गांधीनगर : "राष्ट्रहित, समाजहितासाठी काम करण्यासाठी, लोकांच्या सेवेची भावना ठेवून एका नव्या अध्यायाला प्रारंभ करतोय" असा शब्दांत गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या राष्ट्राप्रती असलेल्या भगीरथ कार्यात एक शिपाई बनून राष्ट्रसेवेचे काम करेन अशा शब्दांत हार्दिक पटेलांनी नरेंद्र मोदी यांची स्तुती केली आहे. काँग्रेसमधील निष्क्रियतेला कंटाळून पक्षाला रामराम करून बाहेर पडलेले हार्दिक पटेल २ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
गुजरातमधील पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे यासाठी झालेल्या आंदोलनातून हार्दिक याचे नेतृत्व पुढे आले. भारतीय जनता पक्षाचे, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे एकेकाळचे मोठे टीकाकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर त्यावेळी अनेक गुन्हेही दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २०१९ त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. काँग्रेसचे गुजरात प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची २०२० मध्ये नियुक्ती झाली होती. काँग्रेस पक्षामधील निष्क्रियता,नेतृत्वाकडून दिली जाणारी दुय्यम वागणूक यांसगळ्या गोष्टींमुळे हार्दिक नाराज होते. त्यांनी तत्कालीन पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्नही करून बघितला पण त्यांच्याकडे लक्षच दिले गेले नाही. परिणामी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला.
हार्दिक पटेलांच्या भाजप प्रवेशाची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशापूर्वी ते भाजप पक्षाकडून आयोजित गोपूजेत सहभागी होतील. गांधीनगर येथे त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.