योगस्थ: कुरू कर्माणि...

    18-Jun-2022   
Total Views |
 
yoga
 
 
 
दि. २१ जून हा ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. ‘योग’ ही भारतीय संकल्पना जेव्हा जागतिक होते, तेव्हा ती केवळ कायिक, वाचिक आणि मानसिक या स्तरांवर सीमित नसते. ‘योग’ तत्त्वज्ञान हे एका धर्मापुरतेच किंवा एका संस्कृतीपुरतेच मर्यादित नसून त्याचा विस्तार अन्य धर्मांमध्येही झालेलाही दिसून येतो. विविध धर्मसंस्कृतीतील योग तत्त्वज्ञान आपण या लेखातून थोडक्यात जाणून घेऊया...
 
प्रथम ‘योग’ हा शब्द ‘युज समाधौ’ आत्मनेपदी दिवादिगणीय धातूंमधील ‘घं’ प्रत्यय लागून तयार होतो. यानुसार ‘योग’ या शब्दाचा अर्थ ’समाधी’ अर्थातच ‘चित्तवृत्तींचा निरोध’ असा होतो. काही विद्वानांच्या मते, जीव आणि परमात्मा यांच्या एकरूप होण्याला ‘योग’असे म्हणतात. परंतु, हा अर्थ स्वीकारण्यास आक्षेप येतात. कारण, बौद्ध धर्मदेखील परमात्म्याची सत्ता न मानताही ’योग’ हा शब्द वापरतात. सांख्यवादीसुद्धा ईश्वराचे अस्तित्व मानत नाहीत. परंतु, ‘योग’व्यवहार ते करतात. महर्षी पतंजली यांच्या योगसूत्रांमध्ये ’योगश्चित्तवृत्तिनिरोधः।’ असा उल्लेख येतो. काही भाष्यकार याचा दोनप्रकारे अर्थ घेतात. एक म्हणजे, चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग. दुसरा म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध करण्यासाठीची साधने म्हणजे योग.
 
 
त्याचप्रमाणे इंद्रियांचा संयम करून मन एकाग्र करणे म्हणजे योग होय, असे कठोपनिषद व श्वेताश्वतर-उपनिषद या प्राचीन उपनिषदांमध्ये सांगितलेले आहे. श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी भगवद्गीतेला ‘योगशास्त्र’ ही संज्ञा दिली आहे. जडवादी चार्वाक दर्शन सोडल्यास बाकीची भारतीय तत्त्वदर्शने योगविद्येला मान्यता देतात. योगाभ्यास पूर्णतेस प्राप्त झाल्याने म्हणजे योग सिद्ध झाल्याने, आत्मसाक्षात्कार प्राप्त होतो. आत्मसाक्षात्काराने मोक्षप्राप्ती होते, असे आत्मवादी भारतीय दर्शने मानतात. आत्मसाक्षात्काराचे मुख्य साधन योग होय, असे सर्व आत्मवादी भारतीय दर्शने सांगतात. शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रभाष्यात तत्त्वदर्शनाचा उपाय म्हणजे योग अशी योगशास्त्रात सांगितलेली व्याख्या उद्धृत केली आहे. तत्त्वदर्शनाने मोक्षप्राप्ती होते. मोक्ष म्हणजे जन्ममरणपरंपरारूपी संसारापासून मुक्ती होय. जीवात्मा आणि परमात्मा यांचा आनंदमय संयोग साक्षात्काराने, भक्तीने वा ध्यानाने घडून येतो, त्यास ‘योग’ म्हणतात, असे उपनिषदांत उल्लेख आहेत.
 
संस्कृतमधील ‘युज्’ धातूपासून ‘योग’ हा शब्द बनला आहे, असेही मतप्रवाह आहेत. गाडीला किंवा रथाला घोडा वा बैल हे वाहन जुंपतात. जुंपणे म्हणजे योग. इंद्रियांना घोड्यांची व शरीराला रथाची उपमा कठोपनिषदात दिली आहे. इंद्रियांना जुंपून व ताब्यात ठेवून अंतिमपदापर्यंत पोहोचता येते, असे येथे म्हटले आहे. संक्षिपत: ‘योग’ ही दार्शनिकदृष्ट्या व्यापक संकल्पना आहे. त्याचे स्वरूप प्रत्येक तत्त्वज्ञानानुसार बदलत गेलेले आहे. जगत अनित्य मानणारे अद्वैतवादी निदिध्यासनामध्ये योगाला स्थान देतात. अनीश्वरवादी सांख्यही त्याचे समर्थन करतात. बौद्ध, जैन, मुस्लीम सुफी, ख्रिश्चन धर्मामध्येही ’योग’चे रूप बदलून उपयोजन झालेले दिसून येते.
 
