देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती प्रदर्शनाचे उद्घाटन

    19-Jun-2022
Total Views |

DF
 
 
  
 
 
मुंबई : मुंबई भाजपच्यावतीने भारतीय जनसंघाचे अध्यक्ष डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देणार्‍या छायाचित्र स्मृती प्रदर्शनाचे लोकार्पण शनिवार, दि. १८ जून रोजी करण्यात आले. मुंबईतील प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हॉटेल ताज प्रेसिडेंट येथे करण्यात आले. दि. २३ जून ते ६ जुलैदरम्यान देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात हे प्रदर्शन भरवले जाईल.
 
 
 
तसेच, मुंबईतील वेगवेगळ्या भागात हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा आणि आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांच्यासह भाजप आमदार आणि पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आचार्य पवन त्रिपाठी यांनी केले, तर आभार प्रदर्शन आ. अ‍ॅड. आशिष शेलार यांनी केले.
 
 
 
असंतोषाला वाट मिळावी म्हणून आमचा पाचवा उमेदवार
 
विधान परिषद निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण सध्या तापले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने ताज हॉटेलमध्ये आमदारांसोबत बैठक घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीमध्ये आमदारांचे अभिनंदन केले. बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “कुणाच्याही अंतर्गत वादात मी बोलणार नाही. तिन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. कुणाचाही कुणामध्ये मेळ नाही. आपला उमेदवार निवडून येईल यासाठी सर्वच प्रयत्न करत आहेत. जो असंतोष आहे, त्याला वाट मिळाली पाहिजे. आम्ही पाचवा उमेदवार उभा केला आहे. ही निवडणूक संभव आहे, असंभव नाही,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
 
 
आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. यावर फडणवीस म्हणाले की, “कोणत्याही परिस्थितीत भाजपची मते कमी करण्याकरिता रवी राणा यांना नोटीस देऊन अटक करता येईल का याचा प्रयत्न आहे मात्र हे करता येणार नाही,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले. महाविकास आघाडी सरकारमध्ये विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर असलेल्या अस्वस्थ वातावरणावर फडणवीस म्हणाले की, “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षात अस्वस्थता आहे. तिन्ही पक्ष एकमेकांचे मत फोडण्याकरिता एकमेकांच्या आमदारांना फोन करत आहेत. टोकाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आताच्या परिस्थितीत आपला उमेदवार निवडून यावा असा तिन्ही पक्षांचा प्रयत्न आहे.” पुढे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत फडणवीस म्हणाले की, “राहुल गांधी खूप ट्विट करत असतात. दिवसभरात ते स्वतःच्या ट्विटला खोटी ठरविणारेही ट्विट करत असतात. त्यामुळे त्यांच्या ट्विटमुळे कोणत्या योजना मागेही घेतल्या जाणार नाही किंवा राहुल गांधींच्या ट्विटला फार महत्व देण्याचे कारण नाही.”
 
 
 
प्रदर्शनाचे आयोजन करण्याचे कारण म्हणजे देशभरात हे प्रदर्शन उपयोगी ठरावे. बलिदान दिनानिमित्त ज्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे, त्यातही प्रदर्शनी उपयोगी ठरेल. डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनप्रवासातून नवी ऊर्जा आणि चेतना मिळण्यास हे प्रदर्शन उपयोगी ठरावी, अशी इच्छा व्यक्त करतो.
- आ. मंगलप्रभात लोढा, मुंबई भाजप अध्यक्ष