वागळेचा टेंपो - रिक्षाचालक ते महाराष्ट्राचे मंत्री!

    21-Jun-2022   
Total Views |
 eknath shinde life story 
 
 
 
 
ठाणे : महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवणारे शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे पक्ष नेतृत्वावर नाराज होऊन काही आमदारांसह सूरतमध्ये ठाण मांडून बसले आहेत. ठाण्याचा ढाण्या वाघ असा नावलौकीक मिळवलेल्या शिंदे यांनी थेट शिवसेनाच हायजॅक केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले असुन राज्यातील या भूकंपांचा केंद्रबिंदु ठाणे ठरले आहे. त्या ठाणेदार एकनाथ संभाजी शिंदे यांची राजकिय वाटचाल मोठी रंजक आहे.ठाण्यातील वागळे इस्टेट येथील साधा टेंपो व रिक्षा चालक ते महाराष्ट्राचा मंत्री हा प्रवास मोठा अविस्मरणीय आहे.
 

राज्यातील मविआ सरकारविरोधात सहयोगी आमदारांमध्ये मोठा असंतोष असल्याचा प्रत्यय राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत आला होता.त्यानंतर रातोरात काही आमदारांसह सुरतला रवाना झालेले मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीची चर्चा सर्वत्र रंगली आहे. कडवट शिवसैनिक आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे खंदे कार्यकर्ते. आनंद दिघेंसोबत आपला राजकीय प्रवास सुरु करणारे एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे शिवसेनेसोबत सक्रिय राजकारणात आहेत. आनंद दिघेंनंतर ठाण्यात शिवसेना वाढवण्याचं काम एकनाथ शिंदेंनी एकहाती केले. एवढंच नव्हे तर शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबतीने महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यातही एकनाथ शिंदेंचा मोठा सहभाग होता.
 

ठाण्यात राजकिय कारकिर्द घडवणारे एकनाथ शिंदे यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी साताऱ्यातील दरे या गावी झाला. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या शिंदेंची परिस्थिती तशी बेताचीच. एकनाथ शिंदेंनी लहान वयातच गाव सोडलं आणि ठाण्यात स्थायिक झाले. ठाण्यात आल्यानंतर त्यांनी कोपरीच्या मंगला हायस्कुलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले, तर न्यू इंग्लिश स्कुलमधून त्यांनी अकरावीचं शिक्षण घेतलं. आर्थिक अडचणींमुळं त्यांना कॉलेज सोडावं लागलं आणि अगदी तरुण वयातच एकनाथ शिंदे यांनी नोकरीला सुरुवात केली.
 

सुरुवातीच्या काळात ते ठाण्यातील वागळे इंडस्ट्रियल इस्टेटमधील एका माशांचा कंपनीत सुपरव्हायझर म्हणून कामाला होते. कालांतराने त्यांनी ही नोकरी सोडुन ऑटो रिक्षा तसेच टेंपो चालवू लागले. काम करत असताना एकनाथ शिंदे यांच्या आयुष्याला दोन व्यक्तिंमुळे कलाटणी मिळाली. त्या व्यक्ती म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्याचे शिवसेना नेते आनंद दिघे.
 
वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला आणि पक्षाच्या कामाला सुरुवात केली. पक्षाची कामं करताना शिंदेंना आनंद दिघेंचा सहवास लाभला आणि त्यांच्या प्रति विश्वास वाढू लागला. कालांतरानं एकनाथ शिंदे आनंद दिघेंचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले. शिवसेनेप्रती निष्ठा पाहुन एकनाथ शिंदे याना त्यांच्या कामाची पावती मिळाली. १९८४ साली वयाच्या विसाव्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यावर आनंद दिघेंनी जबाबदारी सोपवली. वागळेतील किसननगरच्या शाखाप्रमुख पदी नेमणुक करण्यात आली. इथूनच खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.

 
आनंद दिघे यांच्या खांद्याला खांदा लावून एकनाथ शिंदे हे काम करू लागले. पक्षानं दिलेल्या संधीचं शिंदेंनी सोनं करुन दाखवलं. दरम्यान एकनाथ शिंदे यांच लग्न झालं आणि त्यांनी लता शिंदे यांच्या सोबत संसाराला सुरुवात केली. त्यांना तीन मुलं झाली. दीपेश, शुभदा आणि श्रीकांत.१९९७ साली आनंद दिघे यांनी एकनाथ शिंदे यांना महापालिकेचे तिकीट दिलं.ते नगरसेवक म्हणून निवडून आले. कालांतरानं एकनाथ शिंदेंवर दुःखाचा डोंगर कोसळला. २००० साल हे शिंदे कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी ठरले.
 

