सहस्रचंद्र दर्शन पूर्ण करणार्‍या ११ ज्येष्ठ संघ स्वयंसेवकांचा सत्कार सोहळा उत्साहात

सहकार्‍यांच्या पुढाकाराने रंगलेल्या कौतुक सोहळ्यात उलगडल्या आठवणी

    20-Jun-2022
Total Views |

सत्कार सोहळा
 
 
 
 
 
 
ठाणे : वयाची ८० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ स्वयंसेवकांचा सत्कार अर्थात कौतुक सोहळा ठाण्यातील प्रताप व्यायाम शाळेत रविवार, दि. १९ जून रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. रा. स्व. संघाचे ठाणे जिल्हा संघचालक अरविंद जोशी यांच्या हस्ते सहस्रचंद्र दर्शन पूर्ण करणार्‍या ११ ज्येष्ठ स्वयंसेवकांना यावेळी सन्मानित करण्यात आले. बाल स्वयंसेवक म्हणून रा. स्व. संघाच्या संपर्कात येऊन आपले कौटुंबिक जीवन सांभाळून दीर्घकाळ संघविचार रुजविण्याचे काम या ११ स्वयंसेवकांनी केले आहे.
 
 
 
त्यामध्ये ज्येष्ठ स्वयंसेवक अच्युतराव वैद्य, जयराम क्षीरसागर, आनंद भागवत, स. गं. जोशी, सुधाकर ओजाळे, श्रीराम आगाशे, डॉ. पां. रा. किनरे, दिनकर दामले, शरद भावे, विष्णुपंत भिडे आणि दत्तात्रय निमकर यांचा समावेश आहे. या ठाण्यातील स्वयंसेवकांच्या कौतुकाने त्या मंतरलेल्या दिवसांची पुन्हा एकदा अनुभूती आली. ज्येष्ठ पत्रकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते अरुण करमरकर यांनी सत्कारमूर्तींना बोलते केले. ११ जणांच्या मुलाखतीतून रा. स्व. संघाच्या कामाच्या आठवणी जागवल्या गेल्या. संघाच्या कामाचे टप्पे उलगडले गेले. त्यावेळची आव्हान आणि त्यावर तत्कालीन स्वयंसेवकांनी केलेली मात याची उदाहरणे सांगितली गेली. संघाच्या विचारांचे झालेले स्वागत आणि त्यातून निर्माण झालेल्या विविध कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला.
 
 
 
संघाचा पाया रचणार्‍या दिवंगत स्वयंसेवकांच्या स्मृतीचे यावेळी जागरण करण्यात आले. संघ विचारांची आणि कार्याची सर्व क्षेत्रांत होणारी वाढ याविषयी या ज्येष्ठ स्वयंसेवकांनी समाधान व्यक्त केले. संघाच्या शताब्दी वर्षात योगदान देण्याची इच्छा या सर्व कौतुकमूर्तींनी व्यक्त केली. चार तास रंगलेल्या या कार्यक्रमाने नवी ऊर्जा दिली, अशी भावना कार्यक्रमात सहभागी सर्वांनीच व्यक्त केली. या हृद्य सोहळ्याने संघाच्या स्नेहभावाचे दर्शन झाले. या सत्कार समारंभाने ’माणसांचे काम’ हा रा. स्व. संघाचा स्वभाव अधोरेखित झाला आहे. रा. स्व. संघ लवकरच शंभरीत प्रवेश करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या आठवणी नव्या पिढीसमोर मांडण्याच्या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.