भक्तियोग

युञ्जते इति योग: भाग - ५

    18-Jun-2022
Total Views |

bhaktiyog
 
 
 
 
 
 
’भागः भक्तिः‘ म्हणजे भक्त हा परमेश्वराचा भाग होण्याची प्रक्रिया जिच्यामुळे संपन्न होते, ती भक्ती! प्रत्येक मनुष्यास परमात्मप्राप्तीचा लाभ निश्चितपणे मिळवून देणारा भक्तिमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हटला आहे. भक्तीमध्ये ‘ज्ञान’ आहे. कारण, मी भगवंताचा आहे. हे ज्ञान झाल्याशिवाय जीव भगवंताच्या नादी लागत नाही. भक्तीमध्ये ‘कर्म’ आहे. कारण, भगवंतासाठी काही तरी केल्याशिवाय जीवाला चैनचं पडत नाही. भक्तीत योगदेखील आहे. कारण, भगवंताचे चिंतन करता करता त्यातूनच जीव आपोआप धारणा व ध्यान साधतो.
 
 
 
पैठणमध्ये राहणार्‍या २२ वर्षांच्या कुर्मदासने आईला हाक मारली, “आई, ये लवकर कीर्तनाची वेळ झाली.” आई म्हणाली, “रोज कीर्तन... तुला हात-पाय नाहीत... रोज कसे नेणार कीर्तनाला? २२ वर्षांच्या तुला कसे नेणार?” कुर्मदास म्हणाला, “आई, फक्त आजच्याच दिवस घेऊन चल मला कीर्तनाला... उद्या नाही म्हणणार...”’ आई कुर्मदासाला पाठीवर घेऊन भानुदास महाराज यांच्या कीर्तनाला आली व तिथे त्याला सोडून दिलं. भानुदास महाराज म्हणजे एकनाथांचे पणजोबा!! कुर्मदास पोटावर फरफटत पुढे पहिल्या रांगेत आला. कुर्मदासला महाराजांनी विचारलं, “अरे कुणाबरोबर आलास? आता घरी कसा जाशील?” त्यावर कुर्मदास म्हणाला, “नाही, मला आता घरी नाही जायचं महाराज, मी पण येऊ का तुमच्याबरोबर पंढरीला. तुम्ही फक्त हो म्हणा!” महाराज हसत “हो... ये” म्हणाले. रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून कुर्मदास उठला. स्नान करून फरफटत लोटांगण घालत त्याने पंढरीचा रस्ता धरला. लोकांना विचारलं, “पंढरीचा रस्ता कोणता हो?” लोक सांगू लागले. सकाळी १० वाजेपर्यंत कुर्मदासानं बीड गाठलं. वेशीवर हनुमंताच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला, ”ऐका हो ऐका, भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे!!” कुणी कालवण, भाकरी आणाव्या! मग महाराजांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती. महाराजांनी बिना हातापायाच्या कुर्मदासाला पाहिलं, विचारलं, “कुर्मदासा, कसा आलास रे?” तो म्हणाला, “महाराज, तुमच्या ‘हो’ने मला आणलं...” जेवणानंतर महाराज म्हणाले, “आपल्या उद्याचा मुक्काम मांजरसुंबा...”
 
 
 
रात्री वारकरी झोपल्यावर पुन्हा कुर्मदास फरफटत मांजरसुंब्याला निघाला. तिथे जेवणाची व्यवस्था केली. लोळण घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती. पण, कुर्मदासाचं ध्येय एकच... विठुरायाची भेट! येरमाळा, बार्शी, कुर्डूवाडी, लऊळगाव! सर्वांची जेवणं झाली. महाराज म्हणाले,“कुर्मदासा, एकच मुक्काम; मग तू विठुराया भेटशील...” वेदनांनी विव्हळत कुर्मदास म्हणाला, ”नाही महाराज, आता मी नाही येऊ शकणार. अंगात त्राणही राहिलं नाही. तुम्ही पांडुरंगाला दोनदा नमस्कार करून सांगा... तुझ्या पायाजवळ यायला कुर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं...” याचं कारण-मलमूत्र कोण धुणार म्हणून गेले कित्येक दिवस कुर्मदासाने अन्नपाणी सोडलं होतं. भानुदास महाराज पंढरपुरात आले आणि दर्शनाला उभे राहिले. पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितलं, ”कुर्मदासाला भेटायला मी लऊळला चाललो...“ कुर्मदास शुद्ध हरपून वाळवंटात पडला होता. शरीरातून रक्त वाहात होत. विठ्ठलांनी त्याचं शिरकमळ आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले, ”तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आला आहे, कुर्मदासा...“ ”होय विठ्ठला, हीच माझी पंढरी!!“ कुर्मदासाने साश्रू नयनांनी विठ्ठलाला नमन केले व आपला प्राण सोडला. धन्य तो कुर्मदास आणि धन्य त्याची भक्ती!!! ’भागः भक्तिः‘ म्हणजे भक्त हा परमेश्वराचा भाग होण्याची प्रक्रिया जिच्यामुळे संपन्न होते, ती भक्ती! प्रत्येक मनुष्यास परमात्मप्राप्तीचा लाभ निश्चितपणे मिळवून देणारा भक्तिमार्ग हा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हटला आहे. भक्तीमध्ये ‘ज्ञान’ आहे. कारण, मी भगवंताचा आहे. हे ज्ञान झाल्याशिवाय जीव भगवंताच्या नादी लागत नाही. भक्तीमध्ये ‘कर्म’ आहे. कारण, भगवंतासाठी काही तरी केल्याशिवाय जीवाला चैनचं पडत नाही. भक्तीत योगदेखील आहे. कारण, भगवंताचे चिंतन करता करता त्यातूनच जीव आपोआप धारणा व ध्यान साधतो. श्री समर्थांनी म्हणूनच दासबोधात भक्तीला पहिला क्रमांक दिला.
 