योगाची परंपरा अत्यंत प्राचीन आहे. ती आपल्याला वैदिक काळापासून दिसते. सर्वात पहिला ‘योग’ या शब्दाचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आढळतो. कोणताही धर्म, संस्कृती यांची निर्मिती होण्यापूर्वी ’योग’चे अस्तित्व होते. योगविद्येचे आदिगुरू भगवान शिवांना मानले जाते. भगवान शिवांनंतर वैदिक ऋषिमुनी, नंतर श्रीकृष्ण, भगवान महावीर, गौतम बुद्ध यांनी योगाचा विस्तार केला. महर्षी पतंजलींनी त्याला सुव्यवस्थितरूप दिले. त्याच्याही पुढे सिद्धपंथ, शैवपंथ, नाथपंथ, वैष्णव आणि शाक्तपंथ, तसेच अन्य पंथांनी आपापल्यापरीने योगतत्त्वज्ञानाचा प्रसार केला. योगाच्या प्राचीनत्वाचे पुरावे सिंधू संस्कृतीत आढळलेल्या मूर्तींमध्ये सापडतात. यातील अनेक मूर्ती या योगावस्था, विविध मुद्रा धारण केलेल्या आहेत. आज विविध धर्म, संप्रदाय अस्तित्वात आहेत. योगाभ्यास हा अगदी यहुदी, शीख, पारशी धर्मांमध्येही दिसतो. परंतु, बौद्ध, जैन, हिंदू, मुस्लीम हे या धर्मात तो विशेषत्वाने दिसून येतो.
बौद्ध धर्म
बौद्ध धर्म हा सर्वात प्राचीन धर्म आहे. योगदर्शनाशी सर्वााधिक साम्य असणारा बौद्ध धर्म आहे. कुशल चितैकग्गता योगः। अशी योगाची व्याख्या बौद्ध दर्शनात दिसते. प्राचीन बौद्ध धर्म जर पाहिला, तर त्यांची ध्यान-धारणा स्थिती आणि योगासने यांचा जवळचा संबंध असलेला दिसून येतो. योगशास्त्रातील यम-नियम हे गौतम बुद्धांच्या उपदेशांची बीजेच आहेत. गौतम बुद्धांचा ‘गुहासमाज’ नावाचा तंत्रग्रंथ आढळतो. त्यामध्ये योगसाधने आणि त्यांचे प्रयोजन याची माहिती मिळते. बौद्ध धर्माने आसन-प्राणायाम यांच्यावर भर देण्याऐवजी तत्त्वज्ञानाला महत्त्व दिले. इंद्रियसंयमन हे जसे योगाचे मूळ प्रयोजन आहे, तेच बौद्ध धर्माचेही आहे. बौद्ध धर्माने सांगितलेली ’अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह’ ही तत्त्वे बौद्ध धर्मामध्येही आढळून येतात. ’योगाकार बौद्धी’ असा संप्रदाय भारतात इसवी सन चौथ्या-पाचव्या शतकात विकसित झालेला दिसतो. बोधिसत्त्वापर्यंत जाण्याचा मार्ग हा योगाकार संप्रदाय ’योग’ मार्गाने दाखवतो. झेन हे महायान बौद्ध धर्माचे एक रूप आहे. महायान संप्रदायाने आपल्या तत्त्वज्ञानात योगाला जास्त महत्त्व दिले. ‘झेन’ हा शब्द ’जेन’ या शब्दापासून व्युत्पत्त झालेला असून, ’ध्यान करणारे’ असा त्याचा अर्थ आहे. झेन लोक ध्यानाला आत्यंतिक स्थान देतात. शालेय जीवनापासून ते योगप्रथा आणि ध्यान आपल्या पाल्यांना शिकवताना दिसून येतात.
 
 
 
