ठाणे : जून महिना सरत आला तरी पावसाने अजून दडी मारल्याने पाणी संकट अजून गहिरे बनत चालले आहे. हवामान खात्याचे सर्व अंदाज वरुण राजाने फोल ठरवल्याने एकीकडे बळीराजा चिंतेत पडला असुन दुसरीकडे ठाणे जिल्ह्यातल्या जलाशयातील पाणीसाठा घटत चालल्याने मुंबईसह ठाण्यावर पाणीकपातीची टांगती तलवार आहे. ठाणे व मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात अवघा महिनाभर पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आल्याने पाणीबाणीची भीती व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे यंदा पुरेसा पाणीसाठा असल्याने जिल्ह्यात कपात लागू करण्यात आली नव्हती, मात्र वेळेत पाऊस पडला नाही तर पाणीकपात लागू होण्याची शक्यता आहे. जुनच्या दुसऱ्या आठवड्यात तुरळक सरी पडल्यामुळे ऊन पावसाचा खेळ सुरु आहे. अशा तुरळक पावसाने जमीन ओली झाली नसल्यामुळे बळीराजाची शेतीची कामे खोळंबली आहेत. धरण क्षेत्रातही पाऊस न पडल्याने धरणे व जलाशयातील पाणी साठा घटत चालल्यामुळे पाणी कपातीची भीती व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी आठवड्यातून पुर्ण एक दिवस म्हणजे सरासरी १४ टक्के पाणीकपात करण्यात येत होती, मात्र दिवसेंदिवस पाणीसाठा कमी होत असल्याने तो पाणीसाठा येत्या १५ जुलै पर्यंत पुरवावा लागणार असुन, येत्या काही दिवसात पाणीकपात करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी बारवीत ४२ टक्के पाणीसाठा होता, मात्र आता फक्त ३२.२१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर आंध्रात १५.५१ टक्के पाणीसाठा होता तो सध्या १९.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणीकपातीचे संकट घोंघावत आहे.
पाणी कपातीची शक्यता
२००९ साली सर्वाधीक २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती, तर २०१० आणि २०११ या दोन वर्षात सरसकट ७ टक्के पाणीकपात लागू होती. परंतू २०१२ साली पाऊस चांगला झाला आणि पाणीपुरवठा करणारी धरणं भरून वाहू लागली. त्यामुळे २०१३ यावर्षी जिल्ह्यात पाणी कपात लागू करण्यात आली नव्हती, तर २०१४ साली पावसाचे प्रमाण घटल्याने सरसकट १४ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. त्यानंतरच्या सात वर्षात प्रत्येक वर्षी १४ टक्के पाणीकपात लागू होती, मात्र यंदा अद्याप पाणीकपात लागू करण्यात आली नसली तरी पावसाने पाठ फिरवली तर पाणी कपात होऊ शकते.
गतवर्षीचा आणि सध्याचा पाणीसाठा :
भातसा : ३२.०१ टक्के / ३२.०९ टक्के
आंध्रा : १५.५१ टक्के / १९.२८ टक्के
बारवी : ४२.०३ टक्के / ३२.७१ टक्के