नवी दिल्ली : “केंद्र सरकारने ‘अग्निपथ’ योजनेतील ‘अग्निवीरां’च्या भरतीसाठीची वयोमर्यादा शिथील करत, ती २१ वरून २३ इतकी निर्धारित केली आहे. त्यामुळे आता देशातील तरुणांनी लवकरच सुरू होणार्या भरतीकडे लक्ष केंद्रित करावे,” असे आवाहन देशाचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केले. दरम्यान, भारतीय वायुदलासाठी भरती येत्या दि. २४ जूनपासून, तर लष्करासाठी येत्या डिसेंबर महिन्यात भरतीस प्रारंभ होणार आहे. केंद्र सरकारने लष्करभरतीसाठी नुकत्याच जाहीर केलेल्या ’अग्निपथ’ योजनेअंतर्गत नव्याने भरती होणार्यांसाठी प्रवेशाची वयोमर्यादा १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्ष अशी निश्चित करण्यात आली होती. परंतु, गेली दोन वर्षे लष्करात भरती प्रक्रिया सुरू करणे शक्य झाले नसल्याची दखल घेत, सरकारने २०२२ साठी प्रस्तावित लष्कर भरतीसाठी वयामध्ये यंदा सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार, २०२२ ‘अग्निपथ’ योजनेतील भरती प्रक्रियेसाठी उच्च वयोमर्यादा २३ वर्षे अशी करण्यात आली आहे. त्याविषयी बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “केंद्र सरकारला देशातील तरुणांची काळजी असल्याचे वयातील शिथिलतेच्या निर्णयावरून सिद्ध झाले आहे. लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्यासाठी, लष्करी व्यवहार विभाग, संरक्षण मंत्रालय वचनबद्ध आहेत.आम्ही तरुणांना सशस्त्र दलात सहभागी होण्यासाठी आणि ‘अग्निपथ’च्या माध्यमातून राष्ट्रसेवा करण्यासाठी आमंत्रित करत आहोत,” असेही संरक्षण मंत्र्यांनी यावेळी नमूद केले. लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे याविषयी बोलताना म्हणाले की, “भारतीय लष्कर ‘अग्निपथ’ योजनेचे आणि ‘अग्निवीरां’चे स्वागत करण्यास सज्ज आहे. त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसांत लष्करभरतीविषयीची अधिसूचना जारी करण्यात येणार आहे.” त्यानंतर साधारणपणे वर्षअखेरीस म्हणजे डिसेंबर महिन्यात ‘अग्निवीरां’च्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणास प्रारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
देशातील तरुणांपर्यंत या योजनेची पूर्ण माहिती अद्याप पोहोचलेली नसल्याचे मत जनरल पांडे यांनी व्यक्त केले. त्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, “ज्यावेळी त्यांना संपूर्ण योजना व्यवस्थितपणे समजेल, त्यानंतर ही योजना केवळ तरुणच नव्हे, तर राष्ट्र आणि तिन्ही सेनादलांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. गेल्या दोन दिवसांत केंद्र सरकारची मंत्रालये आणि राज्य सरकारांनी, कॉर्पोरेट विश्वाने या योजनेविषयी अनेक घोषणा केल्या आहेत. त्यामुळे युवकांच्या मनात नक्कीच विश्वास निर्माण होणार आहे.” वायुदल प्रमुख ‘एअर चीफ मार्शल’ व्ही. आर. चौधरी म्हणाले की, “भरतीसाठीची वयोमर्यादा आता २१ वरून २३ करण्यात आली आहे. याचा देशातील तरुणांना लाभ होणार आहे.” त्याचप्रमाणे भारतीय वायुदलासाठी 24 जूनपासून भरती प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी तरुणांनी सज्ज राहावे,” असेही आवाहन त्यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे नौदलप्रमुख अॅडमिरल आर. हरिकुमार यांनी तरुणांना हिंसेचा मार्ग न निवडण्याचे आवाहन केले आहे. ‘अग्निपथ’ योजनेविषयी समाजमाध्यमांमध्ये चुकीची माहिती पसरवणार्या आणि विद्यार्थ्यांना भडकावणार्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर गुप्तचर यंत्रणा बारीक नजर ठेवून आहेत. पोलीस आणि सार्वजनिक मालमत्तेला लक्ष्य करण्यासाठी आंदोलनात सामील होणार्या समाजकंटकांवर लक्ष ठेवण्यास त्यांनी राज्य पोलिसांना सांगितले आहे. प्राप्त माहितीनुसार, गुप्तचर खाते लष्कर भरतीच्या तयारीसाठीच्या ‘कोचिंग इन्स्टिट्यूट’च्या समाजमाध्यमांवरील खात्यांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. त्याचप्रमाणे या संस्थांच्या मालकांशी संवाद साधून त्यांनी विद्यार्थ्यांना शांतता राखण्याचे आवाहन करण्याचे निर्देश स्थानिक पोलिसांना देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांत शेकडो व्हॉट्सअॅप समूह तयार करण्यात आले आहेत, ज्यात भरती योजनेबाबत चुकीची माहिती पसरवली गेली असल्याचेही सांगण्यात आले आहे.