तिबेटीयन बौद्ध हे बौद्ध परंपरेतील आद्य मानले जातात. त्यांच्या तत्त्वज्ञामध्येही योगाला स्थान दिलेले आहे. त्यांच्या निन्गमन/ न्यिन्गमा परंपरेमध्ये ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी नऊ मार्ग सांगितलेले आहे. त्यातील अंतिम सहा मार्ग ही योगासनेच आहे. ज्यात क्रिया योग, उपयोग, योगयान, महायोग, अनुयोग आणि अतियोग यांचा संबंध आहे. बौद्ध धर्माच्या सरमा परंपरेने यातील काही योगासनांना एकमेकांमध्ये समाविष्ट केले. तसेच, बौद्धांच्या तंत्रयोगामध्ये १०८ शरीरासनांचा अभ्यास केलेला दिसतो.
जैन धर्म
जैन धर्म आणि योगशास्त्र यांचा जवळचा संबंध दिसतो. त्याप्रमाणे बौद्ध धर्माची तत्त्वे ही योगशास्त्रातही दिसतात. त्याचप्रमाणे जैन धर्म ज्या पाच महाव्रतांवरती आधारित आहे, तेच योगशास्त्राचे यम-नियमन आहे. दुसर्‍या शतकातील जैन ग्रंथ ’तत्त्वसूत्रा’नुसार मन, वाणी आणि सर्व शरीर व्यवहारांचे मूळ ’योग’ आहे. उमास्वामी या जैन आचार्य उमास्वामी यांच्या मते, ’आस्रव’ म्हणजे संसाराचे मुख्य कारणच योग आहे आणि जैन धर्मातील जी ’रत्नत्रय’ आहेत, त्यातील ’सम्यक् चरित्र’ यासाठी योगच आवश्यक आहे. कारण, या योगक्रियांमुळेच ’निरोध मुक्ती’ मिळते. जैन तत्त्वज्ञानात मुक्ती मिळवण्यासाठी तसेच ज्ञानप्राप्तीसाठी योगज्ञान सांगितलेले आहे. जैन धर्माचे प्रथम तीर्थंकर ऋषभदेव यांच्यापासून महावीरांपर्यंतच्या आसनमुद्रा पाहिल्या तर त्या योगमुद्राच आहे. या तीर्थंकरांच्या ज्ञानप्राप्तीवेळची आसने ही खडगासन आणि पद्मासन आहे. भगवान महावीरांना मूलबंध आसनस्थितीत असताना आत्मज्ञान झाले. तसेच, ऋषभदेवांचीही मुद्रा ही कर्योत्सर्ग आसनमुद्रा आहे. आचार्य महाप्रज्ञ यांनी प्रेक्षा ध्यानाचा अभ्यास आणि प्रचार केला. जैन आचार्य शिवमुनी हे जैन श्रमण संघातील प्रसिद्ध ध्यानगुरू होते. विविध जैन आचार्यांनी योगाभ्यासावरती ग्रंथ लिहिलेले आहेत. पूज्यपदाचार्यांनी ‘इष्टोपदेश’; आचार्य हरिभद्र सुरी यांनी ‘योगबिंदू’, ‘योगद्रिस्तमुचकाया’, ‘योगसताका’, ‘योगविमिसिका’; आचार्य हेमाकन्द्र यांनी ‘योगशास्त्र’ हे ग्रंथ लिहिले. तसेच, ’अचरंगासूत्र’ आणि ‘तत्त्वार्थसूत्र’ हे जैनधर्माचे परिचित ग्रंथ योगाची महती सांगणारेच आहेत.

इस्लाम धर्म
 
 
इस्लाम धर्म आणि योग यांचा काही प्रमाणात संबंध आहे. यावरती काही मुस्लीम संशोधकांनी संशोधनही केलेले आहे. ‘इस्लाम’ या शब्दाचा अर्थच ’परमात्मा-परमशक्तीला संपूर्णत: शरण जाणे,’ असा आहे. योगशास्त्रामध्येच याला ’ईश्वरप्रणिधान’ असे म्हणतात. योगासने आणि नमाज यांचाही संबंध आहे. नमाज अदा करतानाची स्थिती ही वज्रासनाची आहे. नमाज अदा करताना जेव्हा नमाजी झुकतात ती स्थिती आहे शशंकासन. योगासनाआधी जे शौचादी नियम आहेत, तेच नियम नमाजाच्या आधी आहेत. योगक्रियेच्या आधी संकल्प करण्याची पद्धत असून, नमाज अदा करण्याआधी ’नियत’ करतात. याचप्रमाणे सुफी संगीतामध्ये योग आपल्याला दिसून येतो. ज्यात आसन आणि प्राणायाम(श्वास नियंत्रण) आपल्याला दिसून येते.
 
 
 
ख्रिस्ती धर्म
 
ख्रिस्ती धर्मामध्येही ’चंगाई सभा’ होते. यातील वाद बाजूला ठेवून या सभेत ज्या क्रिया केल्या जातात, त्या प्राणविद्या, कुंडलिनी योग आणि रेकी स्वरुपात असतात.अशा प्रकारे विविध पंथांमध्ये योगाभ्यास दिसून येतो. योगाचा जेव्हा व्यापक स्वरूपात आपण विचार करतो, तेव्हा योग हा केवळ एका देशापुरता, धर्मापुरता किंवा संस्कृतीपुरता मर्यादित नाही, हे आपल्या लक्षात येते. विविध मानवी समुदाय हे योग तत्त्वज्ञान आचरणात आणत आहेत. हे तत्त्वज्ञान केवळ बौद्धिक स्वरुपापुरते मर्यादित नाही. ध्यान-धारणा-आसन या सर्वांचा आपल्या मानसिक-शारीरिक बदलांवरती परिणाम होत असतो. मानव मग तो कोणत्याही धर्म-पंथाचा असला, तरी त्याचा सर्वांगाने विचार ‘योगशास्त्रा’मध्ये केलेला आहे. आपण जेव्हा ‘मानवतेसाठी योग’ याचा विचार करतो, तेव्हा मानव हा त्यातील मुख्य भाग असून, तो व्यवस्थित असणे अत्यावश्यक असते. त्यामुळे भेदभावाच्या वादात न पडता योगाला केंद्रस्थानी ठेवून क्रिया करणे, हेच इष्ट आहे. म्हणून श्रीकृष्ण भगवद्गीतेत म्हणतात - योगस्थ: कुरू कर्माणि।
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

वसुमती करंदीकर

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका: ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत ८ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.