या व्यक्तीला इतकी मदत कशी करत होती?” तिला रा. स्व. संघाच्या मूळ तत्त्वाच्या शुद्ध सात्त्विक प्रेममंत्रातील भावना सांगितल्यावर, त्या शैलेंद्र लासो, जुगांतर, झरना दीदी, स्वामी पूर्णभरतानंद, राजन इत्यादींनी दिलेला वेळ, काहीही मोबदला न घेता केलेली मदत या मागचं सहज गमक उलगडलं. प्रत्यक्ष भेटीतून अनुभवलेल्या प्रवासातून भागात चालणार्या सामाजिक कार्यासाठी काहीतरी सहयोग देण्याची इच्छा पल्लवीने प्रकट केली. आत्मिक भावनेने ‘छएथरूी भारत फेडरेशन’चे हात बळकट केले. ठरल्याप्रमाणे ‘छएथरूी भारत फेडरेशन’ने पल्लवीने दिलेल्या सहयोगदानातून ‘असोर्फी शाळे’ला एक अद्यावत फलक आणि नोंगजिरी शाळेच्या वाढीव वर्गाच्या निर्मितीसाठी लोखंडी पत्रे देण्याची जबाबदारी पार पाडली.
सहज पर्यटन म्हणून झालेल्या पल्लवीच्या प्रवासातून, मेघालयातील अतिदुर्गम भागातील कार्याचा आणि कार्यकर्त्यांचा संपर्क काय होतो, पल्लवीसारखी सामाजिक कार्यकर्ती त्याची दखल काय घेते आणि प्रत्यक्षात त्या कार्यात योगदान पण देते. आपल्याच देशातील सीमेवरील दुर्गम भागातील कार्याची आणि कार्यकर्त्यांची अशी देश बंधुत्वाची नाळ जुळताना पाहून, भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत.
आसाममधील विस्कळीत जनजीवन आणि उर्वरित भारतातील बांधवांना हाक!
मणिपूर, मेघालयाचा प्रवास करून, आसाममध्येसुद्धा घनकचरा व्यवस्थापन उपक्रमाची ओळख करून देण्यासाठी प्रस्थान झाले. दिलीप परांजपे यांनी स्थानिक नेते, महानगरपालिका आयुक्त इत्यादींशी आधीच संपर्क करून त्यांना पूर्वकल्पना दिली होती. पण, आसाममध्ये पोहोचल्या पोहोचल्या पावसाने रुद्र रूप दाखवायला सुरुवात केली होतीच. गुवाहाटी शहरातसुद्धा पूर आल्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. त्यातल्यात्यात कसंबसं महापौर मृगेनदा, भास्करदा, धर्मेंद्रदा इत्यादी काही जणांशी संपर्क करून प्रकल्पाबाबत माहिती दिली. पण मागील तीन दिवसांपासून पावसामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाल्यामुळे घराबाहेर पडता आले नाही.
तीन दिवसांपासून आसामात तर अक्षरशः ढगफुटीच आहे. युवा विकास केंद्र, अमिनगाव यांच्या कार्यकर्त्यांसोबत, आजूबाजूच्या गावातील आढावा घेऊन त्यांना काय काय मदत होऊ शकते, याचा अंदाज घेण्यासाठी आम्हीसुद्धा आज थोडा पाऊस ओसरल्यावर कालिबारी, नमुनीजला, अभयपूर, दयालनगर, मध्यमबस्ती इत्यादी ठिकाणी गुडघाभर पाण्यातून लोकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत.गाई, बकर्या, कोंबड्या घरच्या सगळ्या पाळीव प्राण्यांना घेऊन, आणि उरलेलं सामान घेऊन लोक निवार्यासाठी गावाबाहेरील शाळेत आसरा शोधत आहेत. इतक्या जलमय झालेल्या परिस्थितीतसुद्धा, नमुनीजला गावातील एका थोडं उंचावर असलेल्या घरातील चंदा दास यांनी मुंबईहून कोणीतरी आलंय हे कळल्यावर घरात बोलवून गरमागरम चहा पाजला. निःशब्द भावना! अशा परिस्थितीतही बाहेरून आलेल्या व्यक्तीविषयी आपुलकी पाहून शब्द स्तब्ध झाले.
युवा विकास केंद्राने जबाबदारी घेऊन, क्षमतेतील मदत करण्यास पुढाकार घेतलाय. छएथरूी भारत फेडरेशन’सुद्धा त्याच्या खांद्याला खांदा लावून सक्रिय सहभाग घेत आहे. मिळालेल्या मदतीचा विनियोग जेवण, औषधे, शुद्ध पिण्याचे पाणी यासाठी प्रामुख्याने होईल. मुंबईचे राजेंद्र जोशी, अनिल वनकुद्रे यांना संबंधित पुराच्या परिस्थितीची माहिती मिळाल्या मिळाल्या ताबडतोब आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले. ‘युवा विकास केंद्रा’चे कार्यकर्ते रवींद्र हन्मंतेकर, कृष्णा दास, रतन बोडो आणि महिला कार्यकर्त्या पिंकी यासुद्धा मदत करण्यास गुडघ्यापेक्षा जास्त पाण्यात उतरल्या होत्या. उर्वरित भारत आसामच्या पाठीशी जागृत संवेदनांसह उभा आहे.
लेखक: दयानंद सावंत