‘अग्निवीरां’साठी केंद्रीय अर्थमंत्रालयाचाही पुढाकार
अग्निवीरांनी आपल्या सेवेची चार वर्षे पूर्ण केल्यानंतर बँका किंवा वित्तीय संस्था त्यांना कशाप्रकारे मदत करू शकतील, यावर विचारविनिमय करण्यासाठी, केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या वित्तीय सेवा विभागाच्या सचिवांनी नुकतीच सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक विमा कंपन्या आणि वित्तीय संस्थांच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसोबत एक बैठक घेतली. या बैठकीत लष्करी व्यवहार विभागाच्या सहसचिवांनी ‘अग्निपथ’ योजनेची ठळक वैशिष्ट्ये सांगणारे सादरीकरण केले. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सार्वजनिक विमा कंपन्या आणि वित्तीय संस्था या अग्निवीरांसाठी त्यांच्या क्षमता लक्षात घेऊन कोणत्या नोकर्या दिल्या जातील, याचा विचार करतील, त्यांचे शिक्षण आणि कौशल्ये लक्षात घेऊन त्यांच्यासाठी काही रोजगार तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील, आवश्यक असल्यास त्यासाठी काही अटी शिथिल करणे, सवलती देणे यांचाही विचार केला जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तसेच अग्निवीरांना पाठबळ देण्यासाठी, त्यांची कौशल्ये वाढवणे, उच्च शिक्षण घेणे अथवा एखादा व्यवसाय तसेच स्वयं उद्यमशीलता यासाठी आवश्यक तो कर्जपुरवठा करण्याच्या शक्यतांचाही विचार केला जाईल. केंद्र सरकारच्या ’मुद्रा योजना’, ‘स्टॅण्ड अप’ योजना इत्यादींचा लाभ अग्निवीरांना मिळवून देण्यासाठीदेखील प्रयत्न केले जातील.
गेले नितीशकुमार कुणीकडे?
‘अग्निपथ’ योजनेविरोधात प्रामुख्याने बिहार राज्यात आगडोंब उसळला आहे. अनेक रेल्वेगाड्या जाळण्यात आल्या असून स्थानकांवरही तोडफोड करण्यात येत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार मात्र मौन बाळगून आहेत. तरुणांनी शांतता राखावी, असे आवाहनदेखील त्यांच्याकडून करण्यात आलेले नाही. त्याचवेळी नितीशकुमार यांच्या पक्षातील उपेंद्र कुशवाह यांच्यासारखे नेते या योजनेस विरोध करत आहेत. बिहारप्रमाणेच उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, तेलंगण आणि उत्तराखंड या राज्यांमध्येही विरोध करण्याचा प्रकार घडला असता, भाजपशासित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन करीत तातडीने कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देऊन तरुणांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यामुळे नितीशकुमार यांच्या मौनाविषयी विविध प्रश्न निर्माण होत आहेत.