विधान परिषद : ठाकरे सरकारला फुटला घाम! भाजपचा आ'राम'!

    20-Jun-2022
Total Views |

election
 
 
 
  
 
मुंबई : राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण केलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवार सकाळपासूनच मतदान सुरू आहे. राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्याचा दुसरा भाग यानिमित्ताने पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीने येत्या काही वर्षांतील राज्याच्या राजकारणाचे चित्र स्पष्ट व्हायला मदत होणार आहे. राज्यसभेनंतर आता भाजपनेही कडवी झुंज देण्याची ठरवले आहे. मविआचे सहा तर भाजपचे पाच उमेदवार रिंगणात आहेत. या सगळ्या प्रक्रीयेत भाजपची रणनिती नियोजित पद्धतीने अंमलात आणली जात आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या गोटात चलबिचल सुरू असल्याचे दिसतेयं.
 
 
 
राज्यसभा निवडणुकीप्रमाणेच ही निवडणूकही महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष असलेल्या भाजपने प्रतिष्ठेची केली आहे. शिवसेना विरुद्ध भाजपमध्ये रंगलेल्या राज्यसभेच्या संघर्षात भाजपने तिसरी जागा पटकावत सेनेला धोबीपछाड दिला होता, तर शरद पवारांनीदेखील राज्यात घडवलेला चमत्कार फडणवीसांनीच घडवल्याचे जाहीरपणे कबूल केले होते.
 
 
 
राज्यसभेचा पराभव जिव्हारी लागलेल्या शिवसेना आणि महाविकास आघाडीने या निवडणुकीत अधिकची खबरदारी घेत आपल्या आमदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवले असून इतक्या दिवसांपासून रंगलेल्या या सत्तानाट्याचा दुसरा रोमहर्षक भाग आता समाप्त होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालावरही भविष्यातील अनेक राजकीय समीकरणे अवलंबून असतील, हे निश्चित आहे.
 
 
 
महाविकास आघाडीत शिवसेनाच ‘टार्गेट’वर!
 
परिषदेच्या एकूण दहा जागांसाठी चार पक्षांचे ११ उमेदवार रिंगणात आहेत. प्रत्येक उमेदवाराला जिंकून येण्यासाठी २६ मतांचा कोटा आवश्यक आहे. एकूण २८४ आमदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत. संख्याबळाच्या अनुसार शिवसेनेकडे ५५ मते असून त्यांचे दोन उमेदवार सचिन अहिर आणि आमषा पाडवी आवश्यक मते उपलब्ध असल्यामुळे निश्चित विजयी होतील, असे सध्याचे चित्र आहे. या संख्याबळासह शिवसेनेकडे बच्चू कडू यांच्या ‘प्रहार’चे दोन आमदार, शंकरराव गडाख, आशिष जयस्वाल, गीता जैन, चंद्रकांत पाटील अशी काही अतिरिक्त मते आहेत. इतर मते धरल्यास शिवसेनेचे संख्याबळ ६२ आहे.
 
 
 
आता या अतिरिक्त मतांवर काँग्रेसचा डोळा आहे. बच्चू कडू, शंकरराव गडाख हे शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीपदावर असल्याने त्यांच्या मतांचा निर्णय शिवसेनेकडे आहे. त्यामुळे शिवसेनेला पाठिंबा असलेल्या सहा अपक्ष आमदारांना फोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. अशा स्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आघाडीतील शिवसेनाच ‘टार्गेट’वर असल्याचे दिसते आहे. त्यामुळे शिवसेनेचे आमदार आणि सहयोगी आमदारांची मते या निवडणुकीत फोडण्यात दोन काँग्रेस यशस्वी होणार का? याचे उत्तर निकालाअंती मिळणार आहे.
 
 
 
खडसेंचे काय होणार?
 
राष्ट्रवादीने रामराजे निंबाळकर आणि एकनाथ खडसे या दोघांना उमेदवारी दिली आहे. हे दोन उमेदवार जिंकून आणण्यााठी राष्ट्रवादीला ५२ मतांची गरज आहे. १०० कोटी वसुली प्रकरणामुळे अनिल देशमुख आणि दाऊदशी संबंधित लोकांसोबत व्यवहार केल्याने नवाब मलिक हे सध्या कारागृहाची हवा खात आहेत आणि त्यामुळे त्यांची दोन मते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार नाहीत, हे न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी काही अपक्ष आमदार संपर्कात असून अपक्षांच्या मदतीने राष्ट्रवादी आपले उमेदवार निवडून आणण्याची रणनीती आखत असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी काय होणार, यावर सगळे काही अवलंबून राहणार आहे.
 
 
 
काँग्रेसला ८ मतांची गरज
 
काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप या दोन्ही उमेदवार निवडून येण्यासाठी एकूण ५२ मतांची गरज असून सध्या काँग्रेकडे ४४ मते उपलब्ध आहेत. त्यामुळे जर काँग्रेसला आपला पराभव टाळून दुसरा उमेदवार निवडून आणायचा असेल, तर त्यांना एकूण आठ मतांची गरज असून ती जर भागली नाही, तर काँग्रेसच्या एका उमेदवाराचा पराभव अटळ आहे.
 
 
 
भाजपला १७ मतांची गरज
 
भाजपने उमा खापरे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय, राम शिंदे या पाच जणांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवले आहे. भाजपचे संख्याबळ आहे १०६ आणि सात अपक्ष आमदारांचा त्यांना पाठिंबा आहे, म्हणजेच त्यांचे संख्याबळ आहे ११३. प्रत्यक्षात विजयासाठी भाजपला १३० मतांची गरज आहे. त्यामुळे आवश्यक मतांचा कोटा पूर्ण करण्यासाठी भाजपला एकूण १७ मतांची आवश्यकता असली, तरी आमचा पाचवा उमेदवार हमखास निवडून येणार, अशी शाश्वती भाजप नेते वारंवार देताना दिसून येत आहे.