 
एकनाथ शिंदेंची दोन मुलं दीपेश आणि शुभदा यांचा महाबळेश्वर येथील तापोळा बॅक वॉटरमध्ये दुर्घटनेत मृत्यू झाला. शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखातून बाहेर येण्यासाठी आनंद दिघे यांनी शिंदेंना खूप मदत केली.२००१ साली त्यांची ठाणे महापालिकेत सभागृह नेतपदी नियुक्ती होताच शिदे यांचा वारू उधळला. दुःखातून सावरल्यानंतर एकनाथ शिंदे पुन्हा राजकारणात सक्रिय झाले.
 

२००१ साली ते पुन्हा नगरसेवक झाले आणि पुढच्या दोनच वर्षांत त्यांना पक्षाकडून आमदारकीचं तिकीट मिळालं.२००२ ला दिघेंचे अकाली निधन झाल्यानंतर शिंदे यांनीच ठाण्यातील शिवसेनेचा डोलारा यशस्वीपणे हाताळला. ठाण्यासह कल्याण-डोंबिवली महापालिकेतही सेनेची सत्ता आणण्यात शिंदे यांचेच कसब होते. २००४ च्या आमदारकीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी बाजी मारली. २००५ साल हे पुन्हा त्यांच्यासाठी महत्वाचं ठरलं. एकनाथ शिंदे ठाण्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख झाले. कुणा आमदाराला पक्षातील हे पद देण्याची ही पहिलीच वेळ होती.
 

२००९ साली शिंदे पुन्हा आमदार झाले. पुढे २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती संपुष्टात आली. दोन्ही पक्षांनी स्वबळावर त्या सालची विधानसभा लढवली. शिवसेनेची थोडी पिछेहाट झाली होती. पण शिंदे यांनी पुन्हा गड राखला. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंचे पुत्र डॉ.श्रीकांत शिंदे हे सध्या लोकसभेत खासदार आहेत.
 

२०१४ मध्ये मात्रत्यांच्यासाठी नवी संधी चालून आली होती. भाजप राज्यात सत्तेत तर शिवसेना विरोधी बाकावर. त्यावेळी एक महत्वाचा निर्णय मातोश्रीवरून घेण्यात आला. शिवसेना भवनला निरोप धाडला गेला. आणि एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले. ऑक्टोबर २०१९ ते डिसेंबर २०१९ ते राज्यात विरोधीपक्ष नेते होते.पण नंतर मात्र शिवसेनेचा मनसुबा बदलला आणि शिवसेना भाजपसोबत थेट सत्तेत जाऊन बसली.

 
२०१४ ते २०१९ दरम्यान शिवसेना भाजपमध्ये अनेक वेळा खटके उडाले, तेव्हाही ते सगळे वार झेलायला एकनाथ शिंदेच पुढे असायचे. २०१९ साली राज्यात सत्तांतर झालं. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला. शिवसेना चक्क राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आघाडी स्थापन करत सत्तेत बसली. मुख्यमंत्री पदाचा पेच कायम होताच. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, पण कोण? या शर्यतीत दोन नावं आघाडीवर होती. एक म्हणजे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि दुसरं नाव म्हणजे एकनाथ शिंदे. पण शरद पवारांनी गेम केला आणि अखेर स्वतः शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

 
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद हुकले. पण सत्ता स्थापन झाल्यावर सत्तेत कॅबिनेट मंत्री झाले. शिवाजी पार्कवर झालेल्या ठाकरे सरकारच्या शपथविधी सोहळ्यात ७ ते ८ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात एकनाथ शिंदेंचाही समावेश होता. त्यांना नगरविकास मंत्री हे खातं देण्यात आलं. सरकार स्थापन झाल्यापासूनच महाविकास आघाडीत अनेक खटके उडाले. त्यावेळी पक्षाच्या निष्ठावंत नेत्यांपैकी एकनाथ शिंदेंनी पक्षासाठी अनेक महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. भाजपकडून वारंवार होणारे आरोप-प्रत्यारोप, रोखण्यासाठी एकनाथ शिंदेच ठामपणे उभे राहिले. पण आता पक्षाशी एकनिष्ठ असलेला खंदा कार्यकर्ता आणि बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक पक्षावर आणि पक्षश्रेष्ठींवर नाराज होऊन बंडाच्या पवित्र्यात उभा ठाकल्याने शिवसेना घायकुतीला आली आहे.
 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

दीपक शेलार

वायसीएमओयू मुक्त विद्यापीठातून वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन पदविका, तसेच पदवी. 'मुंबई तरुण भारत' या प्रथितयश मराठी दैनिकात ठाणे ब्युरो चिफपदी कार्यरत. ३० वर्षांपासून वृत्तपत्रविक्रेता, गेले एक तप विविध राज्यस्तरीय, तसेच स्थानिक वृत्तपत्रे व वाहिन्यांसाठी वृत्तांकन. गड-किल्ले भ्रमंती आणि मराठी नाटक, साहित्यात रुची, नवे शिकण्याचा हव्यास.