कल्याण : कल्याणमधील पीडित अल्पवयीन तरुणीच्या आत्महत्येनंतर कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली असून रविवार, दि. १९ जून रोजी या तरुणीला न्याय मिळावा व आरोपींना कठोर शिक्षा मिळावी, या मागणीसाठी शांततेत निषेध रॅली काढण्यात आली. या निषेध रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सामाजिक संस्था आणि नागरिकांनी सहभाग घेतला. या तरुणीच्या मृत्यूनंतर ‘नोटपॅड’मधून समोर आलेल्या माहितीनुसार, त्या मुलीवर होत असलेल्या अत्याचाराच्या व्हिडिओच्या आधारे तिला ‘ब्लॅकमेल’ केले जात होते.
दोन वर्षापासून तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचारही सुरू होता. त्या अत्याचाराला कंटाळून तिने आत्महत्या केली. याच घटनेच्या निषेधार्थ आणि प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, या मागणीसाठी रविवारी सकाळी कल्याण पूर्व चक्की नाका ते कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली होती. दरम्यान, या प्रकरणातील आठ आरोपींना कोळशेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर कल्याणमध्ये एकच संतापाचे वातावरण आहे. त्यामुळेच नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, शाळकरी मुले, रिक्षा संघटना तसेच विविध सामाजिक संघटना यांनी एकत्रित येत निषेध रॅली काढली होती. या रॅलीत ‘वुई वॉण्ट जस्टीस’, ‘आरोपींना कठोर शिक्षा द्या’, ‘पीडीतेच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या’, अशा विविध घोषणा देण्यात आल्या.
या निषेध रॅलीमधून घडलेल्या संतापजनक घटनेबाबत जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट आहे, हे दिसून आले. दरम्यान, या जलदगती न्यायालयामध्ये खटला चालवून पीडित अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून दिला पाहिजे. कोणत्याही प्रशासन अधिकारी, गृहविभाग, पोलीस यांनी दबाव न आणता संबंधित गुन्हेगारांना शिक्षा करण्यात यावी. तसेच, या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी या निषेध रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांनी केली.