 
 
श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पदसेवनम्।
अर्चनं वंदनं दास्यं सख्यामात्मनिवेदनम्॥
 
 
 
नवविधा भक्ती ही भागवतात व नारदीय भक्तिसूत्रात वर्णन केलेली आढळते. श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवा, अर्चन, वंदन, दास्य, सख्य व आत्मनिवेदन हे भक्तीचे नऊ प्रकार
श्रवण : भगवंताची कथा ऐकावी, पुराण ऐकावे, प्रवचनांत व निरूपणांत अनेक प्रकारचे अध्यात्मविषय ऐकत जावे.
कीर्तन : भगवंताच्या कथा सांगाव्या. त्याचे वर्णन करावे. भगवंताचे गुणगायन करावे. कीर्तनाने मोठी पापे नष्ट होतात. परमात्मा संतोष पावतो.
नामस्मरण : भगवंताचे नाम अखंड जपत जावे. सर्व संतांनी नामस्मरणावर भर दिलेला आढळतो.
पादसेवन : भगवंताच्या प्राप्तीसाठी काया, वाचा, मनाने व आपलेपणाने सद्गुरूंची चरणसेवा करणे म्हणजे पादसेवन भक्ती.
अर्चन : पूजा करणे, वस्त्रे, अलंकार, फुले, गंध इ. वापरून पूजा करावी. तसेच, देवाच्या मूर्तीचे ध्यान करून मनाने पूजा करावी ही अर्चन भक्ती होय.
वंदन : नमस्कार करणे हे शरण जाण्याचे चिन्ह आहे. देवाला, संताना नमन करावे.
दास्य : भगवंताचे वा सद्गुरूंचे दास्य अंगीकारल्याशिवाय भक्तीची पूर्णता होत नाही. त्यासाठी देवाच्या दाराशी नेहमी जवळ असावे, पडेल ते काम करावे.
सख्य : भगवंताशी स्नेह जोडावा. मैत्री करावी. भगवंताला शरण जाण्यात भक्तीचे खरे मर्म साठविले आहे.
आत्मनिवेदन : आपण स्वतःला सर्वस्वी भगवंताला समर्पण करणे, त्याच्या हाती सोपविणे म्हणजे आत्मनिवेदन.
अशा या नवविधा भक्तीत सर्व भक्तिमार्गाचे सारच आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, “या भावभक्तीच्या योगाने प्रत्यक्ष नारायण आमचा ऋणी होऊन राहिला आहे; एवढेच नव्हे, तर तो आम्हाला सोडून क्षणभरसुद्धा राहात नाही. मी माझा योगक्षेमाचा सगळा भार त्याच्यावर घातला आहे आणि त्यामुळे मला आता कोणतीच चिंता नाही! माझ्या मुखातून जी वचने बाहेर पडतात, ती भगवंतच बोलतो; त्याची कृतज्ञता म्हणून मी त्याचे नाम माझ्या कंठी धारण केले आहे.
श्रीमद्भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेच आहे.
 
 
 
ये तु सर्वाणि कर्माणि मयि
संन्यस्य मत्परा:।
भवामि नचिरात्पार्थ मय्याविशितचेतसाम्॥७॥
 
 
 
जे भक्त आपली सर्व कर्मे मला अर्पण करून व मत्परायण होऊन अनन्यभावाने माझे ध्यान व भजन करतात, त्या भक्तांचा, विलंब न लावता, जन्ममरणस्वरुप भवसागरातून त्वरित उद्धार करतो. भक्तिमार्गाची साधना सोपी व विनाकष्टाची आहे. ‘नामसंकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं।’ हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र नामस्मरणाने सर्व पातकांचा नाश होतो. तुला आदराने प्रणाम केले असता समस्त त्रिविधतापांची पीडा शमन होते. परमेश्वराचे अहर्निश स्मरण, ध्यान, भजन व सर्व विचार-आचारांचा मोहरा त्याच्याचकडे वळवून त्याचे सर्वभावाने, सतत पूजन, स्मरण करणे यातच भक्तिमार्गाचे सार साठविलेले आहे! हे उपाय आचरुन संसिद्ध झाल्याने साधक ‘पावन’ होतो. असा हा भक्तिमार्ग सद्य फलदायी, सुलभ आहे.
नारदीय भक्तिसूत्रात म्हणूनच म्हटले आहे-
 
 
 
सुखदुःखेच्छा लाभादित्यक्ते
काले प्रतीक्ष्यमाणे
क्षाणार्धमपि व्यर्थम् न नेयम्।
 
 
 
सुख-दुःख, इच्छा-लाभ आदी जीवनातून पूर्णपणे निघून जातील व नंतर मी हरिभक्तीस सर्वस्वी वाहून घेईन, अशा भविष्यकालीन आदर्श क्षणाची वाट न पाहता, साधकाने आताच, आहे त्या परिस्थितीतच भक्तिसाधनेस लागावे आणि अर्धक्षणसुद्धा व्यर्थ घालवू नये.
 
 
 
- डॉ. स्वाती राईलकर