पुणे: ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांना १३ जून रोजी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी गेले असता त्यांना त्रास जाणवू लागला. ताप आणि खोकला सुरु झाला. न्यूमोनियाच्या उपचारादरम्यान डॉ. आमटे यांना प्राथमिक अवस्थेतील रक्ताचा कर्करोग असल्याचे समजले.
तीन दिवसाच्या उपचारानंतर डॉ. आमटे यांना घरी सोडले. याची माहिती मुलगा अनिकेत आमटेनी फेसबुक पोस्टद्वारे दिली. “बाबांची तब्येत आज बरी आहे. आज सध्या पुरता डिस्चार्ज मिळाला आहे. दोन तीन दिवसांनी तपासणी होईल. परत रक्ताच्या सर्व टेस्ट करतील आणि ब्लड व्हॅल्यूज ठीक असल्यास लवकरच केमोथेरपी सुरू करतील. पुढील साधारण महिनाभर ट्रीटमेंट पुण्यातच होणार आहे. बाबांचा आजचा फोटो सोबत जोडला आहे. रुमानी सोबतचा. पेशंट कसा असावा याचे आयडीयल उदाहरण बाबा आहेत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये अतिशय आपुलकीने ट्रीटमेंट करणारे डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, मामा मावश्या सर्वांचे आभार.” असे अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितले.