मुंबई : संख्याबळ असून देखील महाविकास आघाडी सरकारच्या पराभवाची मालिका सुरू असताना काँग्रेसच्या गोटातली आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. विधानपरिषदेच्या निकालानंतर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीमुळे बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विधासभेचे काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीतील मित्रपक्षांमध्ये एकवाक्यता नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले.
राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीने मविआ सरकारमधील अंतर्गत धुसपूस बाहेर पडली आहे. शिवसेनेत डावललं जात असल्याने शिंदे यांची पक्षात घुसमट होत असल्याचे बोलले जाते. १३ आमदारांसह एकनाथ शिंदेंचं बंड थोपवण्याचं आव्हान महाविकास आघाडी समोर असताना, कॉग्रेस नेते बाळासाहेब थोरात काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चेने मविआचं भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.